Showing posts with label ऐतिहासिक व्यक्तिमत्व. Show all posts
Showing posts with label ऐतिहासिक व्यक्तिमत्व. Show all posts

Tuesday, 24 July 2012

सिंहासारखा शूरवीर,निष्ठावंत मराठी सरदार- तानाजी मालुसरे



तानाजी मालुसरे हे मराठ्यांचे शूर योद्धे...कोंढाणातील लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढाणा(सिंहगड) स्वराज्यात परत आणणारे...आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर...!

सातारा जिल्ह्यातील, जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच संगमेश्वर काबीज केल्यावर सुर्व्यांनी अचानकपणे रात्री केलेल्या हल्लाला अतिशय शौर्याने मोडून काढत मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले होते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच ते रायगड जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ) गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.

आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले. कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता, या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असतानांही, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता.

कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी) राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले. दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली. लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.

तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला, मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून निकराची लढाई करत हा किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता.
  
दुसऱ्या दिवशी राजे गडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले. त्यानंतर त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या तानाजींच्या गावी पाठवले.  ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. सिहंगडावर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी उभारला आहे. ते ज्या ठिकाणी राहत असत, त्या रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

आपल्या धन्याच्या वचनाला जागून कोंढाणा उर्फ सिंहगड हा अभेद्य मानलेला किल्ला उदयभान राठोड सारख्या किल्लेदारापासून मोठ्या मर्दुमकीनें एका रात्रीत हल्ला करून ताब्यात घेणारे तानाजी खरोखरच सिंह होते... 
अशा या सिंहाला आणि त्यांच्या बंधू सूर्याजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...!!!

-संग्रहीत.

Friday, 6 July 2012

स्वामीनिष्ठ शूरवीर मावळे- बाजीप्रभू देशपांडे

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमेच्या दिवशी  आपल्या पराक्रमाने... रक्ताने घोड़खिंडला पावनखिंडीत बदलणारे...आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंशी झुंजणारे स्वामिनिष्ठ  शिवरायांचे शूरवीर मावळे बाजीप्रभू देशपांडे...

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बाजीप्रभू हे शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे दिवाण होते, परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला शिवा काशीद चे खरे रूप आणि राजे आपल्या हातून निसटल्याचे कळले तसेच त्यांनी त्यांचा सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले.
शिवरायांचे ६००मावळे पालखी घेऊन वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत विजेच्या वेगाने विशाळगडाकडे  पळत सुटले होते. बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने हातात नंग्या तलवारी घेउन धावत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते. महाराज पांढरपाणीला येउन पोचले त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते.

धोका वाढत जातोय आणि  कुठल्याही क्षणी शत्रूंची धाड पडेल असे वाटत असतानाच  मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले, राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण स्वामीभक्त बाजींनी आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. जोपर्यंत तुम्ही छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले आणि बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.

एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजीप्रभूंनी तलवारीच्या टप्यात येणाऱ्या प्रत्येकजणाला यमसदनी पाठवले. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली. बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत असतांना शत्रूने त्यांच्यावर डाव साधला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजीप्रभूंनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले आणि म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला."  फुलाजीप्रभुंची तलवार दुसऱ्या हाती घेऊन बाजीप्रभू अधिक त्वेषाने लढले. रक्ताचे अर्ह्य ओसंडत असतांनाही त्यांनी शत्रूंची वाट सोडली नाही. शत्रूंच्या पायदळ सैनिकामधून एकाने ठासणीच्या बंदूकीतून बाजीप्रभूंवर गोळी झाडली. ती गोळी बाजीप्रभूंच्या खांद्यात घुसली आणि त्यांचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी."

सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता.

विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने बाजीप्रभूंनी प्राण सोडले.  या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
.

बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही मोठा पराक्रम गाजविनाऱ्या बाजीप्रभू-फुलाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांना कोटी कोटी प्रणाम....!!!

 

Monday, 14 May 2012

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज...
सिंहाचा छावा.......

जन्म :- १४ मे इ.स.१६५७
मृत्यू :- ११ मार्च इ.स १६८९


मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते. आठ भाषांचे जाणकार असणारे ‘बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिणारे राजे. आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट करून , स्वराज्यातील एकही किल्ला न गमावता , मराठ्यांचे आरमार शक्तीशाली करणारे छत्रपती संभाजीराजे. औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविणारा मराठ्यांचा हा छावा....

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ' राजेंच्या दुधाई बनल्या. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच, राजकारण लवकर आत्मसात केले. विद्याभ्यास, घोडस्वारी, शास्त्रविद्या, दंडनिती, राजधर्म , राजपुत्र धर्म, पितृसेवा, राजकारण अशा प्रकारे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण त्यांना दिले गेले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची जडणघडण अतिशय काटेकोर पद्धतीने राजमाता जिजाऊंच्या देखरेखी खाली होत गेली.

छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले. आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती. त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.


१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी राजे दुसऱ्यांदा पोरके झाले. तर छत्रपती राजारामाचा जन्म झाल्यामुळे सोयराबाई संभाजी राजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या. संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते, त्यांना भ्रष्टाचार खपत नसे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले. शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी महाराणी सोयराबाईंना फूस लावून शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले आणि संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले.

छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली, तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता, जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल. पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तृत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी सोयराबाईंकरवी महाराजांना, संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला. महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी, लेखक जागा झाला. या कालावधीत त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. ‘बुधभूषणम्’ हा संस्कृत तर ‘नायिकाभेद’ , ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत निपुण असणाऱ्या संभाजीचे संस्कृत व हिंदी या भाषांवरील प्रभुत्व या ग्रंथांवरून दिसून येते.
याच काळात शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला. पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला. संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत, असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला. तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.

आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले. अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला. मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला. येथे संभाजी राजेंचा निर्णय चुकला. दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला. शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली. संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली. पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला. मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले. तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट घडली. संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.

१५ मार्च १६८० राजारामच्या विवाहानंतर काही दिवसांनीच म्हणजे ३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले. ही बातमी सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळी यांनी संभाजी राज्यांना कळवलीच नाही उलट लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे ठरवून २१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले. मोरोपंत,प्रल्हाद निराजी आणि अण्णाजी दत्तो या मंडळीनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे पाठविण्यात आले. त्याप्रसंगी हंबीरराव मोहिते (सोयराबाईंचे सख्खे बंधू) यांनी संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत तसेच मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडे आहे. त्यातच मोघल सुभेदार बहादुरखान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता. अशा वेळी राजारामला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते. या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून ते संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिले.

सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक, किल्ले रायगडावर झाला. या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले. पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली, तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्याी परली गावात हत्तीच्या पायी दिले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. त्यानंतर बुर्हाबणपुरची मोहिम, मोघलांशी लढा, सिद्दीचा बंदोबस्त, रामसेजचा ऐतिहासिक लढा, म्हैसूरकर चिक्कदेवराजाचा बंदोबस्त, गमेश्वरला दगा अशा केवळ ९ वर्षांच्या काळात तब्बल १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.

याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्याम धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्यांामुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली.

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर संभाजी राजे यांना ३५५व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा..!!!

जय जिजाऊ !!
जय शंभूराजे !!
जय शिवराय !!

Thursday, 22 March 2012

तुटेल मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी - सरदार कान्होजी जेधे

सरदार कान्होजी जेधे
स्वामिनिष्ठ महापुरुष....
तुटेल मस्तक परी उलटा फिरेल शब्द इमानी ----सरदार कान्होजी जेधे
एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ टेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदिच सुरूवातीपासून जे होते त्यांपैकी विशेष उल्लेख हा सरदार कान्होजीराजे जेधे यांचा करावा लागतो... सरदार कान्होजी जेधे हे इतर सरदारच्या लालची वतनवाडी पेक्षा ते स्वामिनीष्ट कार्यतर जीवन जगले. अशा महापुरषावर महाकाव्यच होवे !
कान्होजी जेधे यांचा जन्म कारीगावी झाला. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या नंतर मात्रोश्रीची, अगदी काही दिवसाच्या लहान मुलांला पोरका होण्याचा महाशाप मिळाला. यावेळी कान्होजी जेध्यांचा जीवावर भेटलेल्या प्रसंगात; जेध्यांचे इमानी स्वामीनिष्ठ चाकरीत असलेले देवजी महाल्याच्या साह्याने तान्ह्या कान्होजीचे प्राण बचावले. रानावनांत फिरत तेंही कान्होजीचा सांभाळ केला. पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची देखभाल करून योग्य मुत्सद्दी, राजकारणी योद्धा, युद्धतंत्राचेही परिपूर्ण शिक्षण दिले. कान्होजी जेधे मूळ कारी गावी येऊन आपल्या मातापिताच्या बलिदानाचा सुढ मिळवून कारी-अंबवडे गावासह त्यांनी रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली
...
संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने सचोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता. कितीही अवघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते. ते म्हणजे शिडया माळा लाऊन सैनिक गडावर चढविणे गड सर करणे. तसेच मलिक अंबर या निजामशहाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होतो. त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखून निजामशाही पासून कान्होजी नांवारुपास आले होते... सन .. १६१९ रोजी काही ऐतिहासिक निजामशहाच्या कागदपत्रा मध्येकान्होजी राजे जेधे’ असा उल्लेख दिसून येतो
.
आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखाननी शहाजीराजांना कान्होजीचा परिचय करून दिला होतो. ही घटना साधारण .. १६३५ च्या दरम्यानची आहे. नंतर .. १६३६ च्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीस राहिले, तेव्हा रणदुल्लाखानाकडून शहाजीराजांनी कान्होजीस आपणांकडे मागून घेतले. सन १६४८ साली शहाजीराजांसोबत कान्होजीना देखील नजर कैदेत जिंजीत राहिले
...
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते. “कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात. अनुभवी आहत. बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.” असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली. शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजीराजांचेकडे येवून त्यांना म्हणाले, “महाराजांनी (शहाजी) शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास पाचजण लेक आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ” असे म्हणून यांनी स्वराज्याच्या कार्यात सामील झाले
.
शिवाजी महारांजानी .. १६५५ ते ५६ च्या दरम्यान जावळीचा मोर्यांना शासन करून जावळीचा सर्व मुलुख स्वराज्यात दाखल केला. कान्होजी जेधे त्याचे समर्थक बांदल, शिळीमकर, वगैरे देशमुखानी या कामी छत्रपतींना सहाय्य केले. शिवाजीराजांनी रायगड या किल्याच कब्जा कान्होजी जेधे यांच्यामार्फत घेतला. जरी कान्होजी जेधे असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते. तरीही ते आदिलशाहीच्या सेवेत होते. वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात मोठे सहाय्य इमानी करत होते... आदिलशाहीचा बराच मुलुख काही किल्ले शिवाजीराजांनी स्वराज्यात दाखल केलेले होते. त्यामुळे आदिलशहा शिवाजीराजांवर चिडून होतो, शेवट आदिलशाहीतून अफजलखानाने शिवाजी महाराजांना धरून अथवा मारून आणण्याची घोर प्रतिज्ञा करून विडा उचलून मावळाकडे निघाला होतो.
१६ जून १६६५९ कान्हीजी जेधे यांना आदिलशहाने पाठविलेले फर्मान असे, “शिवाजी अविचारीने अज्ञानाने निजामशाहीत. कोंकणातील मुसलमानांना त्रास देऊन लुट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याचे पराभवार्थ... शिवरायांना पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवरायांचे निसवतीचे लोकास आश्रय देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छिणे. खानच्या सांगण्यावरून.... तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याचे सांगण्याप्रमाणे वागावे, तसे केल्यास परिणाम चांगला होणार नाही.”
आदिलशहाचे हे फर्मान कान्होजीस मिळताच त्यांच्या जीवनातील सत्व परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला... कान्होजी जेधे यांनी या फार्मांचा कोणताही मुलाहिजा ठेवला नाही. ते थेट आपल्या पुत्र लष्करी जमाव घेऊन शिवाजीराजांकडे आले, “या पुढे खस्त होऊ ( मरण पत्करू ) तेव्हा आमचे वतन कोण खावे, आम्ही इमानानी अंतर करणार नाही असे म्हणून बेल भंडार उचलून शपथ घेतली. आपल्या वतनावर पाणी सोडले” हे दर्शविण्यासाठी पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेवून डाव्या हाताने राजांच्या पायांवर पाणी सोडले आपल्या निष्ठेची प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली. छत्रपति शिवाजी महाराज दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला की, “तुमचे तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.” असे म्हणून शपथ दिली. त्यानंतर शिवाजीराजांनी कान्होजीस हुमूम केला की, वरकड मावळचे देशमुख तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुद्दा मनास आणणे. तसेच तुमचा काबिल कारीस आहे, तो ढमढेऱ्यांचे तालेगावास पाठवा
.”
कान्होजी जेधे पुढे महाराजांच्या मसलतीनुसार मावळातील देशमुखांना भेटून घडला सर्व वृतांत त्यांना कथन केला की, “स्वामींच्या पायासी इमान धरून वातनास देखील पाणी सोडीले आम्ही आपले लोक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे. मुसलमान (अफजलखान) बेईमान आहे. कार्य जालियावर नस्ते निमित्य ठेऊन नाश करील. हेमऱ्हाष्ट्र राज्य’ आहे. अवधियांनी हिंमत धरून, जमाव घेवून, राजश्री स्वामीसंनिध राहोन, येक निष्ठेने सेवा करावी.” कान्होजी जेधे यांच्या बरोबर सर्व देशमुख मंडळी एकमुखाने संमती दिली. यावरून स्वराज्य कार्यामध्ये कान्होजी जेधे यांचा किती मोठा सहभाग होतो हे कळून येते
.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना सर्वोतपरी सहकार्य केल. आपल्या साही मुलांसह अफजलखानाच्या सैन्याचा फडशा पडला. कान्होजी जेधे यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम दिले होते
.... स्वराज्यावर आलेले दुसऱ्या संकटात बांदलाच्या सैन्याच्या तुकडीतील तीनशेच्या दरम्यान सैनिक मारले गेले होते. यामुळे महाराज विशालगडावर सुखरूप पोचले होते. बांदलाच्या या कामावर प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम देण्याचे ठरविले आहे. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत व्यक्त केले. “महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?” कान्होजीनीही आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्यात असणारे औदार्य दाखवून दिले. याचा उल्लेख शाहीराने केलेलाच आहे.
जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला | तैसे जेधे बांदल शिवाजीला
||
आजहीकारी’ असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासअंबवडे गावी’ जरूर यावे. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल....
चैत्र शु. दशमी. सरदार कान्होजी जेधे यांची पुण्यतिथी. सूर्यासारखा तेजस्वी महापुरुष, मुत्सद्दी, राजकारणी योद्धा, रोहिड खोऱ्याच्या दऱ्याखोऱ्यात अस्ताचलास गेला.