Friday 7 September 2012

कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल - तेजाने तळपणारी ज्योत....


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रभावळीत जनरल भोसले, कर्नल सहगल यांच्यात झळकणाऱ्या....पूर्वायुष्यातील तेजस्वी पर्वाचा गर्व न बाळगणाऱ्या...जातिभेद, गरिबांच्या पिळवणुकीबद्दल तळमळीने बोलणाऱ्या, संघटित लोकक्रांतीसाठी अजूनही धडपडणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या....वाईट राजकारणाला नाकं न मुरडता, न घाबरता पेटून उठाम्हणणाऱ्या...भारतीय इतिहासात स्वत:च्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या वीरांगना...!!!
अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुस्थानात प्रथम लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व होते नंतर  महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशांनी अहिंसक लढे दिले. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’, या विचारावर विश्वास असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद फौजेच्या राणी झाशी रेजिमेंट या महिलांची पलटणच्या प्रमुख भारतातून सिंगापूर मध्ये व्यवसाय करण्यासाठी गेलेल्या पहिल्या स्त्री सेनापती कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल....!!
डॉ. लक्ष्मी स्वामिनाथन यांचा जन्म चेन्नई येथे २४ ऑक्टोबर  १९१४ रोजी डॉ. एस स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्याच्या घरी झाला. कॅप्टन लक्ष्मी यांचे वडील बॅ. स्वामिनाथन हे चेन्नईतले अतिशय पुढारलेल्या विचारांचे, जात-पात, धर्म ही उतरंडीची समाजव्यवस्था ण मानणारे प्रसिद्ध वकील होते.ते  एक असे देशभक्त होते की ज्यांना इंग्रजांवर त्यांनीच दिलेल्या शिक्षणाने मात करायची होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या बायकोला मुलींना इंग्रजी,  तमिळ,मल्याळी या भाषा शिकविल्या. घरात सतत इंग्रजी वातावरण ठेवले पण एका इंग्रजाच्या खुनाचे वकीलपत्र बॅरिस्टर स्वामिनाथन यांनी घेतले म्हणून या परिवाराला संबंधित सर्व इंग्रज स्त्री-पुरुषांनी बहिष्कृत केले तेव्हापासून त्यांच्या घरात भारतीय वातावरण असायचे. त्याच वेळी महात्मा गांधीजींची असहकाराची चळवळ सुरू झाली. लक्ष्मीने आपले सर्व परदेशी कपडे व वस्तू होळीत टाकल्या. म. गांधींबद्दल तिला परम आदर वाटत होता तो अगदी शेवटपर्यंत.
१९२८ मध्ये कॅप्टन लक्ष्मी यांनी कोलकाता काँग्रेस मध्येआपल्या आई आणि २०० स्वयंसेविकांबरोबर   गणवेशात संचलन केले. त्यांच्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. १९३०च्या सविनय कायदेभंगाच्या मिरवणुकीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक दिवसाची अटकही झाली. शाळा, कॉलेजवर बहिष्कार घालून शिक्षण सोडणे ही कल्पना कॅप्टन लक्ष्मी यांना पटली नाही. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण हवेच व ते त्या वयातच घेतले पाहिजे, असा त्यंचा ठाम विश्वास होता. मात्र या चळवळीत त्यांनी आपल्या अंगावरचे सर्व दागिने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या मदतीसाठी दिले.
सरोजिनी नायडूंची बहीण सुहासिनीचे कॅप्टन लक्ष्मीच्या आयुष्यात पदार्पण हा त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. सुहासिनीकडूनच त्यांनी राजकारणाचे प्राथमिक धडे घेतले. गांधी व नेहरू यांच्याकडून कधीही समग्र क्रांती होणार नाही. त्यांचे राज्य हे श्रमजीवींचे असणार नाही. जगभर श्रमिक भरडला जातोय. म्हणून समाजवादाला पर्याय नाही असे सुहासिनीने लक्ष्मी यांच्या  मनावर ठसविले. कॅप्टन लक्ष्मी एम.बी.बी.एस.चा अभ्यास करीत होत्याच पण त्याचबरोबर रशियन राज्यक्रांती, रशियामध्ये साम्यवादाचा उदय वगैरे जे जे साहित्य मिळेल ते वाचत असतं. एडगर स्नोचे Red star over China या पुस्तकाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. जे पटेल तेच स्वीकारायचे व कितीही विरोध झाला तरी करायचे हे तिथे ध्येय होते.  त्यांच्या वडिलांवरही कम्युनिस्ट विचारांचा पगडा आणि तिला आलेले अनुभव त्यातूनच त्यां पुढे कट्टर कम्युनिस्ट बनल्या.
कॅप्टन लक्ष्मी यांनी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच बी. के. एन. राव नावाच्या विमानचालकाशी त्यांनी  प्रेमविवाह केला पण, लग्नानंतर लगेचच त्यांचा भ्रमनिरास झाला. राव यांना आपली सुंदर पत्नी म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट वाटत होती. त्यांनी तिला कॉलेज सोडून संसार करायचा असे बजावले. त्यामुळे आपल्या ध्येयापुढे आड येणाऱ्या प्रेमविवाह झालेल्या नवऱ्याचा कायमचा त्याग करून यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९३८ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून त्यांनी  स्त्रीरोगतज्ज्ञाची पदवी घेतली आणि व्हिक्टोरिया क्रॉस हॉस्पिटलमधील विभागात नोकरी धरली. ११जून १९४०ला पुढील अभ्यासासाठी आणि गरीब स्त्रियांची सेवा करण्याच्या ध्येयाने त्या सिंगापूरला गेल्या. कॅप्टन मोहन सिंग या ब्रिटिश सेनेतील भारतीयाच्या साहाय्याने त्यांनी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ स्थापन केली.
सुभाषचंद्र बोस हे आशियात दाखल झाल्यावर त्यांनी सिंगापूर येथे सार्वजनिक सभेमध्ये भारतीय नागरिकांना उद्देशून भाषण केलं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा.त्यांच्या भाषणानंतर डॉ. लक्ष्मीने त्यांची भेट घेतली. त्यांना विचारलं, की तुम्ही स्त्रियांना सैन्यात प्रवेश का देत नाही?’ सुभाषचंद्र बोस म्हणाले, ‘स्त्रियांची पलटण तयार करण्यासाठी कमीत कमी ३००० स्त्रिया हव्यात. एवढय़ा तयार होतील का?’ तत्क्षणी  डॉ. लक्ष्मी यांनी त्यांना ३००० स्त्रियांना राजी करण्याचा शब्द दिला. हिंदुस्तानी बायका मागे राहणाऱ्या नाहीत. त्या अत्यंत कर्तृत्ववान आहेत हे ओळखून बाईंनी सिंगापूर-मलेशियातल्या ३००० बायका गोळ्या केल्याही. आम्ही रक्त देऊ, कुर्बानी देऊ, पण बायका म्हणून मागे ठेवू नका.हे त्यांनी बोस यांना कळकळीने सांगितलं. आणि स्त्रियांची पलटण तयार झाली. पुढे ‘इंडियन नॅशनल आर्मी’चे सुभाषचंद बोस यांनी ‘आझाद हिंद फौज’ असे नामकरण केले व या फौजेची ‘राणी झाशी रेजिमेंट’ ही महिला पलटण स्थापन करून लक्ष्मी यांची प्रमुख म्हणून नेमणूक केली.  त्यानंतर त्यांनी पूर्व मलाया व सिंगापूरचा दौरा करून बायकांच्या सभा घेतल्या. ज्यांना पलटणीत येता येत नव्हते, त्यांना सैन्यासाठी कपडे शिवणे, विणणे, बँडेज तयार करणे अशी कामेही सुचविली. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला.

२१ ऑक्टोबर १९४३ ला सुभाषबाबूंनी आझाद-हिंद-सरकारची घोषणा केली व लक्ष्मीला महिला व बालकल्याण खात्याची कॅबिनेट मंत्री केले. दुसऱ्याच दिवशी महिला पलटणीचे विधिवत व आझाद-हिंद सरकारची पलटण म्हणून उद्घाटन झाले. १९४४ पर्यंत १००० महिला जवान व ५०० परिचारिका जवान अशी १५०० ची पलटण झाली. युद्धसमाप्तीपर्यंत कॅ. लक्ष्मी लेफ्टनंट कर्नलच्या हुद्दय़ावर पोहोचली. या हुद्यापर्यंत पोहोचणारी ती पहिलीच महिला.
१९४७ मध्ये कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाहानंतर त्या कानपूरमध्येच स्थायिक झाल्या. डॉ. लक्ष्मींनी तिथे आपले दोन खाटांचे आणि फक्त ५ रुपये फी असलेले प्रसूतिगृह उघडले. हा दवाखाना त्यांनी शेवटपर्यंत चालविला अगदी वय वर्ष ९० पर्यंत...... १९७१ साली त्या  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या  सदस्य बनून कामे पाहू लागल्या. त्यांना १९९८ मध्ये ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरवण्यात आले होते. तर डाव्या पक्षांनी त्यांना त्यांच्या अखेरच्या पर्वात २००२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी दिली होती. वयोवर्धन परिषदेतही त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामान्य माणूस जोवर जागृत होऊन अन्यायाच्या प्रतिकारात उभा राहत नाही, तोवर दुसरा पर्याय नाही. लोकक्रांती हेच भ्रष्ट राजकारणाला थेट उत्तर आहे. असे मानणाऱ्या वयाच्या ९३ वर्षीही तितक्याच धडाडीने काम करणाऱ्या...अत्यंत तत्त्वनिष्ठ, प्रसंगी महामायेचे रूप धारण करणाऱ्या...आपल्या शेवटच्या क्षणीही आपले पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्याऱ्या कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन-सहेगल २३ जुलै २०१२ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी अनंतात विलीन झाल्या...
अशा या विसाव्या शतकातील रणरागिणीला, असामान्य धैर्याच्या, कर्तृत्वाच्या विरांगनेला......संपूर्ण महाराष्ट्राचे कोटी कोटी प्रणाम..!!!

1 comment:

  1. dipuu mastch...mahiti tuzya blogchya madhymatun milat aahe

    ReplyDelete