Friday 6 July 2012

स्वामीनिष्ठ शूरवीर मावळे- बाजीप्रभू देशपांडे

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमेच्या दिवशी  आपल्या पराक्रमाने... रक्ताने घोड़खिंडला पावनखिंडीत बदलणारे...आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंशी झुंजणारे स्वामिनिष्ठ  शिवरायांचे शूरवीर मावळे बाजीप्रभू देशपांडे...

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बाजीप्रभू हे शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे दिवाण होते, परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला शिवा काशीद चे खरे रूप आणि राजे आपल्या हातून निसटल्याचे कळले तसेच त्यांनी त्यांचा सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले.
शिवरायांचे ६००मावळे पालखी घेऊन वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत विजेच्या वेगाने विशाळगडाकडे  पळत सुटले होते. बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने हातात नंग्या तलवारी घेउन धावत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते. महाराज पांढरपाणीला येउन पोचले त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते.

धोका वाढत जातोय आणि  कुठल्याही क्षणी शत्रूंची धाड पडेल असे वाटत असतानाच  मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले, राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण स्वामीभक्त बाजींनी आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. जोपर्यंत तुम्ही छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले आणि बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.

एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजीप्रभूंनी तलवारीच्या टप्यात येणाऱ्या प्रत्येकजणाला यमसदनी पाठवले. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली. बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत असतांना शत्रूने त्यांच्यावर डाव साधला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजीप्रभूंनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले आणि म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला."  फुलाजीप्रभुंची तलवार दुसऱ्या हाती घेऊन बाजीप्रभू अधिक त्वेषाने लढले. रक्ताचे अर्ह्य ओसंडत असतांनाही त्यांनी शत्रूंची वाट सोडली नाही. शत्रूंच्या पायदळ सैनिकामधून एकाने ठासणीच्या बंदूकीतून बाजीप्रभूंवर गोळी झाडली. ती गोळी बाजीप्रभूंच्या खांद्यात घुसली आणि त्यांचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी."

सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता.

विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने बाजीप्रभूंनी प्राण सोडले.  या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
.

बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही मोठा पराक्रम गाजविनाऱ्या बाजीप्रभू-फुलाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांना कोटी कोटी प्रणाम....!!!

 

No comments:

Post a Comment