एखादी कल्पना सुचली की ती मूर्त स्वरूप देऊन ती लोकोपयोगी होईल असे काम स्वार्थत्यागाने करणारे...अतिशय निरलस आणि सेवाभावी वृत्तीने गरजू रुग्णांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणाऱ्या…रुग्णांना अतिशय आवश्यक असलेल्या, परंतु सहजरितीने न मिळणाऱ्या अनेक वस्तू नि:शुल्क वा अत्यल्प दरात पुरविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ संस्थेची स्थापना करणारे रुग्नसेवेतील सेवाभाव जपणारे स्वातंत्र्यसैनिक (कै.) द. प्र. भावे उर्फ भावे गुरुजी..
कधीकधी फार मोठय़ा कार्याची सुरुवात एखाद्या अगदी छोटय़ा घटनेतून झालेली असते. भावे गुरुजींनी सुरू केलेल्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ या कामाची सुरुवातही अगदी छोटय़ा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली. तेव्हाचा काळ हा विषमज्वर असाध्य आजार होता… गुरुजींचा भाऊ विषमज्वराने आजारी होता. त्याच्या शुश्रूषेसाठी बर्फाच्या पिशवीची गरज होती. खूप प्रयत्न करूनही बर्फाची पिशवी गुरुजींना मिळत नव्हती. अखेर एका सधन विद्यार्थ्यांच्या घरी अडगळीत, धूळ खात पडलेली पिशवी गुरुजींना मिळाली आणि उपचार सुरू झाले.
या धावपळीतच गुरुजींच्या मनात विचार आला, की रुग्ण असलेल्या भावाच्या सेवेसाठी जी वेळ आपल्यावर आली तशी ती आणखी कितीतरी जणांवर येत असणार. ही वेळ खरेतर कोणावरच येता कामा नये. स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींच्या मनाने मग या कामाचा ध्यास घेतला आणि त्यांच्या सेवाकार्याचा प्रारंभही लगेच झाला. गरम पाण्याची पिशवी, थर्मामीटर, युरीन पॉट, कुबडी ही साधनेदेखील तेव्हा दुरापास्त होती. सर्वसामान्यांना ती परवडणे शक्यच नव्हते. सोलापुरातील अनेक धनिकांच्या घरात पडून असलेली अशी साधने गुरुजींनी गोळा केली. स्वत:च्या तुटपुंज्या पगारातील पैसे बाजूला ठेवून ते साठवले आणि त्यातूनच १९३२मध्ये ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह-सोलापूर’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. रुग्णसेवेचे काम भावे गुरुजींनी सुरू केले, तेव्हा ‘निघाले युरीन पॉट वाटायला’ अशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत. ते सातत्याने आणि सेवावृत्तीने काम करत राहिले. या कामासाठी आयुष्य वेचलेल्या गुरुजींच्या कामाला पुढे रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’ अशी जनमान्यता मिळाली.
या धावपळीतच गुरुजींच्या मनात विचार आला, की रुग्ण असलेल्या भावाच्या सेवेसाठी जी वेळ आपल्यावर आली तशी ती आणखी कितीतरी जणांवर येत असणार. ही वेळ खरेतर कोणावरच येता कामा नये. स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींच्या मनाने मग या कामाचा ध्यास घेतला आणि त्यांच्या सेवाकार्याचा प्रारंभही लगेच झाला. गरम पाण्याची पिशवी, थर्मामीटर, युरीन पॉट, कुबडी ही साधनेदेखील तेव्हा दुरापास्त होती. सर्वसामान्यांना ती परवडणे शक्यच नव्हते. सोलापुरातील अनेक धनिकांच्या घरात पडून असलेली अशी साधने गुरुजींनी गोळा केली. स्वत:च्या तुटपुंज्या पगारातील पैसे बाजूला ठेवून ते साठवले आणि त्यातूनच १९३२मध्ये ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह-सोलापूर’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. रुग्णसेवेचे काम भावे गुरुजींनी सुरू केले, तेव्हा ‘निघाले युरीन पॉट वाटायला’ अशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत. ते सातत्याने आणि सेवावृत्तीने काम करत राहिले. या कामासाठी आयुष्य वेचलेल्या गुरुजींच्या कामाला पुढे रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’ अशी जनमान्यता मिळाली.
चाकाची खुर्ची, वॉकर, कुबडय़ा, कमोड खुर्ची, स्ट्रेचर आदी अनेक साधनांची आवश्यकता आजारपणातच भासते आणि या साधनांचे महत्त्वदेखील त्याच काळात समजते. ज्या कुटुंबावर ही वेळ येते, त्यांच्यासाठी ही साधने मिळवणे अनेकदा जिकिरीचे होऊन बसते. या वस्तू विकत घेण्याचीही अनेकांची ऐपत नसते. अशा काळात लोक चिंतातुर होतात. काय करावे समजत नाही. चांगली आर्थिक परिस्थिती असली, तरी वस्तू कायमस्वरूपी लागणार नसल्यामुळे ती विकत घेणेदेखील व्यवहार्य नसते. समाजाची ही गरज ओळखून भावे गुरुजींच्या संस्थेने रुग्णोपयोगी वस्तू गरजूंना नाममात्र भाडय़ाने आणि गरिबांकडून कोणतेही भाडे न आकारता देण्याचे काम सुरू केले. हळूहळू लोकांना या कामाचे महत्त्व पटू लागले.
गुरुजींचा पिंड निरलस समाजसेवकाचा होता. सेवेची कोणतीही कल्पना मनात आली की ती पूर्णत्वाला नेणे एवढाच त्यांचा ध्यास असे. त्यातूनच संस्थेला सेवेचे नवे आयाम मिळाले. साहित्य पुरवण्याबरोबरच रुग्णांची घरी जाऊन सेवा करणे, किरकोळ आजारात किरणोपचार करणारी यंत्रे अत्यल्प भाडय़ात देणे, रुग्णांच्या सेवा-शुश्रूषेसाठी अटेंडंट देणे, महापालिका शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवणे, मुलांना दुधाचे वाटप, मोफत दवाखाना, फिरता दवाखाना, अत्यल्प दरात रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरे ही आणि अशी अनेक कामे संस्थेने सुरू केली. या सर्वच कामांची निकड एवढी होती, की संस्थेचा पसारा वाढत राहिला. त्यातून गुरुजींनी सोलापुरात संस्थेची स्वत:ची वास्तू निर्माण केली आणि आजही या वास्तूचा वापर रुग्णसेवा तसेच अनुषंगिक उपक्रमांसाठीच सेवाभावनेतून केला जातो.
सोलापुरात आणि जिल्हय़ात ज्या ज्या कोणी महत्त्वाच्या व्यक्ती येतील त्यांना आग्रहाने संस्थेत न्यायचे आणि संस्थेच्या कामाची ओळख करून द्यायची, यासाठी भावे गुरुजी खूप आग्रही असायचे. अनेकांना ते मुंबईत आणि दिल्लीतही जाऊन भेटले होते. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी, झैलसिंग, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बाळासाहेब ठाकरे, भाऊसाहेब बांदोडकर, कमलाताई होस्पेट, लीलाताई मुळगावकर, सुशीलकुमार शिंदे अशी शेकडो नावे सांगता येतील की ज्यांनी संस्थेचा गौरव केला आहे.
अनेकदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेले काम त्या व्यक्तीच्या पश्चात तितक्या प्रभावीपणे चालतेच असे नाही. भावे गुरुजींनी मात्र स्वत: काम करतानाच अनेक सहकारी असे तयार केले, की गुरुजींच्या पश्चात हे काम आजही पूर्वीच्याच सेवाभावी वृत्तीने आणि आत्मीयतेने गुरुजींनी घालून दिलेल्या मार्गाने आजही सुरू आहे. सत्त्याण्णव वर्षांपर्यंत गुरुजी हे काम करत राहिले. जीवनातील त्रेसष्ट वर्षे त्यांनी या कामासाठी दिली. रुग्णांचे नातेवाईक वस्तू नेण्यासाठी रात्री-अपरात्री, अगदी सणावाराच्या दिवशीदेखील येतात आणि त्यामुळे ‘बारा महिने-चोवीस तास’ ही या कामाची वेळ आहे; पण कधीही न कंटाळता, न थकता, न रागावता गुरुजींचे संपूर्ण कुटुंब हे काम करत राहिले. त्यात पत्नी इंदिराबाई यांची फार मोलाची साथ त्यांना लाभली. आलेल्या व्यक्तीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला दिलासा देण्याचे कामही वस्तू देताना केले जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना ही संस्था अडचणीच्या काळात मोठा आधार ठरते. गुरुजींचे पुत्र रमेश हे १९७७ मध्ये पुण्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आणि पुण्यात आल्यानंतर लगेचच त्यांनी संस्थेचे काम पुण्यातही सुरू केले. पुण्यात आता रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह संस्थेची तीन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये वस्तू नाममात्र भाडय़ाने देण्याचे काम चालतेच, शिवाय रमेश भावे यांनी या सेवाकार्याला आता आणखी काही पैलू जोडले आहेत. गरम पाण्याची पिशवी, बर्फाची पिशवी, चाकाची खुर्ची, घडीच्या कुबडय़ांपासून ते एअरबेडपर्यंत या आणि अशा अनेक रुग्णापयोगी वस्तू अत्यल्प दरात आणि प्रसंगी नि:शुल्क पद्धतीने देण्याचे काम केंद्रातर्फे पुण्यात चालते. गरीब आणि गरजू रुग्णांना सवलतीने रक्त मिळवून देण्याचेही काम केले जाते. रक्तदानानंतर मिळणारी आणि रुग्णाचे सहाशे ते एक हजार रुपये वाचवणारी सवलतपत्रे संकलित करून ती गरजू रुग्णांना देणे, गरजूंना अध्र्या किमतीत रक्त मिळवून देणे, ज्येष्ठांना एक रक्तपिशवी विनामूल्य देणे, गरजूंना रक्त मिळावे यासाठी रक्तपेढय़ांना निधी देणे यांसह अनेक कामे संस्थेतर्फे सुरू आहेत.
रमेश आणि त्यांची पत्नी ललिता भावे हे दोघेही गेली चाळीस वर्षे गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून रुग्णसेवेचे काम पुण्यात करत आहेत. रुग्णसेवेबरोबरच संस्थेसाठी आर्थिक स्वरूपाची मदत गोळा करण्याकरता सातत्याने पायपीट करावी लागत असली, तरीही ते ज्या पद्धतीने हे काम करतात त्यामागची प्रेरणा खरोखर ‘भावे प्रयोग’ हीच आहे.
संस्थेतर्फे ‘भावे गुरुजी रक्तदान सेवा’ हे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. ज्या वयोवृद्ध, महिलारुग्ण आणि गरीब रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून देणे किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्य उपलब्ध करून देणे हे काम पुण्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत त्यासाठी लाखो रुपये उभे करण्यात आले आणि ते गरजू रुग्णांच्या रक्तासाठी वापरण्यात आले. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. समाजाच्या पाठबळावर सुरू असलेल्या या कामात गुरुजींनी आणि त्यांच्यानंतर हे काम सांभाळणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांने, विश्वस्ताने कमालीचा पारदर्शीपणा ठेवला आहे. कोणतीही आर्थिक बाब पावतीशिवाय करायची नाही हा गुरुजींचा दंडक होता. तो आजही कसोशीने पाळला जातो. ज्या कामासाठी समाजाने निधी दिला आहे, त्याच कामासाठी त्यातील पै अन् पै खर्च झाला पाहिजे ही संस्थेतील प्रत्येकाचीच तळमळ असते. म्हणूनच संस्थेने समाजात खूप मोठी विश्वासार्हतादेखील मिळवली आहे. संस्थेचे कार्य गेली ऐंशी वर्षे सुरू आहे ते समाजाच्या पाठबळावर. भविष्यातही रुग्णांच्या मदतीसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे.
‘भावे गुरुजी रक्तदान सेवा’ हे नवे काम आता पुण्यात सुरू करण्यात आले आहे. वयोवृद्ध रुग्ण, महिला रुग्ण आणि गरीब रुग्ण यांच्यापैकी ज्यांना ज्यांना रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी या योजनेत सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते किंवा गरजूंना रक्ताची पिशवी विनामूल्यदेखील उपलब्ध करून दिली जाते. त्याबरोबरच ज्या रुग्णांना सातत्याने डायलिसीस करावे लागते त्यांच्यासाठीही संस्था साहाय्य करते. अशा रुग्णांना रक्तसंक्रमणासाठी आवश्यक असणारे ‘डायलायझर’ हे उपकरण सातत्याने विकत घ्यावे लागते. त्यामुळे डायलिसीसच्या रुग्णांकडून या उपकरणाची मागणी सतत होत असते. रक्त मिळवणे सर्व दृष्टींनी खर्चिक व अवघड होत असल्यामुळे किमान हे उपकरण गरजू, गरीब रुग्णांना सवलतीने आणि शक्य झाल्यास विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना संस्था आता हाती घेत आहे.संस्थेला एका मोठय़ा ट्रस्टकडून गेली अनेक वर्षे भरीव देणगी मिळत होती. यंदा मात्र काही कारणांनी या ट्रस्टने देणगीबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी नव्या योजना हाती घेत असतानाच संस्थेच्या कामालाही मर्यादा येत आहेत. गरजू रुग्णांसाठी खूप काम करण्याची गरज आहे, काम करण्याची तयारीदेखील आहे; पण हाती तेवढा निधी नाही, अशा परिस्थितीत सापडलेल्या या संस्थेला आता समाजानेच पाठबळ देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
समाजाच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या या कामाची समाजाला आजही नितांत गरज आहे. इतरांच्या व्यथा, वेदना थोडय़ाशा हलक्या करण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सेवेचा ध्यास घेतलेल्या या ‘भावे प्रयोगा’ला शक्य ती मदत करायलाच हवी.
ज्यांना मदत करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा...
* संपर्क : रमेश भावे, कोथरूड (फोन नंबर- ९६२३९ ३८१०९)
* संपर्क : रमेश भावे, कोथरूड (फोन नंबर- ९६२३९ ३८१०९)
सौजन्य- लोकसत्ता...