Showing posts with label साहित्यिक. Show all posts
Showing posts with label साहित्यिक. Show all posts

Saturday, 15 September 2012

कविवर्य विंदा करंदीकर - कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील दृष्टी असलेले कवी...


मराठी साहित्यातील एक ख्यातनाम कवी, लेखक, समीक्षक..... मराठी साहित्य संस्कृतीच्या अभूतपूर्व सर्जनशीलतेच्या बहराचे वासंतिक पर्वाचे जनक आणि त्याच पर्वाचे एक अपत्य....त्या वासंतिक वनात स्वतःच्या सर्जनाचा वाफा फुलवित सुसंस्कृत साहित्य निर्माण करणारे.. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळवित, मराठीला आपल्या श्रेष्ठ काव्यनिर्मितीने तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कविवर्य विंदा करंदीकर....!!!
‘आपल्या प्रतिभेचे शील शाबूत ठेवण्यासाठी व तिच्या विकासाच्या शक्यता जिवंत राखण्यासाठी कवीने आपली मस्ती सांभाळली पाहिजे...’ असा एक महत्वाचा कानमंत्र करंदीकरांनी सांगितला आणि या ‘मस्ती’ची व्याख्याही त्यांनी केली आहे. - ‘काव्याच्या सृजनाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही आणि कुणाचीही पर्वा न करणारी अनिवार्य उर्मी म्हणजे कवीची मस्ती’ हे कवीचे व्रत आहे. या व्रतातूनचं विंदा करंदीकरांची कविता ही जन्मली आणि आपल्या मस्तीत मुक्तपणे जगली....
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म  २३ ऑगस्ट१९१८ रोजी
घालवणसिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर  हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरीरामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबईएस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठीइ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली.  संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातीलपहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
१९३७ ते १९८५ हा काळ म्हणजे  विंदांच्या लेखन प्रवासाचा कालखंड.... या कालखंडात त्यांनी आपल्या जीवनधर्म असलेल्या काव्यरचनेत विविध प्रयोग केले. बालकविता, तालचित्रे, अभंग, सूक्ष्मरचना, मुक्तसुनिते ,विरूपिका असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. ‘अमृतानुभवा’ सारख्या तत्वकाव्याचे अर्वाचीनीकरण हा सुद्धा विंदांचा एक प्रयोगचं होता. अशा अनेक अंगांनी काव्यनिर्मिती करून करंदीकरांनी मराठी कवितेत फार मोलाची भर टाकली. विंदांना कविता म्हणजे स्वदेशगंगा वाटायची.. त्यांची  ‘स्वदेशगंगे’ पासूनची  काव्यगंगा पुढे विविध वळणे घेत वाहू लागली .कालांतराने या गंगेला  ‘बालकविता’ यमुनेच्या रुपात मिळाली. मोठ्या माणसांना ज्ञानात्मक आनंद देणारी आणि लहान मुलांना वेगळ्या राज्यात नेणारी बालकविता ही विंदांची मराठी  काव्यासृष्टीला मिळालेली मोठी देणगी आहे. त्यांच्या ‘मावशी’ ,‘घड्याळ’, ‘पंतोजी’, ‘बेडकाचे गाणे’, ‘जादूगार’, ‘पतंग’ या बालगीतातील नाट्यप्रसंगातून तर त्यांनी बालकांचे निरागस मन प्रगट केले.
विंदा कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही ते इंग्रजी साहित्याचे गाढे, व्यासंगी प्राध्यापक होते. वेगवेगळ्या महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले होते. इंग्रजी साहित्य आणि त्यातील विचारातून  त्यांच्या स्वतःच्या मर्मदृष्टीला, चिकित्सक वृत्तीला खूप काही घेता आले . काही महत्वाच्या इंग्रजी साहित्यकृतींचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. कुठल्याही साहित्यसंस्कृतीचा कणा हा भाषा असतो, याचं सजग भान असल्यामुळे इंग्रजीच्या प्राध्यापक असूनही मराठीतील नानाविविध बोलीभाषांच्या  खजिन्याकडे ना कधी दुर्लक्ष केलं आन्ही कधी तुच्छ लेखलं... विंदांची वृत्ती ही जीवनाभिमुख होती. जीवनाचे स्वागत करणारी, जीवनाविषयीची अशा बाळगणारी, त्यात रस घेणारी होती. त्यांच्यामध्ये नैराश्य किंवा कडवटपणा नव्हता. त्यांच्या कवितेने कधी कधी धारदार शस्त्राप्रमाणे वर केले तर कधी उपरोधाचा तीव्र प्रहार केला पण तरीही माणसांमधील मार्दव आणि कोमलता यांचा त्यांना विसर पडला नाही...
जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी  जाणीव विंदांच्या कवितेला व्यापून टाकते. ‘ये यंत्रा ये’ म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारे विंदा,  क्रांतीची चाहूल घेत, ‘माझ्या मना बन  दगड’ असेही म्हणतात...वर्गसंघर्षचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. त्यांची बालगीते असो, परम गीते असो वा स्त्रियांसाठी लिहिलेले स्थानगीते असो, यातील प्रत्येक गीतांमध्ये ‘जीवनातल्या वास्तवाची पेरनी सहजगत्या  करणे’ हे त्यांचे खास वैशिष्ट्य दिसून येते. ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ या त्यांच्या ललित लेखांतील बहुतेक  निबंधांतून त्यांची चिंतनशील वृत्तीही दिसून येते. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे विंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य...
 विंदांनी पारंपारिक मुक्तछंदातही अनेक प्रयोग केले. मुक्तछंदाचे स्वातंत्र्य आणि सुनीत रचनेतील ओळींचे बंधन यांच्या मेळातून ‘ मुक्तसुनीत’ तयार केले. ‘आज प्रार्थना प्राणाऐवजी’ हे तेरा ओळींचे तर ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगाऱ्यावर’ हे  पंधरा ओळींचे सुनीत त्यांनी लिहिले. यात वृत्त व यमक संगती नसली तरी आवाका व परिणाम या दृष्टीने सुनितप्राय राहणे हे मुक्तीसुनितचे लक्षण ठरले.
विंदांनी जशा मुक्छांदात कविता लिहिल्या तशा गाजला अभंग या प्रकारातही रचना केल्या... त्यांनी सामाजिक आशयाची कविता केली तर प्रेमकावितेला नाक न मुरडता तितक्याच आत्मीयतेने प्रेमकविताही केल्या, जितक्या निष्ठेने प्रौढांसाठी प्रलाग्भ कविता लिहिली तितक्याच निष्ठेने बालगीतसुद्धा लिहिली.. विंदा समकालीन साहित्याबद्दल म्हणत की .."वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." याचं विचाराला अनुसरून विंदांची लेखणी चोफेर चालली.  कवितेसोबतच ललित लेखन, समीक्षा. अनुवाद अशा साहित्याच्या विविध प्रांतात विंदा लीलया वावरत राहिले.
विंदा करंदीकरांना त्यांच्या या साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे...
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार,केरळ (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान, मध्यप्रदेश (१९९१)
जनस्थान पुरस्कार,कुसुमाग्रज प्रतिष्ठान( १९९३)
कोणार्क पुरस्कार, ओरिसा(१९९३)
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स

आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी   जाने. २००३  रोजी जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी आंतरिक भावना व्यक्त केल्या. काव्य हाच जीवनधर्म मानणाऱ्या विंदांचे १४ जानेवारी २०१० रोजी मुंबई येथे  त्यांचे निधन झाले.
विंदांच्या कितीही कवित्या आठवल्या तरी त्यांची ‘घेता’ ही कविता मराठी काव्यसृष्टीच्या अंतापर्यंत स्मरणात राहील..
देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
देणाऱ्याचे हात घ्यावेत ....
अशा या मराठी साहित्यविश्वात बहुस्पर्शी कामगिरी करणाऱ्या कलावंत म्हणून मोठे असलेल्या आणि माणूस म्हणून त्याहूनही मोठे असलेल्या कविवर्य विंदा करंदीकरांना शतशः नमन........

Monday, 25 June 2012

विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व- आचार्य अत्रे



(१३ ऑगस्ट १८९८ -- १३ जून १९६९)
आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

आपल्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे करणारे, तर वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे करणारे प्र. के. अत्रे.
मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, पटकथा लेखक, राजकीय नेते आणि उत्कृष्ट वक्ते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते आणि  एक उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील होते. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेष! त्यांचे विनोदी आणि वैचारिक लेखन सारख्याच गुणवत्तेचे असे.

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ प्र. के. अत्रे. यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ साली सासवड येथे झाला. ते राम गणेश गडकरी (गोविंदाग्रजांना)यांना आपल्या गुरुस्थानी मानत. गोविंदाग्रजांचे धाकटे भाऊ अत्रेंच्या वर्गात होते. त्यांच्याकरवी अत्रेंनी गोविंदाग्रजांशी आपली ओळख करवून घेतली. उभयतांत चांगले दहा-बारा वर्षांचे अंतर होते. पण एक्कलकोंडे असे राहणारे गोविंदाग्रज आणि बाबूराव अत्रे यांची चांगलीच गट्टी जमली. गोविंदाग्रजांच्या विनोदी लेखनाचा, काव्यशैलीचा प्रभाव अत्रेंवर मोठ्या प्रमाणावर पडला. गोविंदाग्रजांच्या शैलीची नक्कल करणारे अनेक जण होऊन गेले. पण अत्रेंनी त्यांच्या शैलीला खर्या अर्थाने आदर्श मानून घेऊन गोविंदाग्रजांच्या तोडीचे लेखन त्यांनी केले. गोविंदाग्रज हे एक उत्कृष्ट विनोदी लेखक होते. आपल्या मृत्युसमयीदेखील त्यांना अनेक विनोद सुचत होते. गुरुची विनोदाला जागे ठेवण्याची प्रथा त्यांच्या शिष्याने म्हणजे अत्र्यांनी चालू ठेवली. त्यांच्या नाटकांवर गडकर्यांच्या नाटकांचा काहीसा प्रभाव आढळतो.

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शाळा शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून केली. मुंबईत पहिले सहा महिने सँडर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

अत्रे हे शिक्षण क्षेत्रात विशेष गाजले. त्यांनी सर्व स्तरांतील मुलांना एकाच शाळेत शिकवले. त्यांनी तत्कालीन पाठ्यपुस्तकांवर जबरदस्त ताशेरे ओढले व स्वतः काही शिक्षकांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी, म्हणून सोप्या भाषेतील अनेक धडे आणि कविता त्यांनी या वाचनमालेत निवडल्या. त्यांच्या वाचनमालेचे गुजरातीत भाषांतरही झाले. विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत, जिवंत वाङ्‌मयाचा व विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयोग राबवणे हे त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य ठरले. त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊनच सावरकरांनी त्यांना ‘आचार्य’ ही पदवी दिली.

अत्र्यांनी कोणत्याही व्यवसायक्षेत्रात शिरताना जास्त काळजी करत बसत वेळ दवडला नाही. ते बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे भरीव असे कार्य केले, लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी 'अध्यापन' , 'रत्नाकर', 'मनोरमा', 'नवे अध्यापन', 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली नवयुग साप्ताहिक, १९४७ रोजी जयहिंद हे सांजदैनिक आणि नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र (मराठा, नवयुग) ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख (श्रद्धांजलीपर लेख) व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे त्यांचे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते.

अत्र्यांनी लंडनला जाऊन दीड वर्षे अभ्यास केला, व परतले तेव्हा त्यांचा कायापालट झाला होता. पण त्यांच्या त्या बदलाकडे त्यावेळी कोणी लक्ष दिले नाही. कारण ते परत आल्यावर त्यांना कळले, की त्यांच्या पत्नीला क्षय झाला होता. त्या काहीच दिवसात निर्वतल्या. त्यानंतर उदास झालेल्या अत्र्यांना 'ट्रॅकवर' कोणी आणले असेल, तर त्यांच्या नाट्यलेखनाने. सांष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक भयंकर गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले. त्यावेळी सर्वांना त्यांच्या अष्टपैलूपणाची जाणीव झाली.
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने नवयुग पिक्चर्सअसे नाव बदलून घेतले. पण कालांतराने काही वादामुळे या कंपनीतून बाहेर पडणारे तेच पहिले ठरले.

अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या मराठादैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. २५ जुलै १९५९ या दिवशीच्या मराठादैनिकात शिवसेनायाच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी शिवसेनाया नावाने संघटना स्थापन करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे त्यांनी सुचविले होते. अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर शिवसेनाहेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले, आणि विचार पक्का होताच, संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली.

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. मी कसा झालो’ (१९५६) ह्या अत्रे यांच्या वाङ्‌मयीन आत्मशोधनातून व कर्‍हेचे पाणी - १ ते ५ खंडया विस्तृत आत्मचरित्रातून अत्रे उलगडत जातात.
लेखन, पत्रकारिता, वक्तृत्व, चित्रपट, शिक्षण व राजकारण या सर्वच क्षेत्रांत अद्वितीय प्रभुत्व गाजवून एका विशिष्ट कालावधीत महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य..! विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..
आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.
अशा या बहुयामी व्यक्तिमत्वाला त्रिवार प्रणाम...!

Monday, 11 June 2012

साने गुरुजी...
“साधी राहणी उच्च विचारसरणी” या मूर्तीचे प्रतीक म्हणजे साने गुरुजी.

जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९ पालगड, रत्नागिरी
मृत्यू: जून ११, इ.स. १९५० के.इ.एम.रुग्णालय मुंबई



थोर साहित्यिक, स्वतंत्र समरातील आघाडीचे नेते आणि प्रेममूर्ती बालागोपालांचे लाडके दैवत मातृहृदय पू. साने गुरुजी...

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने...! त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये कोकणात पालगडसारख्या खेडेगावात झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जात पण हे त्यांच्या आजोबांच्या वेळी पण गुरुजींच्यावेळी घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली इतकी कि त्यांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले आणि गरिबीने त्यांच्या परिवाराला घेरले. शाळेतील फी भरण्याची सुद्धा सोय नसे; परंतु त्यांच्या आईला आपला मुलगा शिकला पाहिजे असेच वाटे. शिक्षणासाठी कष्ट उपसण्याची शक्ती गुरूजींजवळ होती, म्हणून ते गाव सोडून शिकण्यासाठी दूर गेले, जेणेकरून आपल्याला काम करून शिकता येईल आणि कुणी ओळखाणारही नाही. अशा परिस्थितीत गुरुजी एम.ए. पर्यंत शिकले. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर संस्कार घालणे महत्वाचे मानले. त्यासाठी त्यांनी कथा हे माध्यम निवडले व ते प्रभावी ठरले. स्वत:च्या उदाहरणातून त्यांनी मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ तर शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’ त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. स्वातंत्राची चळवळ जोर धरू लागल्यावर ते विनोबाजी, म. गांधी यांच्या संपर्कात आले आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्यांंची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.

समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्याु पांडुरंगाला खर्याे अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, अनेक भाषा, चालीरीती समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले.

त्यांच्या कथा, कादंबर्याध, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक तर मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये आपल्याला दिसतात. त्यांच्या लिखाणात मातृहृदयाची जाण होती. आजही त्यांच्या स्फुर्तिदायी कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली.

साने गुरूजींचे आपल्या आईवर नितांत प्रेम होते. ते म्हणत ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू’. त्या प्रेमातूनच ‘श्यामच्या आईचा’ जन्म झाला. ‘श्यामची आई’ या सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. गुरुजींनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले.

त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. फेब्रुवारी १९३३ मध्ये ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. आईच्या उच्च विचारसरणीतून, शिस्तीतून, प्रेमळ वागण्यातून गुरुजी घडले. माणसाने गरिबीत जीवन जगावे पण स्वाभिमान सोडू नये. प्रामाणिक असावे, लाचारी पत्करू , दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे, भूतदया, प्राणीमात्रांवर प्रेम करणे, गरिबांना मदत करावी जीवन समाजसेवेसाठी वेचावे असे त्यांना वाटे.

स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली, ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टह केले पण काही कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांचे निधन झाले. आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले आहे. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.

आसवांना शब्द देणाऱ्या, मातृहृदायाच्या महामानवास शतशः अभिवादन...!!!

Monday, 7 May 2012

कवी ग्रेस... 
अरुपाचे रुप दावणारा कवी...
जन्म:- १०मे १९३७
मृत्यू:-  २६मार्च २०१२ 

कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी नागपूर येथे झाला. माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं मूळ नावं. पण "कवी ग्रेस" या नावाने त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९६७ साली प्रकाशित झालेल्या "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत, अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. त्यांच्या काही कविता आपल्या शालेय अभ्यासक्रमातही आहेत.
                                                      
"समजण्यास अत्यंत अवघड" इथपासून ते "केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही" इथपर्यंतच्या टीका कवी ग्रेस यांच्या काव्यावरती झाल्या आहेत. यावर "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही" असे त्यांचे म्हणणे होते.
ग्रेसची दुःखला सामोरे जाण्याची पद्धत विलक्षण होती. दुःख आणि कविहृदय याचा संबंध अन्योन्य स्वरूपाचा आहे. दुःख जणू शहाणपण देण्याकरिताच निर्माण होत असावे. म्हणूनचदेठास तोडतानाही रडले फुलांचे अंग’ ही पुष्पवस्था त्यांना आदर्शवत वाटत असावी.. ग्रेसच्या कवितेचे दर्शनी स्वरूप अत्यंत मोहक आहे. संगमरवरावर नाजूक हाताने नक्षी काढून, तिला रंग दिल्यावर तिचे सौंदर्य खुलावे, तशी शब्दांची नक्षी कोरण्याचा ग्रेसला हव्यास होता. त्यांच्यासंध्याकाळच्या कविता’ प्रकाशित होऊन इतकी वर्षे लोटल्यावरही तिच्यातील ताजेपणा लोपले नाही.

ग्रेस यांना अगदी सुरवातीपासूनच शब्दशक्तीची विलक्षण समज होती. त्यांना ती नक्षीकामाकरिता अतिशय उपयोगी पडली. शब्दाच्या अर्थाची आणि नादाची इतकी खोल समाज असणारा कवी निराळाच. आवश्यक शब्दांच्या अचूक निवडीत त्याच्या प्रतिभेचे मर्म आहे. अपरिचित, आडवळणी, कृत्रिम, मुद्दाम निर्माण केलेले, इंग्रजीने संस्कारित केलेले असे कोणतेही शब्द त्याच्या कवितेत नाहीत. याचे कारण त्यांचे भावविश्व संपूर्णपणे भारतीय जीवन जाणीवांनी आणि वैचारिक विश्वाने संस्कारित केलेले होते. ग्रेसच्या अनवट अनुभूतीविश्वाने ग्रेसच्या शैलीला विवक्षित परिणाम दिले. शैलीतील प्रासादिकतेचे सौंदर्य तिला मान्य नव्हते, किंबहुना कविता आलंकारिक आणि भरजरी असली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. ग्रेसच्या शैलीत सुभाषितवजा चरणांना फार महत्व आहे. आपल्या प्रतिभेच्या घाटातूनच मराठी काव्य परंपरेतील आवश्यक घटकांचा स्वीकार त्यांनी केला होता.समकालीन भावकाव्यात कवी ग्रेसच्या कविता संपूर्णपणे वेगळ्या आहेत.. मर्ठेकारी काव्याप्रवाहत लिहिणाऱ्या अलीकडच्या कवींच्या संस्कृतिसंचीताला दिलेला नकार आणि बोजड गद्मयता यामुळे निर्माण झालेले मराठी कवितेतील आवर्त ग्रेसच्या कवितेने निवारले.. मराठी कवितेतील संस्कारभान तिने जगविले. परंपरागत मराठी संस्कृतीतील तपशिलाचा साहचर्यसंगीतयुक्त उपयोग करून तिला समृद्ध केले. पण त्यातच गुंतून पडता नेनिवेप्रधान भावावस्थेतील तरल गुढ अनुभूतिनी साकार करून एक अभिजात सोंदर्यशिल्पाचे रूप आपल्या कवितेला दिले. मराठी भावकवीतेला आपल्या अंतस्थ गेयतेचे परिमाण देऊन समृद्ध केले.

स्वतःच्या जगण्यातून इतरांना सदैव अस्वस्थ करणाऱ्या कविवर्य ग्रेस यांच्या जगण्याची धाटणी "मै ओर मेरी तनहाई" अशी होती.. वर्तमानातील प्रत्येक क्षणाची चाचपणी करून तो मनसोक्त जगण्याची आणि त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजण्याच्या ग्रेस यांच्या जगण्याचे कुतूहल शेवट पर्यंत कायम राहिले. अनेकदा स्वतःच्या एकटेपणाच्या प्रेमात असलेल्या ग्रेस यांना या एकटेपणानेच जगण्याची मजा बहाल केली होती. कधी रडवणारे, कधी हसविणारे, कधी अंतर्मुख करणारे, तर कधी जगण्याचे आणि जगाचे अद्वितीय सत्य उमगायला लावणारे, स्वतःच्या जगण्यावर निस्सिम प्रेम करणारे, कवी ग्रेस म्हणजे कलंदर माणूस... म्हणूनच...

I am free But not Available.
Flat For Sale But not For Gentlemen.

असे अफलातून ओळी लिहून ठेवायचे.

इतरांना जगण्याचे भान आणून देतानाच त्यांना काहीतरी वेगळे तत्वज्ञान सांगणारे ग्रेस अतिशय दिलदार. त्यांच्या घरात आलेला कोणीही माणूस कधी रिकाम्या हाताने गेलाच नसावा. तो विचार, आनंदी जगणे, एकटे जगण्यातील ताकद, असे बरेच काही घेऊन गेलेला असावा.
संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काही गाजलेले कविता संग्रह तर चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, कावळे उडाले स्वामी हे त्यांचे गाजलेले ललित संग्रह होते.

कवी गेस हे नागपूरच्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालयात (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. यांनी काही काळ पत्रकारितासुध्दा केली होती. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या दुस-या -साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
पुरस्कार :-

संध्याकाळच्या कविता’ या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८,
चर्चबेल’ ललितबंधाला राज्य पुरस्कार,
राजपुत्र आणि डार्लिंग’ राज्य पुरस्कार,
चंद्रमाधवीचे प्रदेश’ या कवितासंग्रहाला प्रादेशिक भाषेत बंगलोरमध्ये राज्य पुरस्कार,
मितवा’ या ललितबंधाला मारवाडी संमेलनात सम्मान, कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार-२०११, नागपूर भूषण २०११, नागपूर - विदर्भ फाउंडेशनचा "विदर्भभूषण' पुरस्कार -२०११,
"
वा-याने हलते रान" या ललित लेखसंग्रहाला २०१२ सालच्या "साहित्य अकादमी पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले होते. आजारी असूनही साहित्यविश्वातील सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी ग्रेस व्हिलचेअरवर या समारंभासाठी आले होते. पण बसल्या जागेवरून हलणे शक्य नसल्यामुळे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी, ग्रेस बसले होते तेथे जाऊन त्यांचा सन्मान केला.


कवी ग्रेस गेले काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होते.तीन वर्षांपुर्वी त्याना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून ते पुण्य़ाच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र आठवड्याभरापूर्वी त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अखेर २६ मार्च २०१२ रोजी ७५ वर्षीय ग्रेस यांची प्राणज्योत मालवली.

समकालीन कवींपेक्षा वेगळा विचार करून शब्दांच्या जगात लिलया वावरणारा हा जादूगार आज गेल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. घर थकलेले संन्यासी, ती गेली तेव्हा, निष्पर्ण तरूंची राई, मरण या त्यांच्या गाजलेल्या कविता रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो....!!!