Monday 14 May 2012

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज...
सिंहाचा छावा.......

जन्म :- १४ मे इ.स.१६५७
मृत्यू :- ११ मार्च इ.स १६८९


मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते. आठ भाषांचे जाणकार असणारे ‘बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिणारे राजे. आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट करून , स्वराज्यातील एकही किल्ला न गमावता , मराठ्यांचे आरमार शक्तीशाली करणारे छत्रपती संभाजीराजे. औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविणारा मराठ्यांचा हा छावा....

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ' राजेंच्या दुधाई बनल्या. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच, राजकारण लवकर आत्मसात केले. विद्याभ्यास, घोडस्वारी, शास्त्रविद्या, दंडनिती, राजधर्म , राजपुत्र धर्म, पितृसेवा, राजकारण अशा प्रकारे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण त्यांना दिले गेले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची जडणघडण अतिशय काटेकोर पद्धतीने राजमाता जिजाऊंच्या देखरेखी खाली होत गेली.

छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले. आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती. त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.


१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी राजे दुसऱ्यांदा पोरके झाले. तर छत्रपती राजारामाचा जन्म झाल्यामुळे सोयराबाई संभाजी राजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या. संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते, त्यांना भ्रष्टाचार खपत नसे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले. शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी महाराणी सोयराबाईंना फूस लावून शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले आणि संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले.

छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली, तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता, जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल. पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तृत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी सोयराबाईंकरवी महाराजांना, संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला. महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी, लेखक जागा झाला. या कालावधीत त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. ‘बुधभूषणम्’ हा संस्कृत तर ‘नायिकाभेद’ , ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत निपुण असणाऱ्या संभाजीचे संस्कृत व हिंदी या भाषांवरील प्रभुत्व या ग्रंथांवरून दिसून येते.
याच काळात शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला. पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला. संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत, असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला. तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.

आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले. अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला. मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला. येथे संभाजी राजेंचा निर्णय चुकला. दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला. शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली. संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली. पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला. मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले. तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट घडली. संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.

१५ मार्च १६८० राजारामच्या विवाहानंतर काही दिवसांनीच म्हणजे ३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले. ही बातमी सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळी यांनी संभाजी राज्यांना कळवलीच नाही उलट लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे ठरवून २१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले. मोरोपंत,प्रल्हाद निराजी आणि अण्णाजी दत्तो या मंडळीनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे पाठविण्यात आले. त्याप्रसंगी हंबीरराव मोहिते (सोयराबाईंचे सख्खे बंधू) यांनी संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत तसेच मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडे आहे. त्यातच मोघल सुभेदार बहादुरखान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता. अशा वेळी राजारामला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते. या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून ते संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिले.

सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक, किल्ले रायगडावर झाला. या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले. पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली, तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्याी परली गावात हत्तीच्या पायी दिले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. त्यानंतर बुर्हाबणपुरची मोहिम, मोघलांशी लढा, सिद्दीचा बंदोबस्त, रामसेजचा ऐतिहासिक लढा, म्हैसूरकर चिक्कदेवराजाचा बंदोबस्त, गमेश्वरला दगा अशा केवळ ९ वर्षांच्या काळात तब्बल १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.

याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्याम धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्यांामुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली.

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर संभाजी राजे यांना ३५५व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा..!!!

जय जिजाऊ !!
जय शंभूराजे !!
जय शिवराय !!

Saturday 12 May 2012


ई. श्रीधरन…
कोकण रेल्वेचे शिल्पकार... मेट्रो मॅन...


जन्म-- ६ डिसेंबर इ.स. १९३२, पलक्कड, केरळ – हयात...


आपल्या देशाचा विकास हेच एकमेव स्वप्नं उराशी बाळगून, भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे तसेच सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेतून कर्तृत्ववान आणि निस्पृह माणूस काय चमत्कार घडवून अणु शकतो हे दाखवणारे, देशभक्तीने झपाटलेले अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे. पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत.

आपल्या अफाट बुद्धीमत्तेने मेट्रो रेल्वे बांधून कोलकता आणि दिल्लीतील लाखो लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर करणारे , आधुनिक भारताच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल असे कोकण रेल्वेचे शिल्पकार, खाजगी कंपनी कडून मिळणारे वार्षिक करोडो रुपयांचे पकेज ठोकरून देशाचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून गेली ५८ वर्षे वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत सरकारी नोकरीच करणारे आणि 'आशियातले हिरो' म्हणून टाईम म्यागझिनने ज्यांचा सन्मान केला असे इंजिनिअरिंग क्षेत्रातले भीष्म पितामह श्री ई. श्रीधरन...

डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.

१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्‌-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले.
१९७० मध्ये उपमुख्य अभियंता म्हणून कोलकाता मेट्रोच्या नियोजन, आरेखन व अंमलबजावणीच्या कामासाठी त्यांना पदभार सोपविण्यात आला. ही भारतातील प्रथम मेट्रो सेवा होती. ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते. जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. ते सदस्य म्हणून १९९० मध्ये भारतीय रेल्वेतून निवृत्त झाले.

ते निवृत्त झाल्यावरही त्यांची सेवा भारत सरकारला हवी होती. त्यांना १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेचे मुख्य प्रबंध संचालक म्हणून नियुक्त केल्या गेले. त्यांच्या आधिपत्याखाली हा प्रकल्प सात वर्षात पूर्ण किल्ल्या गेला. तो अनेक बाबतीत अद्वितीय आहे. त्यात अनेक खुब्या होत्या तो 'बांधा वापरा व हस्तांतरीत करा' या तत्त्वाचा प्रथम प्रकल्प होता. भारतीय रेल्वेच्या खास शैलीपेक्षा त्याची संस्थाकृत बांधणी अगदी वेगळी होती. या प्रकल्पात ८२ कि.मी मध्ये ९३ बोगदे होते जे मृदु मातीत बनविल्या गेले. ही रेल्वेलाईन ७६० किमी लांबीची आहे ज्यात सुमारे १५० पूल आहेत. हा अत्यल्प दरात पूर्ण झालेला प्रकल्प होता. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.

२००५च्या मध्यावधीत त्यांना दिली मेट्रोचे प्रबंध संचालक बनविल्या गेले. यातील विविध विभाग त्याच्या अंदाजपत्रकिय किमतीत व नियोजित वेळेत वा त्याआधी पूर्ण करावयाचे होते. त्यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे 'मेट्रो मॅन' ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना अनेक पुरस्कार आणि पदकांनी सन्मानित करण्यात आले.

२००१ मध्ये भारत सरकारने त्यांचा “पदमश्री” देऊन सन्मान केला.
२००२ साली टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना “मॅन ऑफ द ईयर” म्हणून निवडले.
२००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची “आशियातील एक पुढारी” म्हणून निवड केली.
२००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.
२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पदमविभूषण” देऊन गौरवले.

श्रीधरन यांनी रेल्वेला दिलेले हे योगदान सुवर्णाक्षरांनीच लिहावे लागेल. त्यांनी कोलकाता आणि दिल्लीतले 'मेट्रो' प्रकल्प यशस्वी करून दाखविलेच. पण आज ७६० किलोमीटर धावणारी कोकण रेल्वे हा श्रीधरन यांच्या कर्तबगारीचा अजोड नमुना आहे. ९३ बोगदे आणि दीडशे पूल असणारा हा मार्ग स्वप्नातून सत्यात आला तो श्रीधरन यांच्या अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापकीय कौशल्यांमुळे.
निष्कलंक चारित्र्य, अखंड परिश्रम, स्वत:ची प्रतिभा समाजासाठी वापरण्याची बुद्धी आणि समावेशक नेतृत्व यातून मोठी कामे कशी उभी करता येतात, याचे ई. श्रीधरन हे मूर्तिमंत रूप आहे.

आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्याु परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन ३१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त झाले.

कोकण रेल्वेचे शिल्पकार... निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करणाऱ्या "मेट्रो मॅन" ई. श्रीधरन यांना संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...!!!
ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि ह्या पुढेही त्यांच्या कडून अशीच देशाची सेवा घडो आणि आपल्या देशात असे शेकडो ई. श्रीधरन उदयाला येवोत हीच ईश्वरा कडे प्रार्थना..!!

Monday 7 May 2012

निर्मलाताई  पुरंदरे... 

आत्मविश्वासाच्या विश्वाचा आधार...

आजही आपला जवळजवळ सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहतो आणि त्यापैकी अनेकजण; विशेषतः महिला अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ संस्थेने ग्रामीण भागातील. महिला मुले यांना शिक्षणाचे, पर्यायाने विकासाचे दार खुले करून दिले.

ताई आता आम्हाला आमच्या घरात मान मिळतो.
ताई त्यादिवशी गावच्या शाळेत मला शिकवायला बोलावलं होतं.
ताई त्या दिवशी गावच्या सरपंचानी माझा सल्ला विचारला.
ताई आता गावात सगळेजणबालवाडीताई’ म्हणून आदराने वागवतात.”
ताई, ताई आणि फक्त ताई... जणूताई’ हाच त्यांचा श्वास नि ध्यासही. जणूताई’ हाच त्यांचा अंतिम शब्द निताई’ म्हणतील, तीच त्यांच्यासाठी पूर्वदिशाही..!
..
याताई’ म्हणजे निर्मला पुरंदरे..!

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या संचालिका. तना-मनाचं शुभ्रपण कसं असावं, ते निर्मलाताईंना पाहिल्यावर कळतं. आतबाहेर वेगवेगळं काही नाही. जे काही आहे, ते सारं स्वच्छ, निर्मळ आणि पारदर्शक. कुणी नावालाही हिणकस शोधू शकणार नाही इतकं. कामाप्रती नि ध्येयाप्रती असलेल्या असीम निष्ठेमुळेच त्यांचं शीलवान नेतृत्व उजळून निघालंय आणि त्यामुळेच 78 व्या वर्षीही निर्मलाताईंची समाजसेवेची आस कायम आहे.

खरं तर वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी एक स्वप्न पाहिलं. केवळ पाहिलंच नाही, ते प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्दही त्यांनी उराशी बाळगली. हे स्वप्न होतं ग्रामीण भागातील मुलांना पूर्वप्राथमिक बालशिक्षण मिळण्याचं. त्यासाठी १९८१ मध्ये त्यांनीवनस्थळी’ या संस्थेची स्थापना केली आणि संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील मुलांना पूर्वप्राथमिक बालशिक्षण द्यायला सुरुवात केली. गेल्या ३० वर्षात त्यांचं म्हणजे निर्मलाताईंचं स्वप्न साकार झालं आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, लातूर, नाशिक आणि सांगली अशा सात जिल्ह्यांतवनस्थळी’च्या पूर्वप्राथमिक बालशिक्षण देणाऱ्या सुमारे सव्वाशे बालवाडय़ा सुरू आहेत. पाचेक वर्षापूर्वीपर्यंत वनस्थळीच्या या बालवाडय़ांची संख्या खरं तर अडीचशेच्या आसपास होती. पण महाराष्ट्र सरकारला पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची गरज पटली आणि शिक्षण खात्याने राज्यस्तरावर पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची सोय केली. त्यामुळे संख्येच्या पातळीवर वनस्थळीच्या बालवाडय़ांचा आकडा कमी झाला. अर्थात निर्मलाताई असा विचार कधीही करत नाहीत. त्या फक्त आपलं काम करत राहतात. अधिकाधिक मुलांपर्यंत कसं पोचता येईल; याचा विचार करत राहतात.

डॉ. अच्युत शंकर आपटे यांनी १९५५ मध्ये या स्थापना केलेल्याविद्यार्थी साहाय्यक समिती”चे काम करत असताना अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांशी निर्मलाताईंचा परिचय झाला. त्यातील अनेकांच्या घरीही त्यांचे जाणे झाले. त्यावेळी या मुलांची कौटुंबिक परिस्थिती, ग्रामीण भागातील प्रश्नर, एकूणच स्थिती त्यांच्या लक्षात आली. आजही आपला सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहत असून शिक्षणापासून वंचित आहे. शिक्षण नाही म्हणून पुढे उभे राहणारे कितीतरी प्रश्नग आहेत, या विचाराने त्यांना ग्रासले. हीच स्थिती ग्रामीण महिलांचीही आहे. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित म्हणून विकासाचा विचार नाही, कुटुंबात दुय्यम स्थान, योग्य आहार, निरोगी वातावरण, वैद्यकीय मदत, दळणवळणाच्या साधनांचा अभाव यांमुळे या महिलांच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य ताईंच्या लक्षात आले. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर स्थानिक पातळीवरच काम सुरू करावे लागेल या विचारातून 21 डिसेंबर 1981 पासून "वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा'चे काम सुरू झाले.

अनेक कारणांमुळे खेड्यातील मुलींचे अर्धवट राहिलेले शिक्षण आणि त्यातून त्यांचा थांबलेला पुढचा प्रवास विचारात घेऊन "वनस्थळी'ने त्यांना संधी देण्याचा उपक्रम सुरू केला. या मुली आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला, तर गावाची प्रगती वेगाने होईल, या भूमिकेतून प्रयोगाला सुरवात झाली. ग्रामीण भागातील पालकांमध्ये वयाच्या सहा वर्षांपर्यंत मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकताच नव्हती. अडीच-तीन वर्षांपासून मुलाला विविध साधनांची, व्यवहारातील गोष्टींची माहिती व्हायला हवी, त्यांच्यामधील कलांची जाणीव व्हावी म्हणून बालशिक्षण महत्त्वाचे असल्याने ते देण्यासाठी शिक्षक प्रशिक्षित सक्षम हवेत म्हणून ग्रामीण महिलांसाठी बालवाडीताई प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठीहिंगणे स्त्री- शिक्षण संस्था” नूतन बाल शिक्षण संघ” यांचे सहकार्य घेण्यात आले. या वर्गांतून पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी आवश्यईक बालशिक्षण कार्यपद्धती, मानसशास्त्र, आरोग्य आणि आहार, बालकल्याण इत्यादींविषयी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. अर्धवट शिक्षण झालेल्या, गावातीलच विविध जाती-धर्मातील अल्पशिक्षित महिलांनी याद्वारे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण झाल्यावर या महिलांनी आपल्याच परिसरातील वीस-पंचवीस मुले जमा करून बालवाडी सुरू करण्यासाठीही "वनस्थळी'ने त्यांना प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले. तसेच, मेळावे, निवासी शिबिरे, चर्चासत्रे घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचाही प्रयत्न केला.

वनस्थळी’चा पूर्वप्राथमिक बालशिक्षणाचा उपक्रम मुलांना लहान वयातच अभ्यासाची गोडी लावणारा होताच. पण तो बालवाडीताईंच्याही व्यक्तिमत्त्व विकासाचा उपक्रम होता. कारण मुलांना शिकवता शिकवता बालवाडीताई स्वत:ही शिकत होत्या. महत्त्वाचं म्हणजे आधी सातवी-आठवी किंवा बारावीपर्यंत शिकूनही गावातल्या एखाद्या मुलीला घरात-गावात-समाजात मान मिळायचा नाही. पण बालवाडीताईचं प्रशिक्षण घेऊन गावागावात बालवाडय़ा सुरू केल्यावर मात्र याच मुलींना गावात आदराची वागणूक मिळू लागली. कुठलाही निर्णय आणि कृती त्या जबाबदारीने पार पाडू लागल्या. निर्मलाताईंनी गावेगावी जे आहे, त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी लागणारं साहित्य बनवायला मुलींना शिकवलं. त्यामुळे मुलंही शिक्षणसाहित्याला बुजली नाहीत...निर्मलाताईंना ग्रामीण भागातल्या महिलांचा-मुलांचा-समाजाचा विकासच महत्त्वाचा वाटतो. मग तो आपण केला काय किंवा शासनाने केला काय. म्हणून तर त्या पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची कास धरून त्या थांबल्या नाहीत. त्यापुढे जाऊन त्यांनी वनस्थळीतर्फे शाळाशाळांत जाऊन किशोर छंदवर्ग घेणे, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण शिबीर असे अनेक उपक्रम राबवायला सुरुवात केली. आता तर बालवाडीताई प्रमाणेच वनस्थळीने बारावी झालेल्या मुलींनाआरोग्य सेविका प्रशिक्षण’ द्यायला सुरुवात केलीय. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून इथे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयांत आरोग्य सेविकेचं काम आदराने दिलं जात आहे.

ग्रामीण भागातील गरजा ओळखून "वनस्थळी'च्या माध्यमातून निर्मलाताईंनी आजवर असंख्य मुलांना घडवले. स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले. "विद्यार्थी सहायक समिती'च्या माध्यमातूनही त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना नवी दिशा दिली. त्यांची "फ्रान्स मित्रमंडळ' ही संस्था भारत-फ्रान्सची संस्कृती समजून घेत एकमेकांमधील नाते दृढ करत आहे. डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे.

ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना बद्दल पुणेकरांनीपुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे. सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरत असलेल्या शिवछत्रपतींची प्रतिमा असलेले गौरवचिन्ह आणि रोख एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांना आणि यांच्या पुढील कार्याला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप खूप शुभेच्छा...

संपर्क-वनस्थळी,
318/ 19
बी, कॅनॉल रोड, मॉडेल कॉलनी, पुणे- 411 016 फोन .- (020 - 25651550)