Saturday, 15 September 2012

कविवर्य विंदा करंदीकर - कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील दृष्टी असलेले कवी...


मराठी साहित्यातील एक ख्यातनाम कवी, लेखक, समीक्षक..... मराठी साहित्य संस्कृतीच्या अभूतपूर्व सर्जनशीलतेच्या बहराचे वासंतिक पर्वाचे जनक आणि त्याच पर्वाचे एक अपत्य....त्या वासंतिक वनात स्वतःच्या सर्जनाचा वाफा फुलवित सुसंस्कृत साहित्य निर्माण करणारे.. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळवित, मराठीला आपल्या श्रेष्ठ काव्यनिर्मितीने तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कविवर्य विंदा करंदीकर....!!!
‘आपल्या प्रतिभेचे शील शाबूत ठेवण्यासाठी व तिच्या विकासाच्या शक्यता जिवंत राखण्यासाठी कवीने आपली मस्ती सांभाळली पाहिजे...’ असा एक महत्वाचा कानमंत्र करंदीकरांनी सांगितला आणि या ‘मस्ती’ची व्याख्याही त्यांनी केली आहे. - ‘काव्याच्या सृजनाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही आणि कुणाचीही पर्वा न करणारी अनिवार्य उर्मी म्हणजे कवीची मस्ती’ हे कवीचे व्रत आहे. या व्रतातूनचं विंदा करंदीकरांची कविता ही जन्मली आणि आपल्या मस्तीत मुक्तपणे जगली....
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म  २३ ऑगस्ट१९१८ रोजी
घालवणसिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर  हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरीरामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबईएस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठीइ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली.  संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातीलपहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
१९३७ ते १९८५ हा काळ म्हणजे  विंदांच्या लेखन प्रवासाचा कालखंड.... या कालखंडात त्यांनी आपल्या जीवनधर्म असलेल्या काव्यरचनेत विविध प्रयोग केले. बालकविता, तालचित्रे, अभंग, सूक्ष्मरचना, मुक्तसुनिते ,विरूपिका असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. ‘अमृतानुभवा’ सारख्या तत्वकाव्याचे अर्वाचीनीकरण हा सुद्धा विंदांचा एक प्रयोगचं होता. अशा अनेक अंगांनी काव्यनिर्मिती करून करंदीकरांनी मराठी कवितेत फार मोलाची भर टाकली. विंदांना कविता म्हणजे स्वदेशगंगा वाटायची.. त्यांची  ‘स्वदेशगंगे’ पासूनची  काव्यगंगा पुढे विविध वळणे घेत वाहू लागली .कालांतराने या गंगेला  ‘बालकविता’ यमुनेच्या रुपात मिळाली. मोठ्या माणसांना ज्ञानात्मक आनंद देणारी आणि लहान मुलांना वेगळ्या राज्यात नेणारी बालकविता ही विंदांची मराठी  काव्यासृष्टीला मिळालेली मोठी देणगी आहे. त्यांच्या ‘मावशी’ ,‘घड्याळ’, ‘पंतोजी’, ‘बेडकाचे गाणे’, ‘जादूगार’, ‘पतंग’ या बालगीतातील नाट्यप्रसंगातून तर त्यांनी बालकांचे निरागस मन प्रगट केले.
विंदा कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही ते इंग्रजी साहित्याचे गाढे, व्यासंगी प्राध्यापक होते. वेगवेगळ्या महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले होते. इंग्रजी साहित्य आणि त्यातील विचारातून  त्यांच्या स्वतःच्या मर्मदृष्टीला, चिकित्सक वृत्तीला खूप काही घेता आले . काही महत्वाच्या इंग्रजी साहित्यकृतींचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. कुठल्याही साहित्यसंस्कृतीचा कणा हा भाषा असतो, याचं सजग भान असल्यामुळे इंग्रजीच्या प्राध्यापक असूनही मराठीतील नानाविविध बोलीभाषांच्या  खजिन्याकडे ना कधी दुर्लक्ष केलं आन्ही कधी तुच्छ लेखलं... विंदांची वृत्ती ही जीवनाभिमुख होती. जीवनाचे स्वागत करणारी, जीवनाविषयीची अशा बाळगणारी, त्यात रस घेणारी होती. त्यांच्यामध्ये नैराश्य किंवा कडवटपणा नव्हता. त्यांच्या कवितेने कधी कधी धारदार शस्त्राप्रमाणे वर केले तर कधी उपरोधाचा तीव्र प्रहार केला पण तरीही माणसांमधील मार्दव आणि कोमलता यांचा त्यांना विसर पडला नाही...
जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी  जाणीव विंदांच्या कवितेला व्यापून टाकते. ‘ये यंत्रा ये’ म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारे विंदा,  क्रांतीची चाहूल घेत, ‘माझ्या मना बन  दगड’ असेही म्हणतात...वर्गसंघर्षचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. त्यांची बालगीते असो, परम गीते असो वा स्त्रियांसाठी लिहिलेले स्थानगीते असो, यातील प्रत्येक गीतांमध्ये ‘जीवनातल्या वास्तवाची पेरनी सहजगत्या  करणे’ हे त्यांचे खास वैशिष्ट्य दिसून येते. ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ या त्यांच्या ललित लेखांतील बहुतेक  निबंधांतून त्यांची चिंतनशील वृत्तीही दिसून येते. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे विंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य...
 विंदांनी पारंपारिक मुक्तछंदातही अनेक प्रयोग केले. मुक्तछंदाचे स्वातंत्र्य आणि सुनीत रचनेतील ओळींचे बंधन यांच्या मेळातून ‘ मुक्तसुनीत’ तयार केले. ‘आज प्रार्थना प्राणाऐवजी’ हे तेरा ओळींचे तर ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगाऱ्यावर’ हे  पंधरा ओळींचे सुनीत त्यांनी लिहिले. यात वृत्त व यमक संगती नसली तरी आवाका व परिणाम या दृष्टीने सुनितप्राय राहणे हे मुक्तीसुनितचे लक्षण ठरले.
विंदांनी जशा मुक्छांदात कविता लिहिल्या तशा गाजला अभंग या प्रकारातही रचना केल्या... त्यांनी सामाजिक आशयाची कविता केली तर प्रेमकावितेला नाक न मुरडता तितक्याच आत्मीयतेने प्रेमकविताही केल्या, जितक्या निष्ठेने प्रौढांसाठी प्रलाग्भ कविता लिहिली तितक्याच निष्ठेने बालगीतसुद्धा लिहिली.. विंदा समकालीन साहित्याबद्दल म्हणत की .."वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." याचं विचाराला अनुसरून विंदांची लेखणी चोफेर चालली.  कवितेसोबतच ललित लेखन, समीक्षा. अनुवाद अशा साहित्याच्या विविध प्रांतात विंदा लीलया वावरत राहिले.
विंदा करंदीकरांना त्यांच्या या साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे...
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार,केरळ (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान, मध्यप्रदेश (१९९१)
जनस्थान पुरस्कार,कुसुमाग्रज प्रतिष्ठान( १९९३)
कोणार्क पुरस्कार, ओरिसा(१९९३)
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स

आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी   जाने. २००३  रोजी जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी आंतरिक भावना व्यक्त केल्या. काव्य हाच जीवनधर्म मानणाऱ्या विंदांचे १४ जानेवारी २०१० रोजी मुंबई येथे  त्यांचे निधन झाले.
विंदांच्या कितीही कवित्या आठवल्या तरी त्यांची ‘घेता’ ही कविता मराठी काव्यसृष्टीच्या अंतापर्यंत स्मरणात राहील..
देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
देणाऱ्याचे हात घ्यावेत ....
अशा या मराठी साहित्यविश्वात बहुस्पर्शी कामगिरी करणाऱ्या कलावंत म्हणून मोठे असलेल्या आणि माणूस म्हणून त्याहूनही मोठे असलेल्या कविवर्य विंदा करंदीकरांना शतशः नमन........

No comments:

Post a Comment