Showing posts with label राजकीय. Show all posts
Showing posts with label राजकीय. Show all posts

Tuesday, 8 January 2013

हिंदुहृदयसम्राट, एक खदखदता ज्वालामुखी- बाळासाहेब ठाकरे



एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताची तर्जनी हवेत उंचावत, तर कधी दोन्ही हात, बाहू पसरावेत तसे विस्तारलेले....लाखो सैनिकांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राच्या राजकरणात सतत निर्णायक आणि रोख ठोक भूमिका घेणारे तळपते राजकीय नेते....अफाट प्रतिभा  असलेला व्यंगचित्रकार.... असमान्य असलेला, पण सदैव सामान्य राहिलेला  माणूस  म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...... मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट....!!

सत्ता हातात असूनसुद्धा लोकप्रियता मिळविणे सोप्पे नसते. कारण एकाला खुश करणे म्हणजे इतर अनेकांना दुखावणे असे विचित्र समीकरण असते. आपली माणसेच पुढे आणायची झाली तर इतर गुणवान लोक दुखावले जाऊन दुरावतात. त्यांना न्याय द्यायचा तर आपली वाटणारी माणसे तोडली जातात. मात्र गेली पाच दशके या माणसाने संपूर्ण देशावर अक्षरशः गरुड केले. हा माणूस जितका सामान्यांना कळला तितका तर बुद्धीवाद्यांनाही कधी कळला नसेल....एखाच्या लोकनेत्याने असे अफाट प्रेम मिळवणे म्हणजेही फार मोठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रात आणि बाहेरच्याही असंख्यांना बाबासाहेबांची अफाट लोकप्रियता म्हणजे एक न उलगडणारे कोडेच वाटते.

आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळणाऱ्या प्रबोधनकार उर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. घरातील प्रबोधनाची परंपरा पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा आणि अस्सल मराठी बाण्याचा  वडील प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.  पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी  ऑगस्ट, १९६० मध्ये मार्मिकहे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे मार्मिकनाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.  संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली.

प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा यासाठी बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, उद्योग आहेत,पैसा आहे पण तरीही  मराठी माणूस गरीब-बेरोजगार आहे. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील)  मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. सुरवातीला शिवसेना आणि हिंदुत्त्वाची बाळासाहेबांची भूमिका या दोन्ही गोष्टी व्यवहारात उतरणे अशक्य असेच वाटले होते. पण या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. गर्व से कहो हम हिंदू हैया घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था-साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे - अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही  अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.

महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे  अत्यंत गरीब कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी  त्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठाच दिली नाही तर राज्याच्या सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीत नेऊन बसवले.  बाळासाहेबांचा केंद्रबिंदू  नेहमी मुंबई आणि महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस  होता. कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत चारीत्र्यापेक्षाही संघटात्मक गुणवत्तेला त्यांनी विशेष महत्व दिले आणि समाजकारणातूनच शिवसेनेच्या राजकारणाची  मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.


बाळासाहेब केवळ व्यंगचित्रकार नव्हते किंवा केवळ राजकीय नेतेसुद्धा नव्हते. ते एक सजग आणि एक चोखंदळ वाचक होते, रसिक श्रोते देण्याची दिलदारी त्यांच्यात होती. असे  विविध पैलू असणारा, रसिकत्वाची वरची यत्ता असणारा राजकीय नेता आता होणे कठीणचं आहे. अनेकदा एखादे कलावंत व्यक्ति राजकारणाकडे वळली, त्यात यशस्वी झाली की ती आपले कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या फळताळात ढकलून मोकळी होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातला व्यंगचित्रकार  कधीच अव्हेरला नाही. उलट मनातील व्यंगचित्रांच्या कल्पनांना त्यांनी शाब्दिक स्वरूप देत आपल्या भाषणाची तिरकस शैली विकसित केली. बाळासाहेब खरे तर हाडाचे रसिक आणि कलाकारही. पण त्यांच्यामध्ये अन्यायाची आणि मराठी माणसाबद्दल लोभ ही दोन्ही प्रचंड प्रमाणात होती. लेखणी आणि कुंचला प्रभावीपणे चालवण्याचे सामर्थ्य होते. वक्तृत्वाची पकड तर सर्वानी पहिलीच आहे. अत्यंत फटकळ जीभ असूनही माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती.

प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यात ज्वलजहाल वाणीचे साम्य होते. दोघेही स्पष्टवक्ते आणि बंडखोर वृत्तीचे. प्रबोधनकारांच्या बौद्धिक पातळीवर किंवा त्यांच्यासारखे ते चिकित्सक नव्हते. पण लोकांच्या मनात काय चाललं आहे , याची नेमकी नस बाळासाहेबांना कळली होती. त्याच्या भाषणात व्यंगचित्र नव्हते , तर पंचलाईन होती. ती सामान्यांना भिडायाची. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरी मशीद पडली तेव्हा भाजप नेत्यांनी काखा वर केल्या. देशात हिंदुत्त्ववाद्यांमध्ये एकमेव बाळासाहेब असे होते जे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्याचा गर्व आहे म्हणत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

एवढी मोठी संघटना बांधणे, सत्तेचा मोह बाजूला ठेऊन ती चालवणे, मतांचा राजकारणात महाग पडली तरी सडेतोड भाषा वापरणे आणि धडाकून निर्णय घेऊन तो अमलात आणणे असे गुण अलीकडच्याच नेतृत्वात सापडणे अवघडच आहे. सर्वस्व पणाला लावण्याचा जुगार खेळण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. सत्ता नव्हती तेव्हाही आणि सत्ता आली आणि गेली तरीही ज्यांच्या  सामाजिक, राजकीय भूमिकेत तसूभरही फरक पडणार नाही, असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व देशाच्या राजकारणात आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे . बेरीज वजाबाकी , फायद्या-तोट्याचा विचार न  करता बेधडक राजकारण करणारा हा उमदा  आणि दिलदार नेता , एकदा शब्द दिला की तो पाळायचाचं , त्यासाठी वाटेल तेवढी टीका झाली तरी चालेल, पण माघारचा  घ्यायची नाही हा त्यांचा रघुकुल बाणा. त्यासाठीच्या राजकीय परिणामांची तमा न बाळगता, आपल्या मार्गाने जाणारा हा मनस्वी नेता. 
अशा या हिंदुहृदयसम्राटाला त्रिवार वंदन...!!!

आले किती,गेले किती, संपले भरारा,
तुझ्या परी नामाचा रे, अजुनी दरारा.....
अजुनी दरारा….

जय महाराष्ट्र !!

Saturday, 28 July 2012

समाजवादी विचारांचा दीपस्तंभ- मृणाल गोरे.


सर्वसामान्यांच्या समस्यांवर रण उठवून सरकारची झोप उडविणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या, माजी खासदार व राज्याच्या माजी विरोधी पक्षनेत्या..८४ वर्षाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष  वृतीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या...तळपणारी झुंजार वृत्ती, निखळ चरित्र, त्यागमय जीवन आणि गोरगरिबांनाबद्दलची अपार करुणा  असणाऱ्या मृणाल गोरे...

मतदार आणि नेते यांच्या जगण्यात फार फरक नसण्याच्या..आणि राजकारणात साधेपणा ही फक्त मिरविण्याची गोष्ट नव्हती आणि साधे राहणार्याची अवहेलनाही केली जात नव्हती या काळात समाजाचे नेतेपण करणाऱ्या  मृणाल गोरे... महागाई विरोधात अविरतपणे लढणाऱ्या व्यक्तींची नावे कोणालाही विचारली तर मृणाल गोरे या नावापासूनच प्रारंभ होईल.. घरोघरी वापरल्या जाणाऱ्या लाताण्याला शस्त्र बनवून सत्ताधारी वर्ग, पोलीस व अखिल पुरुष वर्गावर लाटण्याची दहशत बसविणाऱ्या मृणाल गोरे...

मृणालताईंचे  वडील एका प्रख्यात शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. दोन भाऊ व एक बहिण डॉक्टर असल्यामुळे मृणालताईंनीही डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. पण एस.एम. जोशी, मधू लिमये, भाऊसाहेब रानडे यांच्या भाषणांनी प्रभावित झालेल्या मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण सुरु असतानाच एक दिवस अचानक शिक्षण सोडून सामाजिक कार्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २०व्या वर्षी  राष्ट्र सेवा दलाच्या कामात स्वतःला झोकून दिले. तिथे त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीला  कलाटणी मिळाली .बंडू गोरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर १९४८ मध्ये मुंबईच्या गोरेगाव उपनगरातील टोपीवाला  बंगल्यात राहायला आल्यावर स्त्रियांचे मंगळागौरी, हळदीकुंकू असे सन करण्याएवजी संतती नियमन प्रसारावर त्यांनी भर दिला. सामाजिक टीका होत असतांनाही त्यांनी सुमारे १५ वर्ष हे प्रसार केंद्र चालविले.

अत्यंत साधी रहाणी आणि समाजकार्य  करताना कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तयारी पत्करून सामाजिक काम सुरु केले. कधी अंगणवाडी सेविकांच्या  तर कधी कचारावेचून जगणाऱ्या उपेक्षितांच्या प्रश्नांकरिता सदैव झगडत राहिल्या. वैचारिक निष्ठा आणि सामान्यांच्या समस्यांवर आवाज उठविण्यात त्या सतत आघाडीवरच राहिल्या. अंतुले मुख्यमंत्री असतांना गाजलेल्या सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी रण माजविले.

मृणाल गोरे या सत्तास्थानी कधी नव्हत्या किंबहुना पंतप्रधान मोरजी  देसाई व पंतप्रधान चरणसिंग या दोघानीही मंत्रीपद स्वीकारण्याची केलेली विनंती त्यांनी अव्हेरली होती.  महिल्यांच्या वाट्याला सत्तास्थाने क्वचितच येतात. ती नाकारली जाणे अशक्यच. अशा अशक्य उदाहरणातील व्यक्ति म्हणजे मृणालताई गोरे... मंत्रीपद नसले तरी लोकप्रतिनिधी म्हणून अगदी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ते नगरसेवक, आमदार,विरोधी पक्षनेते आणि खासदार अशा पदांवरून त्यांनी सातत्याने जनसेवा केलेली असून सर्व पदांवरून त्यांनी केलेले प्रतिनिधित्त्व हे अत्यंत परिणामकारक ठरले होते. महानगरपालिकेत जाण्यापूर्वीच झोपडीवासीयांच्या पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे  संबंध देश त्यांना ‘पाणीवालीबाई’ म्हणून ओळखू लागला होता. म्हणूनच  गोरेगावकर नागरिकांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिले होते. तीन डोंगरी झोपडपट्टीचे  मालवणी मध्ये घडविलेले पुनर्वसन तर “The saga of  Tin Dongri” म्हणून इंग्रजी वर्तमानपत्रांनी खूप नावाजले होते.

लोहियांच्या विचारशालेतील असलेल्या मृणालताई  १९७२ मध्ये इंदिरा लाटेवर मत करीत सहजपणे विधानसभेत निवडून आल्या. विधानसभेत दाखल होताच वडखळ नाका व दर्डा प्रकरण मृणालताईंनी गाजून सोडले. पण विशेष गाजला तो लाटणी मोर्चा तसेच महागाई प्रतिकार महिला सभेचे अन्य लढे. त्यामध्ये अहिल्याबाई रांगणेकर, कमलाताई  देसाई, तर रेड्डी अशा महिला नेत्यांनी त्यांना जबरदस्त साथ दिली.  १९७५ च्या आणीबाणीच्या काळात भूमिगत राहूनही त्यांनी  केलेले राजकीय कार्य असो वा महागाईच्या प्रश्नावर निघालेला त्यांचा प्रसिद्ध लाटणे मोर्चा असो मृणाल गोरे हे नाव घरोघरी पोहचले होते  आणि त्यांची स्वतंत्र अशी एक विधायक दहशत होती.  विधायक यासाठी की त्यांच्या कोणत्याही राजकारणात आक्रस्ताळेपणा नव्हता. पुढे शासनाने त्यांना पकडले आणि काही काळ महारोगी, वेड्या स्त्री कैद्यांच्या सहवासात ठेवले तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट आणीबाणीनंतर प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेल्या. मृणाल गोरे तुरुंग-मतपेटी व फावडा या डॉ. लोहियांच्या त्रिसूत्रीच्या साक्षात प्रतीक बनल्या होत्या .

मृणालताईंचे  वैशिष्ट्य असे की मंत्र्याला निरुत्तर करणारी आकडेवारी त्या सहजपणे मंत्र्यांच्या तोंडावर फेकीत असतं आणि लाटण्यापुढे हतबुद्ध होत असतं. त्या जशा विधानसभेतील वादविवादात पटाईत  होत्या त्याप्रमाणेच जनतेची भव्य ताकद उभी करून विधानसभेवर दबाव आणू शकत. त्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक शस्त्र वापरली, त्यात लाटणे, थाळीवादन , घेराव  तसेच न्यायालयातील याचिका हेही शस्त्र होते. गोंधळ घालून केवळ हवा निर्माण करावी आणि त्या हवेने निर्माण होणारी लोकप्रियतेची लाट कार्यपूर्ती मानून आनंद साजरा करावा हे गुण त्यांच्यात नव्हते.

“केवल हंगामा खडा करना मेरा मक्सद नाही,
मेरी कोशिश है की, ऐ सुरात बदलनी चाहिये...”
 या दुष्यंतकुमार  यांच्या कवितेप्रमाणेच मृणालताईंचे राजकारण होते. या राजकारणास समाजकारणाची समर्थ जोड होती. नागरी निवारा परिषद हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या कामाच्या स्वरूपातून प. बां. सामंत आदींच्या सहकार्याने त्यांनी मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. इंदिरागांधीनी आणलेल्या पण प्रत्यक्षात बिल्डर आणि सरकार यांना धार्जिणा अस कमाल जमीन धारणा कायदा योग्य प्रकारे राबविल्यास त्यातून किती भरीव काम करता येऊ शकते, याचे दृश्य उदाहरण निवारा परिषदेच्या निमित्ताने उभे राहिले. हा कायदा कालबाह्य ठरून हटविण्याच्या हालचाली सुरु झाल्या तेव्हा मृणालताईना कायदा वाईट नाही , त्याची निवडक अंबलबजावणी अयोग्य आहे, हे सांगण्याचा अधिकार या कामामुळे मिळाला.  
नागरी निवारा परिषद स्थापून अगदी थोड्या अवधीत सामान्य निराश्रित  जनतेकडून त्यांनी कोट्यावधी रुपये उभे केले आणि साडेतीनशे गृहसंस्थांची नोंदणी केली. इतकेच नव्हे तर फार मोठी जमीन शाश्नाकडून मिळवून ६ हजार घरे दिंडोशी येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी उभी केली. त्याशिवाय आपले पती केशव गोरे यांच्या स्मरणार्थ गोरेगाव येथे ‘केशव गोरे ट्रस्ट’ उभा केला . त्याबरोबरच स्त्रियांसाठी ‘स्वाधार ‘ ही संस्था स्थापन करून आपल्या विधायक कर्तुत्वाची ग्वाही समाजाला त्यांनी दिली. विधानसभा असो वां अन्य काही, एखादी प्रक्रिया बंद पाडून दाखवणे म्हणजे नेतृत्व सिद्ध करून दाखवणे, इतका संकुचीत  नेतृत्वावाद मृणालताईंमध्ये कधीच नव्हता.

मृणालताई जितक्या कर्तृत्ववान होत्या तितक्याच त्या सालस ,मनाने निष्कपट व आचाराने शालीन आपल्या कर्तृत्वाची चुकूनही प्रौढी न मिरविणाऱ्या निगर्वी व्यक्ति  होत्या. अनेक अडचणी, संकटे, मतभेद, फुटाफुटी, व्याधी यांना तोंड देत देत त्यांनी समाजवादाची लढाई अखंड चालूच ठेवली. जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता . मृणाल गोरे अखेरपर्यंत सध्या होत्या आणि त्यांचे साधेपण लोभस होते. याचे कारण त्यांचा  साधेपणा आतून आलेला होता  करता येईल आणि त्याची नाळ खऱ्या अर्थाने सामान्य माणसाशी जोडलेली होती.

वैयक्तिक पातळीवर, एरवी सामान्य स्त्रीला मोडून पाडणारे पतीवियोगाचे दुःख मृणालताईंनी सहज बाजूला केले आणि समाजकार्यात स्वतःला पूर्ण झोकून दिले.  त्या आपल्या मताशी ठाम होत्या पण कठोर नव्हत्या. आपल्या राजकीय भूमिकेशी नाही म्हणून समोरच्याशी संवादच साधला जाऊ नये, असं त्यांचा दृष्टीकोन कधीच नव्हता. त्याचमुळे भिन्न राजकीय विचारधारेतील नेत्यांशी  त्यांचे संबंध सौहार्दाचेच असायचे. सामान्यांचे जगणे किमान सुखकर करण्यासाठी काय करत येईल, याचा ध्यास त्यांना कायम होता आणि त्यांचे सारे राजकारण आणि समाजकारण त्या भोवतीच फिरत राहिले. आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या मृणाल गोरे  वयाच्या ८४व्या वर्षी १७ जुलै २०१२ ला पडद्याआड गेल्या.

मृणालपण  अबाधित राखीत रणनेतृत्त्व करणाऱ्या....सार्वजनिक जीवनातील दीपस्तंभ असलेल्या मृणाल गोरे या समाजवादी रणरागिणीस विनम्र श्रद्धांजली...!!!

संदर्भ:- लोकसत्ता...