Monday 25 June 2012

विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व- आचार्य अत्रे



(१३ ऑगस्ट १८९८ -- १३ जून १९६९)
आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

आपल्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे करणारे, तर वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे करणारे प्र. के. अत्रे.
मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, पटकथा लेखक, राजकीय नेते आणि उत्कृष्ट वक्ते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते आणि  एक उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील होते. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेष! त्यांचे विनोदी आणि वैचारिक लेखन सारख्याच गुणवत्तेचे असे.

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ प्र. के. अत्रे. यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ साली सासवड येथे झाला. ते राम गणेश गडकरी (गोविंदाग्रजांना)यांना आपल्या गुरुस्थानी मानत. गोविंदाग्रजांचे धाकटे भाऊ अत्रेंच्या वर्गात होते. त्यांच्याकरवी अत्रेंनी गोविंदाग्रजांशी आपली ओळख करवून घेतली. उभयतांत चांगले दहा-बारा वर्षांचे अंतर होते. पण एक्कलकोंडे असे राहणारे गोविंदाग्रज आणि बाबूराव अत्रे यांची चांगलीच गट्टी जमली. गोविंदाग्रजांच्या विनोदी लेखनाचा, काव्यशैलीचा प्रभाव अत्रेंवर मोठ्या प्रमाणावर पडला. गोविंदाग्रजांच्या शैलीची नक्कल करणारे अनेक जण होऊन गेले. पण अत्रेंनी त्यांच्या शैलीला खर्या अर्थाने आदर्श मानून घेऊन गोविंदाग्रजांच्या तोडीचे लेखन त्यांनी केले. गोविंदाग्रज हे एक उत्कृष्ट विनोदी लेखक होते. आपल्या मृत्युसमयीदेखील त्यांना अनेक विनोद सुचत होते. गुरुची विनोदाला जागे ठेवण्याची प्रथा त्यांच्या शिष्याने म्हणजे अत्र्यांनी चालू ठेवली. त्यांच्या नाटकांवर गडकर्यांच्या नाटकांचा काहीसा प्रभाव आढळतो.

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शाळा शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून केली. मुंबईत पहिले सहा महिने सँडर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

अत्रे हे शिक्षण क्षेत्रात विशेष गाजले. त्यांनी सर्व स्तरांतील मुलांना एकाच शाळेत शिकवले. त्यांनी तत्कालीन पाठ्यपुस्तकांवर जबरदस्त ताशेरे ओढले व स्वतः काही शिक्षकांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी, म्हणून सोप्या भाषेतील अनेक धडे आणि कविता त्यांनी या वाचनमालेत निवडल्या. त्यांच्या वाचनमालेचे गुजरातीत भाषांतरही झाले. विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत, जिवंत वाङ्‌मयाचा व विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयोग राबवणे हे त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य ठरले. त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊनच सावरकरांनी त्यांना ‘आचार्य’ ही पदवी दिली.

अत्र्यांनी कोणत्याही व्यवसायक्षेत्रात शिरताना जास्त काळजी करत बसत वेळ दवडला नाही. ते बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे भरीव असे कार्य केले, लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी 'अध्यापन' , 'रत्नाकर', 'मनोरमा', 'नवे अध्यापन', 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली नवयुग साप्ताहिक, १९४७ रोजी जयहिंद हे सांजदैनिक आणि नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र (मराठा, नवयुग) ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख (श्रद्धांजलीपर लेख) व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे त्यांचे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते.

अत्र्यांनी लंडनला जाऊन दीड वर्षे अभ्यास केला, व परतले तेव्हा त्यांचा कायापालट झाला होता. पण त्यांच्या त्या बदलाकडे त्यावेळी कोणी लक्ष दिले नाही. कारण ते परत आल्यावर त्यांना कळले, की त्यांच्या पत्नीला क्षय झाला होता. त्या काहीच दिवसात निर्वतल्या. त्यानंतर उदास झालेल्या अत्र्यांना 'ट्रॅकवर' कोणी आणले असेल, तर त्यांच्या नाट्यलेखनाने. सांष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक भयंकर गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले. त्यावेळी सर्वांना त्यांच्या अष्टपैलूपणाची जाणीव झाली.
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने नवयुग पिक्चर्सअसे नाव बदलून घेतले. पण कालांतराने काही वादामुळे या कंपनीतून बाहेर पडणारे तेच पहिले ठरले.

अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या मराठादैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. २५ जुलै १९५९ या दिवशीच्या मराठादैनिकात शिवसेनायाच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी शिवसेनाया नावाने संघटना स्थापन करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे त्यांनी सुचविले होते. अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर शिवसेनाहेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले, आणि विचार पक्का होताच, संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली.

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. मी कसा झालो’ (१९५६) ह्या अत्रे यांच्या वाङ्‌मयीन आत्मशोधनातून व कर्‍हेचे पाणी - १ ते ५ खंडया विस्तृत आत्मचरित्रातून अत्रे उलगडत जातात.
लेखन, पत्रकारिता, वक्तृत्व, चित्रपट, शिक्षण व राजकारण या सर्वच क्षेत्रांत अद्वितीय प्रभुत्व गाजवून एका विशिष्ट कालावधीत महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य..! विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..
आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.
अशा या बहुयामी व्यक्तिमत्वाला त्रिवार प्रणाम...!

No comments:

Post a Comment