सर्वसामान्यांच्या समस्यांवर रण उठवून
सरकारची झोप उडविणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या, माजी खासदार व राज्याच्या माजी
विरोधी पक्षनेत्या..८४ वर्षाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष वृतीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या...तळपणारी
झुंजार वृत्ती, निखळ चरित्र, त्यागमय जीवन आणि गोरगरिबांनाबद्दलची अपार करुणा असणाऱ्या मृणाल गोरे...
मतदार आणि नेते यांच्या जगण्यात फार फरक
नसण्याच्या..आणि राजकारणात साधेपणा ही फक्त मिरविण्याची गोष्ट नव्हती आणि साधे
राहणार्याची अवहेलनाही केली जात नव्हती या काळात समाजाचे नेतेपण करणाऱ्या मृणाल गोरे... महागाई विरोधात अविरतपणे
लढणाऱ्या व्यक्तींची नावे कोणालाही विचारली तर मृणाल गोरे या नावापासूनच प्रारंभ
होईल.. घरोघरी वापरल्या जाणाऱ्या लाताण्याला शस्त्र बनवून सत्ताधारी वर्ग, पोलीस व
अखिल पुरुष वर्गावर लाटण्याची दहशत बसविणाऱ्या मृणाल गोरे...
मृणालताईंचे वडील एका प्रख्यात शासकीय महाविद्यालयाचे
प्राचार्य होते. दोन भाऊ व एक बहिण डॉक्टर असल्यामुळे मृणालताईंनीही डॉक्टर
व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. पण एस.एम. जोशी, मधू लिमये, भाऊसाहेब
रानडे यांच्या भाषणांनी प्रभावित झालेल्या मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण सुरु
असतानाच एक दिवस अचानक शिक्षण सोडून सामाजिक कार्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला
आणि वयाच्या २०व्या वर्षी राष्ट्र सेवा
दलाच्या कामात स्वतःला झोकून दिले. तिथे त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीला कलाटणी मिळाली .बंडू गोरे यांच्याशी विवाह
झाल्यानंतर १९४८ मध्ये मुंबईच्या गोरेगाव उपनगरातील टोपीवाला बंगल्यात राहायला आल्यावर स्त्रियांचे
मंगळागौरी, हळदीकुंकू असे सन करण्याएवजी संतती नियमन प्रसारावर त्यांनी भर दिला.
सामाजिक टीका होत असतांनाही त्यांनी सुमारे १५ वर्ष हे प्रसार केंद्र चालविले.
अत्यंत साधी रहाणी आणि समाजकार्य करताना कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तयारी
पत्करून सामाजिक काम सुरु केले. कधी अंगणवाडी सेविकांच्या तर कधी कचारावेचून जगणाऱ्या उपेक्षितांच्या
प्रश्नांकरिता सदैव झगडत राहिल्या. वैचारिक निष्ठा आणि सामान्यांच्या समस्यांवर
आवाज उठविण्यात त्या सतत आघाडीवरच राहिल्या. अंतुले मुख्यमंत्री असतांना गाजलेल्या
सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी रण माजविले.
मृणाल गोरे या सत्तास्थानी कधी नव्हत्या
किंबहुना पंतप्रधान मोरजी देसाई व
पंतप्रधान चरणसिंग या दोघानीही मंत्रीपद स्वीकारण्याची केलेली विनंती त्यांनी
अव्हेरली होती. महिल्यांच्या वाट्याला
सत्तास्थाने क्वचितच येतात. ती नाकारली जाणे अशक्यच. अशा अशक्य उदाहरणातील व्यक्ति
म्हणजे मृणालताई गोरे... मंत्रीपद नसले तरी लोकप्रतिनिधी म्हणून अगदी गोरेगाव
ग्रामपंचायतीचे सदस्य ते नगरसेवक, आमदार,विरोधी पक्षनेते आणि खासदार अशा पदांवरून
त्यांनी सातत्याने जनसेवा केलेली असून सर्व पदांवरून त्यांनी केलेले
प्रतिनिधित्त्व हे अत्यंत परिणामकारक ठरले होते. महानगरपालिकेत जाण्यापूर्वीच
झोपडीवासीयांच्या पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे संबंध देश त्यांना ‘पाणीवालीबाई’ म्हणून ओळखू
लागला होता. म्हणूनच गोरेगावकर नागरिकांनी
त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिले होते. तीन डोंगरी झोपडपट्टीचे मालवणी मध्ये घडविलेले पुनर्वसन तर “The
saga of Tin Dongri” म्हणून
इंग्रजी वर्तमानपत्रांनी खूप नावाजले होते.
लोहियांच्या विचारशालेतील असलेल्या
मृणालताई १९७२ मध्ये इंदिरा लाटेवर मत
करीत सहजपणे विधानसभेत निवडून आल्या. विधानसभेत दाखल होताच वडखळ नाका व दर्डा
प्रकरण मृणालताईंनी गाजून सोडले. पण विशेष गाजला तो लाटणी मोर्चा तसेच महागाई
प्रतिकार महिला सभेचे अन्य लढे. त्यामध्ये अहिल्याबाई रांगणेकर, कमलाताई देसाई, तर रेड्डी अशा महिला नेत्यांनी त्यांना
जबरदस्त साथ दिली. १९७५ च्या आणीबाणीच्या
काळात भूमिगत राहूनही त्यांनी केलेले
राजकीय कार्य असो वा महागाईच्या प्रश्नावर निघालेला त्यांचा प्रसिद्ध लाटणे मोर्चा
असो मृणाल गोरे हे नाव घरोघरी पोहचले होते
आणि त्यांची स्वतंत्र अशी एक विधायक दहशत होती. विधायक यासाठी की त्यांच्या कोणत्याही
राजकारणात आक्रस्ताळेपणा नव्हता. पुढे शासनाने त्यांना पकडले आणि काही काळ
महारोगी, वेड्या स्त्री कैद्यांच्या सहवासात ठेवले तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट
आणीबाणीनंतर प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेल्या. मृणाल गोरे तुरुंग-मतपेटी व
फावडा या डॉ. लोहियांच्या त्रिसूत्रीच्या साक्षात प्रतीक बनल्या होत्या .
मृणालताईंचे वैशिष्ट्य असे की मंत्र्याला निरुत्तर करणारी
आकडेवारी त्या सहजपणे मंत्र्यांच्या तोंडावर फेकीत असतं आणि लाटण्यापुढे हतबुद्ध
होत असतं. त्या जशा विधानसभेतील वादविवादात पटाईत
होत्या त्याप्रमाणेच जनतेची भव्य ताकद उभी करून विधानसभेवर दबाव आणू शकत.
त्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक शस्त्र वापरली, त्यात लाटणे, थाळीवादन , घेराव तसेच न्यायालयातील याचिका हेही शस्त्र होते. गोंधळ
घालून केवळ हवा निर्माण करावी आणि त्या हवेने निर्माण होणारी लोकप्रियतेची लाट
कार्यपूर्ती मानून आनंद साजरा करावा हे गुण त्यांच्यात नव्हते.
“केवल हंगामा खडा करना मेरा मक्सद नाही,
मेरी कोशिश है की, ऐ सुरात बदलनी चाहिये...”
या
दुष्यंतकुमार यांच्या कवितेप्रमाणेच
मृणालताईंचे राजकारण होते. या राजकारणास समाजकारणाची समर्थ जोड होती. नागरी निवारा
परिषद हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या कामाच्या स्वरूपातून प. बां. सामंत
आदींच्या सहकार्याने त्यांनी मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयोग
यशस्वी करून दाखवला. इंदिरागांधीनी आणलेल्या पण प्रत्यक्षात बिल्डर आणि सरकार
यांना धार्जिणा अस कमाल जमीन धारणा कायदा योग्य प्रकारे राबविल्यास त्यातून किती
भरीव काम करता येऊ शकते, याचे दृश्य उदाहरण निवारा परिषदेच्या निमित्ताने उभे
राहिले. हा कायदा कालबाह्य ठरून हटविण्याच्या हालचाली सुरु झाल्या तेव्हा
मृणालताईना कायदा वाईट नाही , त्याची निवडक अंबलबजावणी अयोग्य आहे, हे सांगण्याचा
अधिकार या कामामुळे मिळाला.
नागरी निवारा
परिषद स्थापून अगदी थोड्या अवधीत सामान्य निराश्रित जनतेकडून त्यांनी कोट्यावधी रुपये उभे केले आणि
साडेतीनशे गृहसंस्थांची नोंदणी केली. इतकेच नव्हे तर फार मोठी जमीन शाश्नाकडून
मिळवून ६ हजार घरे दिंडोशी येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी उभी केली. त्याशिवाय आपले
पती केशव गोरे यांच्या स्मरणार्थ गोरेगाव येथे ‘केशव गोरे ट्रस्ट’ उभा केला .
त्याबरोबरच स्त्रियांसाठी ‘स्वाधार ‘ ही संस्था स्थापन करून आपल्या विधायक
कर्तुत्वाची ग्वाही समाजाला त्यांनी दिली. विधानसभा असो वां अन्य काही, एखादी
प्रक्रिया बंद पाडून दाखवणे म्हणजे नेतृत्व सिद्ध करून दाखवणे, इतका संकुचीत नेतृत्वावाद मृणालताईंमध्ये कधीच नव्हता.
मृणालताई जितक्या कर्तृत्ववान होत्या
तितक्याच त्या सालस ,मनाने निष्कपट व आचाराने शालीन आपल्या कर्तृत्वाची चुकूनही
प्रौढी न मिरविणाऱ्या निगर्वी व्यक्ति
होत्या. अनेक अडचणी, संकटे, मतभेद, फुटाफुटी, व्याधी यांना तोंड देत देत
त्यांनी समाजवादाची लढाई अखंड चालूच ठेवली. जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या
अध्यक्षपदी असतांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता . मृणाल गोरे
अखेरपर्यंत सध्या होत्या आणि त्यांचे साधेपण लोभस होते. याचे कारण त्यांचा साधेपणा आतून आलेला होता करता येईल आणि त्याची नाळ खऱ्या अर्थाने सामान्य
माणसाशी जोडलेली होती.
वैयक्तिक पातळीवर, एरवी सामान्य स्त्रीला
मोडून पाडणारे पतीवियोगाचे दुःख मृणालताईंनी सहज बाजूला केले आणि समाजकार्यात
स्वतःला पूर्ण झोकून दिले. त्या आपल्या
मताशी ठाम होत्या पण कठोर नव्हत्या. आपल्या राजकीय भूमिकेशी नाही म्हणून
समोरच्याशी संवादच साधला जाऊ नये, असं त्यांचा दृष्टीकोन कधीच नव्हता. त्याचमुळे
भिन्न राजकीय विचारधारेतील नेत्यांशी
त्यांचे संबंध सौहार्दाचेच असायचे. सामान्यांचे जगणे किमान सुखकर
करण्यासाठी काय करत येईल, याचा ध्यास त्यांना कायम होता आणि त्यांचे सारे राजकारण
आणि समाजकारण त्या भोवतीच फिरत राहिले. आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष
वृत्तीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या मृणाल गोरे
वयाच्या ८४व्या वर्षी १७ जुलै २०१२ ला पडद्याआड गेल्या.
मृणालपण
अबाधित राखीत रणनेतृत्त्व करणाऱ्या....सार्वजनिक जीवनातील दीपस्तंभ
असलेल्या मृणाल गोरे या समाजवादी रणरागिणीस विनम्र श्रद्धांजली...!!!
संदर्भ:- लोकसत्ता...
No comments:
Post a Comment