ई. श्रीधरन…
कोकण रेल्वेचे शिल्पकार... मेट्रो मॅन...
जन्म-- ६ डिसेंबर इ.स. १९३२, पलक्कड, केरळ – हयात...
आपल्या देशाचा विकास हेच एकमेव स्वप्नं उराशी बाळगून, भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे तसेच सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेतून कर्तृत्ववान आणि निस्पृह माणूस काय चमत्कार घडवून अणु शकतो हे दाखवणारे, देशभक्तीने झपाटलेले अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे. पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत.
आपल्या अफाट बुद्धीमत्तेने मेट्रो रेल्वे बांधून कोलकता आणि दिल्लीतील लाखो लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर करणारे , आधुनिक भारताच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल असे कोकण रेल्वेचे शिल्पकार, खाजगी कंपनी कडून मिळणारे वार्षिक करोडो रुपयांचे पकेज ठोकरून देशाचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून गेली ५८ वर्षे वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत सरकारी नोकरीच करणारे आणि 'आशियातले हिरो' म्हणून टाईम म्यागझिनने ज्यांचा सन्मान केला असे इंजिनिअरिंग क्षेत्रातले भीष्म पितामह श्री ई. श्रीधरन...
डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.
दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.
१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम् पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले.
१९७० मध्ये उपमुख्य अभियंता म्हणून कोलकाता मेट्रोच्या नियोजन, आरेखन व अंमलबजावणीच्या कामासाठी त्यांना पदभार सोपविण्यात आला. ही भारतातील प्रथम मेट्रो सेवा होती. ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते. जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. ते सदस्य म्हणून १९९० मध्ये भारतीय रेल्वेतून निवृत्त झाले.
ते निवृत्त झाल्यावरही त्यांची सेवा भारत सरकारला हवी होती. त्यांना १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेचे मुख्य प्रबंध संचालक म्हणून नियुक्त केल्या गेले. त्यांच्या आधिपत्याखाली हा प्रकल्प सात वर्षात पूर्ण किल्ल्या गेला. तो अनेक बाबतीत अद्वितीय आहे. त्यात अनेक खुब्या होत्या तो 'बांधा वापरा व हस्तांतरीत करा' या तत्त्वाचा प्रथम प्रकल्प होता. भारतीय रेल्वेच्या खास शैलीपेक्षा त्याची संस्थाकृत बांधणी अगदी वेगळी होती. या प्रकल्पात ८२ कि.मी मध्ये ९३ बोगदे होते जे मृदु मातीत बनविल्या गेले. ही रेल्वेलाईन ७६० किमी लांबीची आहे ज्यात सुमारे १५० पूल आहेत. हा अत्यल्प दरात पूर्ण झालेला प्रकल्प होता. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.
२००५च्या मध्यावधीत त्यांना दिली मेट्रोचे प्रबंध संचालक बनविल्या गेले. यातील विविध विभाग त्याच्या अंदाजपत्रकिय किमतीत व नियोजित वेळेत वा त्याआधी पूर्ण करावयाचे होते. त्यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे 'मेट्रो मॅन' ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना अनेक पुरस्कार आणि पदकांनी सन्मानित करण्यात आले.
२००१ मध्ये भारत सरकारने त्यांचा “पदमश्री” देऊन सन्मान केला.
२००२ साली टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना “मॅन ऑफ द ईयर” म्हणून निवडले.
२००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची “आशियातील एक पुढारी” म्हणून निवड केली.
२००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.
२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पदमविभूषण” देऊन गौरवले.
श्रीधरन यांनी रेल्वेला दिलेले हे योगदान सुवर्णाक्षरांनीच लिहावे लागेल. त्यांनी कोलकाता आणि दिल्लीतले 'मेट्रो' प्रकल्प यशस्वी करून दाखविलेच. पण आज ७६० किलोमीटर धावणारी कोकण रेल्वे हा श्रीधरन यांच्या कर्तबगारीचा अजोड नमुना आहे. ९३ बोगदे आणि दीडशे पूल असणारा हा मार्ग स्वप्नातून सत्यात आला तो श्रीधरन यांच्या अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापकीय कौशल्यांमुळे.
निष्कलंक चारित्र्य, अखंड परिश्रम, स्वत:ची प्रतिभा समाजासाठी वापरण्याची बुद्धी आणि समावेशक नेतृत्व यातून मोठी कामे कशी उभी करता येतात, याचे ई. श्रीधरन हे मूर्तिमंत रूप आहे.
आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्याु परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन ३१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त झाले.
कोकण रेल्वेचे शिल्पकार... निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करणाऱ्या "मेट्रो मॅन" ई. श्रीधरन यांना संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...!!!
ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि ह्या पुढेही त्यांच्या कडून अशीच देशाची सेवा घडो आणि आपल्या देशात असे शेकडो ई. श्रीधरन उदयाला येवोत हीच ईश्वरा कडे प्रार्थना..!!
No comments:
Post a Comment