जंगल म्हणजे परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं...अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जीवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. आता मात्र हे उध्वस्त होत आहेत कुठे मानवाच्या स्वार्थापायी तर कुठे निर्सगाच्या कोपामुळे...पण यातही काही लोक निसर्गाशी एकनिष्ठ असतात, त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यचं वानप्रस्थ करून टाकतात, त्याचं एक उदाहरण म्हणजे जादव पायेंग...!
हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करनारा... आपल्या अवघ्या आयुष्यात दररोजच वसुंधरा दिवस आणि पर्यावरण दिवस साजरा करणारा..रेताड, ओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत 'मुलई कथोनी' नावाचं एक संपुर्ण अरण्य फुलावीणारा... जंगलाकडून सगळं घेत असतांना आपणही त्याच काहीतरी देणं लागतो हे जाणणारा...तुमच्या-आमच्यासारखाच सामान्य पण कार्याने असामान्य असणारा जादव पायेंग...!!
आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या कोकिलामुख गावात जादव पायेंग याने ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार केलंय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघ, तीन गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो.
१९७९ साली ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे तर बी रूजायला माती देखील ठेवली नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. शेकडो प्राणी आणि होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. हे सगळ पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं.
१९८० मध्ये अरुना चापोरी भागात वन विभागाद्वारे २०० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले हे कार्य पूर्ण झाल्यावर सर्व कामगार निघून गेले, पण जादव तिथेच थांबला त्याने हे कार्य इथेच न थांबवता पुढे न्यायचं आणि पुन्हा जंगल निर्मार करायचं ठरवलं. त्याकरिता तो रोपटी मागायला वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला पण सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलं, असा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. त्याला घरचे आणि गावचे लोक 'मुलई' म्हणायचे. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनी' म्हणजे मुलईचं जंगल. मुलईच्या अथक परिश्रमाने बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे.
आपल्याला एका मुंगीचा चावा सहन होत नाही, इथे मात्र मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, काही होडीत बसुन आणि नंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवासात आपल्या जवळ बाळगत, त्यांचे अगणित चावे सहन करत त्या मुंग्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहर, कोरोई, मोज आणि हिमोलूची रोपटी जमवत फिरणा-या..लावलेली रोपटी जगावीत, म्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या, मुलईला सरकार,गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारली तरी तो थांबला नाही.
आज या जंगलाशी मुलईचं ईतकं दृढ नातं आहे की ईथले वाघ, एकशिंगी गेंडेही त्याला ओळखतात. आजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा मग हत्तींवर गोळ्या चालवा' असं जाहिर आव्हान करणारा, एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे करणारा मुलई आहे. अधे-मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आली, की झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच राहणारा मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिचं दूध विकून चालवतो.
२००८ नंतर जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. त्यानंतर वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांना मुलईच्या मदतीने अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातूनच मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं.
बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टस' लोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनी' च्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली, तर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतो, असा त्याला विश्वास आहे.
५३ वर्षीय पायेंगला त्याच्या या अथक प्रयत्नानंतर पर्यावरण आणि सरकार कडून वाह्वाही मिळाली. पर्यावरण संवर्धनाच्या ३२ वर्षाच्या संघर्षानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयने 'फॉरेस्ट मैन ऑफ असम' ही उपाधी देऊन सन्मानित केले. अगदी भावूक होऊन मुलई म्हणतो की, ‘मी सहा वर्षाचा असताना नष्ट होत असलेले कुरूवा पक्षी या भागात पहिले होते पण मागच्या ४५ वर्षात ते इथे दिसलेच नाहीत. आज मात्र तेच पक्षी माझ्या या जंगलात वास्तव्याला येतात या पेक्षा दुसरं आणखीन काय हवं’...
आपल्या कार्याने आदर्श घालून देणारा...पुरस्कार, प्रसिद्धी पासून लांब असून आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलेला जादव पायेंग आपल्या सारख्या सामान्य माणसाला पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश देऊन जातोय...
No comments:
Post a Comment