Saturday 11 August 2012

जगज्जेती बॉक्सर आणि भारताची सुपरमॉम- मेरीकोम



ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगच्या पदार्पणातच  पदक मिळविण्याची किमया करणारी...जबरदस्त इच्छाशक्ती,कष्ट आणि दुर्दम्य आत्मविश्वास याच्या जोरावर आपली  क्रीडा कारकीर्द समृद्ध करणारी...  स्वःबळावर आपलं कारकीर्द घडविणारी....क्रीडाविश्वातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने गौरवली गेलेली एम.सी. मेरी कोम...!!!
काहीजणांचा जन्मच बहुदा काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी होतो...म्हणजे त्यांच्या डोळ्यांना बिकट वाटच खुणावत असते. मांगते चुंगनेजंग मेरीकोम ही त्याच पठडीतील व्यक्तिमत्त्व...! पाच फुटांच्या आत-बाहेरची उंची, लालसर गोरा वर्ण, बसकं नाक, बारीक मिचमिचे डोळे, अशी सर्वसाधारण मणिपुरी बांध्याची मेरी कोम आज बॉक्सिंग रिंगची राणी होऊन गेली आहे. २०-२५ फुटांच्या त्या चौकोनावर ती अधिराज्य गाजवत आहे.
मेरीकोमचा जन्म मणिपूरमधील कांगाथेइ सारख्या अगदी दुर्गम खेड्यात, गरीब कुटुंबात झाला. तिचे आई वडील शेतात काम करायचे. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. पण मेरी कोम लहानपणापासूनच खेळांमध्ये अव्वल असायची. ती एक उत्तम अॅथलिट होती.  तिच्याच राज्यातील बॉक्सर डिंगको सिंग याने १९९८मधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांच्या याच यशाने मेरीकोमला बॉक्सिंगची आवड निर्माण झाली आणि  मेरीने 17व्या वर्षीच बॉक्सिंमध्ये करियर करण्याचा ठाम निश्चय केला होता.
वर्ष २००० मध्ये १७ वर्षांच्या मेरी कोमनं बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि प्रचंड मेहनत करून तिनं त्याच वर्षी राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवलं. वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी सगळंच बिंग फुटलं. वडील निराश झाले. पण बॉक्सिंगबद्दल मुलीच्या मनात असणारी ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. मग तर, मेरी कोमला हिरवा कंदिलच मिळाला आणि तिची गाडी सुसाट वेगाने सुटली. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पधेर्त मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या मुष्टीप्रहारानं तिनं प्रतिर्स्पध्यांना नामोहरम केलं. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिनं विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग सुरू झाला जागतिक स्पधेर्मधील विजेतेपदांचा सिलसिला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पधेर्त तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुदा  त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते.
२००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पधेर्त तिनं अजिंक्यपद पटकावले. मेरी कोमची उंची कमी असली, तरी तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिर्स्पध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. यशस्वी बॉक्सर व्हायचे असेल तर हृदय कणखर असायला हवे, असे तिचे म्हणणे आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८मध्ये तिनं चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले. सुरुवातीला तिला पैसे मिळविण्यासाठी खूपच झगडावे लागले होते. काही वेळा प्रसंगी अपुरेच भोजन घेऊन तिने सरावाकरिता निधी साठविला आहे. आता मात्र खूप व्यक्ती व संस्था तिला मदत करीत आहेत. गीत सेठी यांनी स्थापन केलेली ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, केंद्र शासन व राष्ट्रीय संघटना यांचे साहाय्य तिला लाभले आहे. त्यामुळेच  आता परदेशी प्रशिक्षक अ‍ॅटकिन्सन, तसेच फिजिओ जान्हवी जठार यांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे.
मुष्टियुद्ध हा जरी रांगडा खेळ असला आणि त्यामध्ये सतत आक्रमक चाली कराव्या लागतात ही जरी वस्तुस्थिती असली तरी मेरी कोम ही मनाने खूपच हळवी आहे आणि तितकीच शांत आहे. मुष्टियुद्धात जरी सातत्याने ठोशांचे युद्धच खेळावे लागत असले तरी प्रत्यक्षात मुष्टियुद्धाच्या रिंगबाहेर आल्यानंतर मेरी ही खूपच शांत असते आणि अनेक प्रश्नांना सामोरे जाताना ती हसतमुख असते. रिंगमध्ये स्ट्राँग हार्ट ठेवणारी मेरी घरी एक हळवी आई आहे. तिनं आपला खेलरत्न पुरस्कार आपल्या जुळ्या मुलांना अर्पण केला आहे.
आपल्या देशात एकूणच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. मुळातच मुष्टियुद्ध हा महिलांचा क्रीडा प्रकार नाही असा अनेक वेळा प्रचार करण्यात आला आहे आणि अजूनही होतो.  म्हणूनच जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग चार वर्षे विजेतेपद मिळविल्यानंतरही तिला राजीव गांधी  खेलरत्न पुरस्कारासाठी झगडावे लागले होते. पण आज मेरीकोमच्याच  यशामुळे भारतीय महिलाही या क्षेत्रात चमकू शकतात याची जाणीव सर्वाना झाली आहे. त्यातही चूल-मूल या पलीकडेही महिलांचे जग असते याची जाणीव अनेकांना झाली आहे.
मणिपूरमध्ये तिने मुलींसाठी मुष्टियुद्ध प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. सध्या वीस मुली तेथे शिकत आहेत आणि त्यामधील एका खेळाडूने नुकतीच राज्यस्तरावर विजेतेपद मिळवित अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या अकादमीसाठी तिला आर्थिक पाठबळ मिळत आहे, मात्र शेतातच सराव करावा लागतो. सरावासाठी एखादा छोटा हॉल द्यावा ही मागणी तिने गेली तीन-चार वर्षे मणिपूर शासनाकडे व संघटनेकडे करीत आहे, मात्र अद्याप या सुविधा तिला मिळालेल्या नाहीत. कदाचित त्यासाठीही तिला झगडावे लागणार आहे. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर जागतिक मुष्टियुद्ध सीरिजसारख्या स्पर्धामधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचेही तिचे ध्येय आहे. मुष्टियुद्धापासून तिला खूप काही शिकावयास मिळाले,मानसन्मान मिळाला, तिचे पतीही या खेळामुळेच मिळाले, या खेळाचे ऋण फेडण्यासाठी उर्वरित आयुष्य वाहून टाकण्याची तिची इच्छा आहे.
ऑलिम्पिकसाठी मेरी हिला तिच्या नेहमीच्या ४५ किलोऐवजी ४८ ते ५१ किलो या वजनी गटात खेळावे लागले. साहजिकच तिच्यासाठी हे आव्हान होते. ऑलिम्पिक पदक हे तिच्या नसानसात भिनले होते. त्याकरिता वाटेल तेवढे कष्ट घेण्याची तिची शारीरिक व मानसिक तयारी होती आणि त्याप्रमाणे तिचा सराव सुरू होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी  सेमीफायनलपर्य़ंत धडक मारून कास्य पदकावर नाव कोरत तिने एक नवा इतिहास तयार केला आहे. ती आज भारताची खरी सुपरमॉम ठरली आहे.
पाचवेळची जगज्जेती बॉक्सर असणाऱ्या....पहिली महिला मानद लेफ्टनंट कर्नल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या...मणिपूरसारख्या उपेक्षित राज्यात जेथे खेळासाठी फारसे पोषक वातावरण नसतानाही....केवळ आपल्या जिद्दीमुळे आणि घरच्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच एवढे यश मिळविणाऱ्या या भारताच्या सुपरमॉमला सुपर सलाम....!!!


2 comments: