Saturday 14 April 2012

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण

जन्म:- मार्च १२, ..१९१३
मृत्यू:- नोव्हेंबर २५, ..१९८४

माणूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा.”--यशवंतराव चव्हाण.

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चले।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या भारताचा।।

महाराष्ट्राचा देशाला केवढा आधार आहे, याचं वर्णन करणार्या सेनापती बापटांच्या कवितेच्या या ओळी. त्या सार्थ केल्या यशवंतराव चव्हाणांनी. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेले. महाराष्ट्राच्या गैरवशाली इतिहासात त्यानी मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राचे हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हते. तर हा नेता होता, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.

मार्च १२, ..१९१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेतले. १९३०च्या गांधींजींच्या चळवळीने स्वातंत्र्य चळवळ शहरातून खेडेगावात गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. या काळात मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य लढय़ातील कार्यकर्ते तुरुंगात गेले. १९३१मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवासाची यशवंतरावांनाही शिक्षा झाली. तुरुंगातच त्यांना गांधीवादी विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा परिचय झाला.

१९३३मध्ये जेलमधून बाहेर पडताना त्यांच्या काँग्रेसनिष्ठेला समाजवादाची जोड मिळाली. तुरुंगामधून बाहेर पडल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश मिळविला. कोल्हापूरला शिक्षण घेतानाच स्वातंत्र्यचळवळीला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील हा कालखंड वैचारिक आंदोलनाचा होता. प्रचंड वाचन, प्रत्यक्षात येणारे अनुभव, राजकारणात उदय पावलेले नवीन तत्त्वज्ञान यातून हा संघर्ष त्यांच्या मनात उभा राहिला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्ति, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी, म्हणूनच १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न पुढे होता, शिवाय अनेक विचारसरणीच्या लोकांना एकत्र बसून राज्य करणे अवघड होते. तेव्हा मानसिक तेढीतील तीव्रता कमी करून, काही विरोधी नेत्यांना विश्वासात घेऊन, कॉग्रेसश्रेष्ठींशी तडजोड करून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यात आले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१मे १९६० - १९ नोव्हेंबर १९६२) म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

यशवंतरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचे स्वरूप थोडक्यात सांगायचे तर कुसुमाग्रजांच्या चार ओळी कमालीच्या बोलक्या आहेत...

नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे..
लक्ष शून्यातून
काही क्षेत्र आकारात आहे..

यशवंतरावांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहकाराचे तत्व अवलंबिले. सर्व राज्यांत बदल होणे शक्य नव्हते पण काही भागात तो झाला त्यामुळे काही बरे-वाईट परिणामही झालेत. पण राज्याच्या काही भागांतल्या सामान्य लोकांत स्वतःच्या प्रयत्नांनी भांडवल उभारण्याची ईर्षानिर्माण होऊन जो मानसिक बदल झाला तो महत्वाचा होता.

पुढे १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून यशवंतरावांना नेहरूनी आमंत्रण दिले. ‘संरक्षण हा विषय तुम्हाला नवाखा असले तरी तुम्ही तो लवकरच आत्मसात कराल’ असं विश्वास नेहरूंनीच व्यक्त केला आणि तो यशवंतरावांनी खरा केला. पुढील काळात साधूंनी गोहात्याबंदीचे आंदोलन पुकारले तेव्हाही इंदिरा गांधीकडून यशवंतरावांना आमंत्रण आले आणि गृहमंत्री पद ताबडतोब स्वीकारण्याचा आग्रह झाला. त्यावेळीही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, अर्थमंत्री (१९७१-१९७५), परराष्ट्रमंत्री (१९७४-१९७७) ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. तेव्हा त्यांची एक कुशल परराष्ट्र मंत्री म्हणून गणना होत असे, म्हणूनच ते सत्तेवर नसतानाही काही देशांचे राजदूत त्यांना येऊन भेटत असतं. १९७७-७८ कालवधीत केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्रात संसदीय सचिव, अन्नपुरवठा मंत्री, स्थानिक स्वराज्य मंत्री, द्वैभाषिक मुंबई, संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इत्यादी पदे, तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान आणि आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष अशा जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. खरं तर यशवंतरावांची संपूर्ण कारकीर्दच कोणाही नेत्याला दीपस्तंभासारखी रस्ता दाखवणारी आहे.

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासाची मुळे ही यशवंतरावांच्या कार्यात आहेत. त्यांनी असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले. काही ठळक निर्णय पुढीलप्रमाणे :-

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात.
(प्रशासकीय विकास)
- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
- कोल्हापूर बंधार्यां्चा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (शैक्षणिक विकास)
- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल. गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी अविश्र्वसनीय झेप घेतली.

यशवंतराव राजकारणात नसते, तर ते एक उत्तम साहित्यिक झाले असते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. राजकारण आणि समाजकारण या व्यतिरिक्त अनेक कलागुण असलेले आणि त्या कलेचा मनापासून आस्वाद घेणारे राजकारणी मंडळी क्वचितच आढळतील. यशवंतरावांना कवींच्या मैफिलींची, साहित्य, संगीत, नाटकांची फार आवड होती. सत्तेवर नसताना त्यांनी आपला वेळ साहित्यासाठी दिला. अधूम-मधून ते कविता करीत तर कधी मोठ्याने कवितावाचन करीत आणि श्रोते म्हणून त्यांच्या पत्नी वेणूताई असतं. त्यांच्या कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

यशवंतरावकृष्णाकाठ” या आपल्या आत्मचरित्राचा दुसरा भाग लिहीत असताना त्यांच्या पुतण्याचे अपघाती मृत्युमुळे कृष्णकाठच्या दुसऱ्या भागाच्या लिहिण्यात त्यात खंड पडला. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या सौ.वेणूताईंच्या निधनाने ते पूर्णपणे खचले. आता फक्त हा सह्याद्री पडण्याचे शिल्लक राहिले होते. वेणूताईंच्या मृत्युनंतर सतत १५ महिने अश्रू गळणाऱ्या यशवंतरावांचे अश्रू थांबले ते श्वास थांबल्यावरच. आत्मचरित्र कृष्णाकाठचा पुढील भाग न लिहीतचकृष्णाकाठावर” चिरविश्रांती घेऊन पूर्ण झाला.

प्रादेशिकतेच्या मर्यादा सहज ओलांडून राष्ट्रीत्वाला स्पर्श करू शकणारे. कर्तृत्व, साहित्य, कला, संस्कृतीच्या सहज स्पर्शाने उन्नत झालेली रसिकता.. आणि काडोविकडीच्या प्रसंगातून मार्गक्रमण करू शकणारे राजकीय धुरीणत्व.. अशा अभिजात नेतृत्वाचा वारसा महाराष्ट्राला देणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे १३ मार्च, २०१२ - १२ मार्च, २०१३ हे
जन्मशताब्दी वर्ष...!!!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, युगपुरुष स्व. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादान...!!!

हिमालयावर येत घाला
सह्यगिरी हा धून गेला,
मराठमोळ्या पराक्रमाने
दिला दिलासा इतिहासाला...
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने,
जोवर भाषा असे मराठी
यशवंताची” घुमतील कवने...
--------कवी राजा मंगसुळीकर.

Saturday 7 April 2012

जादुई लेखणी लाभलेला गीतकार- कविवर्य राजा बढे


जन्म-१ फेब्रुवारी १९१२
मृत्यू- ७ एप्रिल १९७७

कविवर्य राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी....

आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. स्वत:सोबत रसिकांनाही चांदण्यात भिजवणारा आणि सुखद गारवा देणारा हा कवीआहे कसा आननी' हे जरी महत्त्वाचे नसले तरी कवीचे दिसणे आणि असणे याचा अपूर्व संगम राजा बढे यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते..! रूपसंपदा, हुकमी कवित्व आणि सदासुखी आयुष्यक्रम असा त्रिवेणीसंगम त्यांच्या जीवनात होता.

राजा नीळकंठ बढे यांचे जन्मस्थान नागपूर. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिकसकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिकमहाराष्ट्र'मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळीवागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिकसावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.

१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबतअंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्‌ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवरनिर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते.

समकालीन जनाभिरुचीचं भान ठेवून विविध भावावस्था बढे यांनी गीतांमधून साकारल्या. प्रेमव्याकुळता हा त्यांच्या कवितेचा-गीतांचा विशेष. आपली गीतं अधिकाधिक आस्वाद्य कशी होतील, यावरच त्यांचा कटाक्ष असे. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली , तरचांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनीप्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली.

राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्याक्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनीप्रस्तावनेत'
‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत.
१९३५- १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे.

कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात. या कथाकथनाचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला... या कार्यक्रमात पु. . देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या... मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला.

राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, याचाही विसर पडला असणे शक्य आहे.

गीत, गझल याप्रमाणेचचारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्याविविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या... राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीजकिती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली.

"गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे...

कवी राजा बढे यांच्या व्यक्तिमत्त्वातत ऐसपैसपणा होता, तो नागपूरहून मुंबईला स्थलांतरित झाल्यावरही तसाच राहिला...त्यांनी एकदा एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.

तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..

दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्याा जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..

आपल्या अपुऱ्या, अधुऱ्या जीवनाच्या धावपळीत कवितेचा पदर बढे यांनी हातचा कधीच सुटू दिला नाही. इच्छित यश मिळालं नाही तरी ते कधी निराश झाले नाहीत. मनाला कधी कटुतेचा स्पर्श त्यांनी होऊ दिला नाही. कुठल्या कंपूतही शिरले नाहीत.

ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचंचांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!''

गीतकाव्याचा संपन्न आविष्कार करणारे कवी राजा बढे यांनी ७ एप्रिल १९७७ साली हृदयविकारामुळे जगाचा निरोप घेतला..... अशा प्रतिभावंत कवीला विनम्र अभिवादन....
त्यांची गीते आजही स्मरणात आहेत आणि पुढेही राहतील अशी अशा करू....
जय महाराष्ट्र !!!

राजा बढे यांचे १९३१ ते १९७६ या कालखंडात प्रसिद्ध झालेले कवितासंग्रह :-
हसले मनी चांदणे' (१९४१)
माझिया माहेरा जा' (१९५१)
क्रांतिमाला' (१९५२)
मखमल' (१९७६
मंदिका' (१९७६).