Tuesday, 3 July 2012

माणुसकीचे महाकाव्य जगणारा कर्मयोगी महात्मा-बाबा आमटे


कामांना अंत नाही, असलाच तर तो आपल्या कार्यशक्तीला आहे - बाबा आमटे.
जो माणूस मनाने सर्व इंदियांना आवर घालून कोणत्याही आसक्तीला बळी न पडता सर्वच्या सर्व कर्मेंदियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तो माणूस 'श्रेष्ठ' मानला जातो. गीतेतील हा कर्मयोग ज्यांना कळला व ज्यांनी तो आचरणात आणला, त्यांनाच जग 'महात्मा' मानते. ज्या न्यायाने गांधीजी, जोतिबा फुले आणि मदर टेरेसा 'महात्मा' ठरल्या, त्याच पंक्तीत बसणारे व्रत स्वीकारून  आपल्या हयातभर अंगिकारनारे बाबा आमटे...
अनाथांचे आईपण करण्याकरिता परमेश्वराने ज्यांना कुणाला जन्मास घातले त्यात बाबा आमटे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आई आपल्या लेकांकारिता सर्व काही करते, आपले सारे प्रेम, आपली माया, आपले वात्सल्य, हे सारे ती आपल्या लेकांकारिता खर्ची घालते, बाबांनीदेखील हेच केले. जीवनाच्या अंतापर्यंत आपलं सर्वायुष्य त्यांनी आपल्या अवती-भवतीच्या जिवांकरिता बहाल केले.
शृंखला पायी असुदे, मी गतीचे गीत गाईन,
दुःख उधळवयास आता, आसवांना वेळ नाही...
या ओळीतला प्रत्येक शब्द त्यांच्या सर्वार्थानिशी जगलेल्या बाबांनी वेदनेला साधना आणि श्रमाला शिरं मानून आपले आणि आपल्या सोबतच साऱ्यांचे आयुष्य धन्य केले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जहांगीरदार कुटुंबात, जेथे शेकडो एकर उत्पन्नाच्या जोडीला  वडिलांची देवीदास हरबाजी आमटे यांची प्रशासकिय सेवेतील नोकरी असलेल्या सधन कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ रोजी मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांचा जन्म झाला. बालपणापासूनच बाबा साहसी, निर्भय आणि प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणारे होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. १९३४ साली बी.ए. व १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी त्यांनी संपादन केली. मनात आणले असते, तर ते विदर्भातील प्रतिष्ठित वकील बनू शकले असते, पण त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वत:ला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. महात्मा गांधी सारखेच विनोबा भावे आणि साने गुरुजी या व्यक्तिमत्वांचा बाबांवर मोठा प्रभाव होता. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.
स्वतंत्रप्राप्तीनंतर  बाबांनी १९४९-५० या कालावधीत कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण करून महारोगासारख्या महाभयानक रोगाने ज्यांना ग्रासले, अशांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. खेड्यापाड्यात पसरलेल्या या रोगामुळे हजारो रुग्ण जिवंतपणी मरणयातना सोसत होते. रोगाने पोखरलेले व अनंत यातना देणारे शरीर आणि समाजाकडून होणारी दारूण विटंबना यांच्या कात्रीत सापडलेले कुष्ठरोगी पाहून बाबांचे संवेदनाशील मन दवले आणि 'प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी' या प्रमाणे जगाने लाथाडलेल्यांना हक्काचे घर मिळावे, म्हणून त्यांनी आनंदवनाची स्थापना करण्याचे कठीण काम स्वीकारले. कोणत्याही मिशनरी संस्थेचा हातभार न लागता, उलट स्वकियांकडूनच निर्र्भत्सनेचे शब्द आणि वाळीत टाकल्याची भावना यांच्याशी सामना करत बाबांनी नेटाने आनंदवनाचा कारभार हाकला. कोलकात्याजवळ मदर तेरेसा कुष्ठरोग्यांना नवजीवन देण्याचे कार्य करत होत्या, त्याच काळात चंदपूर जिल्ह्यातील वरोरा गावच्या दुर्गम प्रदेशात 'आनंदवन' फुलत होते.
बहिष्कृत जमिनीवर बहिष्कृत लोकांनी घडविलेला तो चमत्कार होता. त्या जागेवर विहिरी खणल्या गेल्या. रोपटी उगवू लागली, झोपड्या उभारल्या. १९५१ साली श्रमातून जीवनात आनंद निर्माण झाला. शारीरिक व्यंगव्याधीचे विस्मरण झाले म्हणून त्या श्रमानंदाला नाव ठेवले ‘आनंदवन’..!! कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्यावर इलाज करणे आणि त्यांना रोगमुक्त करून माणसांत आणणे हा बाबांचा ध्यास होता. म्हणून कुष्ठरोगावरची लास शोधून काढायला त्या रोगाचे जंतू स्वतः बाबांनी आपल्या शरीरात टोचून घेतले होते. मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा-सुश्रुषाच करण्याचीच नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. ‘महारोगी सेवा समिती’ या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक तेथे आहेत. कुष्ठरोग्यांवर वैद्यकीय उपचार केल्याने त्यांच्या रोगावर नियंत्रण मिळवता येईल, पण त्यांच्या खचलेल्या मनाचे आणि भंगलेल्या स्वाभिमानाचे काय? हा विचार बाबांच्या डोक्यात होता. त्यांना स्वावलंबी केले, तरच त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा करता येईल, हे जाणून 'आनंदवन' उद्योग केंद बनले. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण, शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटिरोद्योग सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. यंत्रमागाचा खडखडाट आणि डोलणाऱ्या पिकांचा ताल यावर आनंदवनातील दु:खी मनेही ताजीतवानी झाली. बाबांनी अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली.

या प्रतिभाशाली माणसाचा लढा फक्त कुष्ठरोगाविरुद्धच नव्हता तर जीवनातील सगळी कुरूपता नाहीशी व्हावी, यासाठीच त्यांनी सर्वकष युद्ध आरंभले होते. आदिवासींच्या दरिद्री आयुष्याला किमान आरोग्याची जोड द्यावी म्हणून त्यांनी भामरगडच्या अरण्यात आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. आंधळ्या मुल-मुलींना हाताळता यावा म्हणून बिनकाट्याचा गुलाब मिळविण्यासाठी धडपडणारे हळुवार मन लाभलेल्या बाबांना शेकडो युवक युवतींना सोबत घेऊन, कन्याकुमारी ते पंजाब, दहशतवादाने पिचलेला काश्मीर आणि कोहिमा ते पोरबंदर या भागांत त्यांनी पायाला भिंगरी लावल्यासारखे भ्रमण केले आणि ' भारत जोडो'साठी देशभराची यात्रा काढली. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. पाठीचे काही मणके गमावल्याने अंथरुणावर कायमचे पडून राहवे लागणाऱ्या एका अपंगाचा हा पराक्रम होता. बाबांच्या या सर्व चळवळींना नैतिकतेचा आधार आणि मानवतावादाचा गाभा होता. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनांबाबत ज्यांना शंका  वा विरोध होता, त्यांनाही बाबांच्या प्रामाणिकपणाबद्दल व सद्हेतूबद्दल केव्हाही संदेह नव्हता.
दीन दुबळ्यांना हात धरून उठविणाऱ्या सेवेभावी बाबांना असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्करांनी गौरविण्यात आले.
१९५८ - रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
१९८६ - पद्मविभूण , पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
१९८८ - मानवी हक्क पुरस्कार .
१९९० - टेंपल्ट पुरस्कार .
१९९१ - राईट लाइव्हली हुड पुरस्कार .त्याच बरोबर पर्यावरणासंबंधीचा ' ग्लोबल ५०० ' पुरस्कार .
१९९९ - आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार.
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार.

समाजसेवा, देशभक्ती करणाऱ्या बाबांचे मन तरल, भावुक वृत्ती आणि नाजुक शब्दसंपदा लाभलेल्या एका विलक्षण हळव्या प्रतिभावंत कवीचे होते. त्यांचा 'ज्वाला आणि फुले'  आणि ‘करुणेचा कलाम’ हे कवितासंग्रह त्यांच्यातील स्वप्नाळू कवीची साक्ष देतात.
'पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू,
 निमिर्तीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाढू;
नांगरु स्वप्ने उद्याची, येथली फुलवीत शेते;
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते...
' या त्यांच्या काव्यपंक्तीनी त्यांचे स्वप्नच शब्दबद्ध केले.
या काव्यसंग्रहातून त्यांच्या भावविश्वाची आणि विचारवैभावांची धुंदीच पहावयास मिळते. ‘थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा आणि धुंद वादळास कोठला किनारा’ अशी तेजोमय कविता लिहिणाऱ्या बाबांच्या कर्तृत्वाला थांबणे मंजूर नव्हते आणि त्याला किनारही कधी मानवाला नाही. ‘भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अमलात आणा’ असे सांगणाऱ्या बाबांनी जेव्हा एखादे कार्य हाती घेतले तेव्हा त्याच्या पूर्ततेविषयी, त्यांच्याखेरीज इतरांच्या मनात शंका असायची. मात्र हाती कोणतेही काम त्यांनी अर्ध्यावर सोडले नाही किंवा ते अपुरेही ठेवले नाही. संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्र्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प कमालीचे यशस्वी केले.
ज्यांच्या मागे कूळ, जात, धन, किंवा राजकीय साथ यापैकी कोणतीही पुण्याई आधाराला उभी नसते अशी माणसे जेव्हा ‘बाबा आमटे’ होतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांची स्वतःचीच श्रमशक्ती उभी असते. श्रम आणि अश्रुंसोबत केलेल्या या प्रवासात आले ती त्यांना वेळेवेळी साथ लाभली ती बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताईंची. बाबांना स्वतःच्या यातानंखेरीज समाजाच्या यातनांनाही असमाधानी बनविले. त्यांच्या या असमाधातून उभी राहिलेली त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रभावळ फार मोठी आहे. त्यात आनंदवन आहे, त्यांची कविता आहे, युवकांसाठी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके आहेत, साधनाताई आहेत, विकास आणि प्रकाशाची परंपरा आहे. त्यांच्याविषयी श्रद्धाभाव बाळगणारे चाहते, अपंगाना समर्थ बनविण्याची आव्हाने आहेत. दुःख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या प्रतिज्ञा आहेत.
नेते आणि पुढारी बरेच असतात, तत्त्ववेत्ते आणि विचारवंतही बरेच सापडतात. पण तत्त्वाला कृतीची जोड देऊन समाजाच्या शेवटच्या टोकाला जाऊन भिडणारे 'महात्मा' मात्र शतकात एक-दोनच सापडतात. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे, सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढणारे बाबा त्यातीलच एक....
समाजाच्या तिरस्काराचा विषय झालेल्या हजारो कुष्ठरोग्यांच्या आयुष्याला संजीवनी देणारे त्यांच्यासाठी आपले आयुष्य वेचणारे बाबा फेब्रुवारी, २००८ मध्ये अनंतात विलीन झाले.
खरतरं  बाबांसारखी माणसे मारत नसतात, अशा माणसांना शेवट नसतो. ती अमर असतात आपल्या कार्याने कर्तृत्वाने....!!!

No comments:

Post a Comment