Sunday 14 October 2012

विजयाताई लवाटे-‘मानव्य'चा मायेचा वारसा

देहविक्रय करून चरितार्थ करणाऱ्या असहाय्य स्त्रियांचा आधार असलेल्या.....फूटपाथवर भाजीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या हजारो कष्टकऱ्यांचा आधार असलेल्या.....एड्सग्रस्त मुलांच्या पाठीवरून फिरणारा आईच्या मायेचा हात असणाऱ्या 'मानव्य' संस्था च्या कर्त्या धर्त्या….मानवतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा आणि निरपेक्ष माणुसकीचा  वारसा देणाऱ्या विजयाताई लवाटे.....!!!
एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे याच उद्देशातून सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी मानव्यसंस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रामध्ये त्या काम करीत होत्या. तेथून वेश्यावस्ती जवळच असल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन विजयाताईंना अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. या स्त्रियांशी चर्चा करताना त्यांचे विविध प्रश्न समजले. प्रथमोपचार सेवा संघ आणि नंतर निहारप्रकल्पातून त्यांनी वेश्या आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठीचे कार्य सुरू केले. निहारमध्ये काम करीत असतानाच एचआयव्ही आणि एड्सचे रुग्ण आढळू लागले. या रोगाचा तीव्र गतीने होणारा प्रसार आणि लहान मुलांमधील प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातूनच मानव्य संस्थेचे बीज अंकुरले गेले.

वडील डॉक्टर असल्याने रुग्णांबद्दल आस्था,समाजसेवेची जाणीव त्यांच्या मनात होती पण सुरुवातीचे दिवस विजयाताईंच्या कामाच्या दृष्टीने अडचणीचे, त्रासाचे, कटकटीचे होते. मुळात वेश्यांच्या मुलांनी जायचं कुठं, त्यांना आधार कुणाचा हा प्रश्न् होता. उघड्यावर वाढणाऱ्या मुलांना ताईंच्या संस्थेच्या रूपाने एक मायेचं छत्र लाभलं. पुणे जिल्ह्यातच शहरापासून काही अंतरावर विजयाताई , चाफेकर , मुक्ता मनोहर यांनी एक छोटं वसतिगृह काढलं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांनाही आशेचा किरण दिसला. वस्तीतल्या गंदगीतून मुलं बाहेर येतील. चार बुकं शिकून आपल्या पायावर उभं राहतील असं कुठंतरी या साऱ्यांना वाटत होतं. पण  हे दिवस फार  तर कठीण होते. जागा, पैसे, अन्नधान्य, औषधं, शिक्षण, अंथरूण-पांघरूण हे सारं काही पुरवण कठीण होतं पण विजयाताईंनी या साऱ्या मुलांच्या अंगावरून आपल्या मायेची ऊबदार शाल पांघरली. मात्र त्या शालीची ऊब काही दिवस मिळाली आणि एके दिनी ही शालही काही सामाजिक कार्यर्कत्यांनी हिसकावून घेतली. तरीही विजयाताई डगमगल्या नाहीत.
राखेतून फिनिक्स पक्षी आकाशात झेपावतो असं म्हणतात नं तशाच विजयाताईंनी पुन्हा एकदा जिद्द धरली, उभारी घेतली आणि 'निहार' ची स्थापना केली. पुण्यात येरवड्याच्या पुढे जमीन घेतली. पैसे जमत गेले तसं वसतिगृह उभं राहिलं. तिथेही खूप अडचणी आल्या पाणी,वीज,रस्ता अशा एक ना अनेक प्रश्नंशी सामना करता करता विजयाताईंनी एके दिवशी ' निहार ' चा निरोप घेतला आणि ' मानव्या ' ची हाक दिली….मात्र वीस वर्षांत एड्सने भयाण रूप धारण केले होते. आता कार्य आणखी अवघड, गुंतागुंतीचे झाले होते. वसतिगृहात राहणाऱ्या प्रत्येक मुलाचा चेहराच सांगायचा की तो किती दिवसांचा सोबती आहे. इथेही विजयाताई डगमगल्या नाहीत. नेटाने उभ्या राहिल्या. कष्ट करीत राहिल्या.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनअसे म्हणत विजयाताई लवाटे यांनी १८ जून १९९७ रोजी मानव्य संस्थेची स्थापना केली. एचआयव्हीबाधित मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्यापासून १२ किलोमीटर अंतरावर भूगाव येथे ‘मानव्य गोकुळ’ साकारण्यात आले. एचआयव्हीबाधित महिलांच्या तान्हय़ा मुलांचे होणारे हाल लक्षात घेऊन नवजात अर्भकापासून ते तीन-चार वर्षांपर्यंतच्या मुलांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशातून मानव्य संस्थेची सुरुवात झाली. अनाथ मुलांना आधार देणे, या मुलांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, औषधोपचार आणि वैद्यकीय तपासणी सुविधा पुरविणे, आरोग्यवर्धक आणि चौरस आहार देणे आणि एचआयव्हीबाधित स्त्रियांना आधार देणे... मुलांचा सर्वागीण विकास करून त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगता यावे हेच मानव्य संस्थेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांना समाजात स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या गोकुळमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येक मुलास जगण्याचा, सुरक्षिततेचा, समाजात वावरण्याचा आणि संपूर्ण विकासाचा हक्क दिला आहे.
एचआयव्हीबाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे म्हणून सुरु केलेल्या या संस्थेत मुलांची विशेष काळजी घेतली जाते. संस्थेतील सर्व मुलांच्या वेळोवेळी सगळ्या प्रकारच्या तपासण्या करणे, कॅल्शियम, बी. कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी हे पूरक औषधोपचार मुलांवर करणे, एचआयव्हीचा प्रसार रोखण्याबरोबरच मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या उद्देशातून दिल्या जाणाऱ्या ‘एआरटीच्या  (अ‍ॅन्टी र्रिटोव्हायरल ट्रीटमेंट) औषधांमुळे होणाऱ्या बदलांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित व्यायाम याकडेही लक्ष दिले जाते. सध्या संस्थेतील ६३ पैकी ५० मुलांना एआरटी ट्रीटमेंट सुरू आहे. उत्तम भोजनामुळे मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढत असल्याने उर्वरित १३ मुलांना या ट्रीटमेंटची गरज भासत नाही. सध्या वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक प्रगतीमुळे मुलांचे आयुर्मान वाढले आहे. संस्थेतील मुलांना त्वरित प्रथमोपचार मिळावेत यासाठी संस्थेच्या आवारामध्येचकृष्णार्पणम निरामय मेडिकल अँड रीसर्च सेंटर प्रकल्पांतर्गत २००६पासून चार खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. येथील उपचाराप्रमाणेच दर आठवड्याला या मुलांची ससूनमध्येही तपासणी करण्यात येते. एका ट्रस्टचे आणि औषध कंपनीचे यासाठी सहकार्य लाभते. पंचक्रोशीतील बाधित रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे तसेच एचआयव्हीविषयी जनजागृती करणे, परिणामांची माहिती देणे असे कार्यही स्वयंसेवक, समन्वयक आणि वैद्यकीय सल्लागारांच्या मदतीने केले जाते.
एचआयव्हीबाधित मुलांना सामाजिक स्वीकृती मिळणे अवघड आहे हे जाणून येथे या मुलांसाठी ८ वी पर्यंत शाळाही आहे. आठवी झाल्यावर या विद्यार्थ्यांना नॅशनल ओपन स्कूलतर्फे दहावीच्या परीक्षेलाही बसवले जाते. एअरकंडिशनिंग रिपेअरिंग, मोबाइल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन असे प्रशिक्षण देऊन या मुलांना आपल्या पायावर उभे केले जाते. शुभेच्छापत्रे , हँडिक्राफ्ट, शिवणकाम, शिल्पकला याबरोबरच फ्लॅट फाइल्स आदींचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आधुनिक काळाची पावले ओळखून संस्थेने संगणक प्रशिक्षण आणि फॅशन डिझायनिंग हे अभ्यासक्रमदेखील सुरू केले आहेत. विजयाताई  यांच्या जिद्दीतून आणि अथक परिश्रमातून साकारलेल्या या उपक्रमामुळे सुमारे पन्नास -पंचावन्न एचआयव्हीबाधित मुलांचे जिणे सुकर होते आहे.  
एड्स अवेअरनेस सेल पुरस्कार, मार्गारेट गोल्डिंग पुरस्कार, युगंधर पुरस्कार, भाटिया मेमोरीअल रीटेबल ट्रस्ट अवार्ड दिल्ली(1995), भारतीय स्त्रीशक्ती पुरस्कार(1995), श्रीमती ताराबाई पुरस्कार(1996), फाय फाऊंडेशन पुरस्कार(1996), हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था पुरस्कार(1996), श्रीमती मीनाताई ठाकरे पुरस्कार(1996), सावित्रीबाई फुले पुरस्कार(1997), Rotary Foundation Jean Harris Award, माऊली आनंदी पुरस्कार(1998), श्रीमती कुसुमताई चौधरी पुरस्कार, केसरी पुरस्कार(2000), जनसेवा पुरस्कार(2001), बाया कर्वे पुरस्कार(2004) अशा विविध पुरस्कारांनी विजयाताई लवाटे यांच्या माणुसकी जपणाऱ्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
एके काळी एचआयव्हीबाधित मुलांचं मरण सुसहय़ व्हावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेची वाटचाल आता मुलांचं जगणं सुखाचं व्हावं अशी झाली आहे.  मर्यादित जागेत आणि ज्वलंत विषयाशी संबंधित काम असल्यामुळे स्वयंसेवक, हितचिंतक आणि देणगीदारांच्या प्रोत्साहनातून मानव्य गोकूळ प्रकल्प' स्वतःच्या जागेत आज  यशस्वी कार्यरत आहे. एचआयव्हीबाधित मुलांच्या आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन देणारी संस्था असेच मानव्यचे वर्णन करावे लागेल.  विजयाताईंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शिरीष लवाटे आणि स्नुषा उज्ज्वला लवाटे ही पुढची पिढी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मानव्य संस्थेचे, नव्हे मानवतेचे हे कार्य पुढे घेऊन जात आहे.
मानवतेचा वारसा देणाऱ्या...माणूस हाच माझा देव, माणुसकी हा माझा धर्म मानणाऱ्या आणि  हा देव आणि हा धर्म ज्या आईवडिलांनी शिकवला त्यांना यशाच संपूर्ण श्रेय प्रदान करत समाजभान जपणाऱ्या विजयाताई लवाटे यांना मानाचा मुजरा.....

संपर्क :
'मानव्य',
४६-३-१ लक्ष्मण व्हिला, फ्लॅट १३, पौड रस्ता,
जोग हॉस्पिटलजवळ, पुणे - ४११०३८
फोन : २५४२२२८२
मानव्य गोकूळ : माताळवाडी फाटा, पौड रस्ता, भूगाव, ता. मुळशी, पुणे - ४११०२१
फोन : ३२३०२६९५
संकेतस्थळ - www.manavya.org