Friday, 8 June 2012


सुमन कल्याणपूर     
भाव संगीतातील हिरवा चाफा...


‘
मेरी आवाज ही मेरी पहचान है' अशी स्वत:ची ओळख निर्माण करणं हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांची हयात निघून जाते, पण स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होत नाही. याउलट काही गायकांची ओळख ही मनावर कायम कोरल्या गेलेली असते, सुमन कल्याणपूर त्यातीलच एक..!
विश्वास, कृतज्ञता , प्रामाणिकपणा,आदर या आदर्श 'मूल्यांना' फारसा अर्थ नसणाऱ्या स्पर्धेच्या रानटी ईर्षा आणि स्वार्थने व्याप्त असलेल्या मायावी दुनियेतील गायिका सुमन कल्याणपूर यांची वाटचाल ही अनिश्चिततेच्या फे-यात अडकूनही कमालीची यशस्वी बनली म्हणूनच आज सुमनताईंनी पाश्र्वगायन सोडल्याला अनेक वर्षे उलटली तरी त्यांचे नाव व गाणं रसिकांच्या मनात तसंच ताजं आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ साली भवानीपूर या ढाक्याजवळील (तत्कालीन बंगाल प्रांत) छोट्याशा गावातील हेमाडी कुटुंबात झाला. घरातील धार्मिक, कलासक्त आणि रसिक वातावरणाने त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार झाले. तिथेच वडील शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले. १९४३ मध्ये दु. महायुद्धाच्या काळात हेमाडी कुटुंबीय मुंबईत दाखल झाले आणि सहा वर्षांच्या सुमनताईंच्या रीतसर संगीत शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यांना केशवराव आणि ज्योत्स्नाबाई भोळे हे शेजारी तर यशवंत देव हे शाळेतील संगीत शिक्षक म्हणून लाभले. शाळेत असतांनाच त्याचं एक गाणं ‘शुक्राची चांदणी’ नावाच्या मराठी सिनेमामध्ये रेकॉर्ड केलं गेल पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, हे गाणं आणि हा सिनेमाही कधी आलाच नाही. यामुळेच सुमनतार्इंची कारकीर्द मराठीतून सुरू न होता हिंदी चित्रपटसृष्टीतून सुरू झाली.

दहा वर्षे वेगवेगळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतानाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही त्यांना मिळत गेली. अशाच एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनतार्इंचा आवाज ऐकला. ‘इस लडकी के आवाज मे जादू है' अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एचएमव्हीकडे स्वत:हून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली.

१९५४ साली सुमनताईंनी आपलं पहिलं गाणं ‘मंगू’ चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं‘. संगीतकार मोहम्मद शफी आणि ओ. पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी या चित्रपटात पाच गाणी गायली. ‘कोई पुकारे धीरे से तुझे' हे त्यांच पहिलंच गाणं तुफान लोकप्रिय झालं. मात्र लता दिदींच्या आवाजाशी साधर्म्य असल्याने सुरुवातीला तिला 'प्रतिलता' ही उपाधी मिळाली खरी पण याचा तिला त्रासच जास्त झाला. सुमन हेमाडी ही लता मंगेशकरांची नक्कल करते, असं वाटून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवलं. खरं तर सुमनताई यांचा आवाज लतादीदीच्या जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. मात्र हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येत. त्यातल्या त्यात तेव्हा लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती. त्यामुळे लतादिदींशी ज्यांचं पटत नव्हतं अशा काही संगीत दिग्दर्शकांनीच सुमनतार्इंकडून गाणी गाऊन घेतली. त्यामुळेच सुमनताईंना मोठ्या बॅनरचे, मोठ्या संगीतकारांचे , मोठ्या नायिकांचे सिनेमे तसे फार कमी मिळाले. विनाकारणच वाद वाढतोय हे पाहून त्यांनी राजमार्गाचा नाद तेव्हाच सोडून दिला. ‘स्वान्त सुखाय’ या तत्वाने त्या गायल्या. ज्या क्षणी त्यांची कोंडी होताना दिसली त्या क्षणी त्यांनी वाट बदलली. संघर्ष, त्वेष, इर्षा या पासून कोसो दूर राहिल्या. मोजकं आणि मनाला भावेल इतकंच काम करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवलं.

सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांना आपल्या ताकतीची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव होती. अत्यंत्‍ गोड गळा आणि शब्दातील भावार्थ समजून समरसून गाणारी गायिका त्यामुळेच त्या वेगळ्या' ठरलल्या. या तत्त्वज्ञानामुळेच आज सुमन कल्याणपूर या नावाभोवती जे आदराचे आणि कौतुकाचे वलय निर्माण होते.

१९५८ मध्ये उद्योजक श्री रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची कारकीर्द खरया अर्थाने बहरली. आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांनी मोजकी परंतु आवडणारी गाणी निवडली. ठरावीकच गायचं परंतु ते ‘खास आपलं' असलं पाहिजे हा नियम त्यांनी जपला. त्यामुळे लतादिदींचा ऑप्शन हा टॅग मिटवून एक वेगळी ओळख त्या निर्माण करू शकल्या. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरीही त्यापैकी सुपरहिट झालेल्या गाण्यांचं प्रमाण अधिक असल्याने पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात त्यांना खरा न्याय मिळाला असच म्हणावं लागेल. नंतरच्या काळात मग अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते सुमनतार्इंकडूनच ते गाणे गाऊन घेत. ‘आजकल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर' हे ‘ब्रह्मचारी' चित्रपटातलं गाणं अनेकांना लतादिदींनीच गायलंय् असं वाटतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे.

मध्यंतरीच्या काळात लता मंगेशकर आणि महंमद रफी यांच्यात काहीतरी अनबन झाली, तेव्हा युगुलगीतं गाण्यासाठी संगीतकारांनी सुमनतार्इंचा आवाज वापरला. ही युगलगीतं इतकी लोकप्रिय
झाली की, नंतर रफी आणि सुमन कल्याणपूर ही जोडीच जमली. मराठीत आणि भाव गीतांच्या क्षेत्रात मात्र सुमन ताईला अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याचा मान मिळाला. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यांसमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. तसेच सुधीर फडके, श्रीनिवास खळे ,वसंत देसाई, स्नेहल भटकर या जाणत्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा), देवा दया तुझी ही (बोलकी बाहुली), जाग रे यादवा (प्रेम आंधळ असतं), तुझ्या कांतीसम रक्त पताका (अन्नपूर्णा) अशी असंख्य गाणीही लोकप्रिय झाली.
मराठी भावगीताच्या माध्यमातून त्यांनी अप्रतिम स्वरांगणाची निर्मिती केली. नंदाघरी नंदनवन फुलले , पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय,आकाश पांघरोनी जग शांत ,झिम झिम झरते श्रावण धारा ,घाल घाल पिंगा वाऱ्या, केतकीच्या बनी तिथे, नाविकारे वारा वही रे, तर भक्ती गीताच्या द्वारे (गणाधीश हो उठ लवकरी , ओमकार प्रधान रूप गणेशाचे,देह शुद्ध करूनी,चंदनाचे हात पाय ही चंदन, नाम आहे आदी अंती ,देव माझा विठू सावळा,चाल उठ रे मुकुंदा,श्रीरामाचे चरण धरावे) त्यांच्या स्वरातून रसिकांच्या मनावर अमृत शिंपणच होते. त्यांनी मराठी, हिंदी व्यतिरिक्त १३ भाषांमध्ये पाश्र्वगायन केलंय.

१९८० च्या दशकात कुटुंबांच्या जबाबदारया सांभाळत त्यांनी आपली करीअरची वाटचालही सुरू ठेवली. त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत त्यांचे पिता आणि नंतर त्यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. विशेषतः त्यांच्या पतीने प्रसंगी स्वतः चे व्यवसाय मागे ठेवून पत्नीचे करीयर घडविण्यात सिंहाचा वाट उचलला! सुमनताईं बरोबर प्रत्येक ठिकाणी जाताना ते त्यांना नैतिक आणि मानसिक बळच देत होते. याच काळात चित्रसृष्टीत झपाट्याने होत जाणारे बदल, त्यांच्या पतीची प्रकृती, इत्यादींमुळे त्यांनी खूप मोजकी गाणी गायली. मराठीमध्ये संगीतकारांनी केलेल्या नॉन फिल्मी अल्बम्ससाठीही त्यांनी गायन केलं. मात्र, नव्वदच्या दशकात त्यांनी व्यावसायिक संगीतक्षेत्रातून काम करणं बंद केलं.

देश विदेशात त्यांनी अनेक संगीताचे कार्यक्रम केले.बी बी सी टी.व्ही.वर मुलाखत देणारी ती पहिली कलावंत ठरली. सुमनताईंना २०१० मध्ये महंमद रफी पुरस्कार तर २०११ मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आणि झी गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. लता मंगेशकर पुरस्काराप्रती त्यांनी हा ‘एका सुमधुर आवाजाने दुसऱ्या सुमधुर आवाजाचा केलेला हा सन्मान आहे’ असे भाव व्यक्त केलेत तर ‘पती जिवंत असताना हा गौरव मला मिळाला असता तर आम्हा दोघांनाही भरपूर आनंद झाला असता’ या वाक्यात त्यांना जाणवत असलेली खंतही व्यक्त केली.

मायावी नगरीत आयुष्य घालवून सुमन कल्याणपूर तिथल्या गढूळ वातावरणापासून अलिप्त राहीलेल्या आपली कारकीर्द आपल्या निकषांवर सुरू ठेवणाऱ्या तर 'जो मिल गया उसिको मुकद्दर समज लिया, जो खो गया मै उसको भूलता चला गया'या साहिरच्या तत्वाशी देव सारखीच अभेद्य राहिलेल्या सुमन कल्याणपूर.
संगीत हा जीवनाचा भाग आहे आणि पाश्र्वगायन हा त्या संगीत साधनेतील एक छोटासा भाग असणाऱ्या सुमनताई आज पंच्याहातरव्या वर्षी सुखाने आयुष्य जगात आहेत.

हिरवाईच्या वाटेवर चालणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले...


डॉ. अर्चना गोडबोले.
पर्यावरणतज्ज्ञ, AERFच्या संस्थापिका...

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं वाचवणं याचबरोबर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं या आव्हानात्मक कामासाठी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) या संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले..

तीव्र इच्छेचा परिस हातात असला आणि त्याला अथक, मन:पूर्वक प्रयत्नांची जोड मिळाली तर एखादी अनवट वाटसुद्धा कशी लखलखीत होऊन उजळून निघते याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. अर्चना गोडबोले, ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’च्या (AERF) संस्थापिका... पण अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर कोकणातील देवराया आणि पर्यायाने पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापूर्वीच सावरावे म्हणून अखंड काम करणारी स्त्री...

महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास १९७० च्या दशकात प्रा. वा. द. वर्तक व डॉ. माधवराव गाडगीळ यांनी सुरू केला. त्यांची ही परंपरा डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अर्चना गोडबोले आदींनी पुढे नेली. महाराष्ट्रात एकूण ३५०० देवराया आणि त्यात तब्बल ७०० पेक्षा अधिक वनस्पती असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. असंख्य जीव- जिवाणू, वन्यजीव व विशेष करून ‘मलबार धनेश’ हा पक्षी सह्य़ाद्रीतील देवरायातच आढळतो. आज कोकणातील देवरायांचा हा प्रश्न केवळ ‘लोकल’ नाही, तर ‘ग्लोबल’ पातळीवर होणारी तापमानवाढ, बदलणारे ऋतुचक्र, नैसर्गिक संसाधनांची अमाप वेगाने होणारी हानी अशा सगळ्या प्रश्नांशी त्याचे नाते आहे.

या दोन्ही पातळ्यांवर काम करताना अर्चना कधी सावंतवाडी, कुडाळजवळच्या अगदी दुर्गम अशा छोटय़ा गावांमध्ये असतात तर कधी दोन-अडीच महिने अमेरिकेत मात्र दोन्ही ठिकाणचा अजेंडा एकच. समविचारी लोकांच्या भेटीगाठी. पर्यावरणाचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून काय प्रयत्न करता येईल याची आखणी आणि असेच काही.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अर्चनाच्या घरात पैशाची श्रीमंती फार नव्हती, पण पुस्तक, वाचन, चर्चा अशी वैचारिक समृद्धी भरपूर होती. मोठी स्वप्नं बघण्यासाठी लागणारी हिंमत तिला तिच्या वडिलांनी दिली, अर्चना यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागलेली बघायची होती तेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता अर्चना यांनी वनस्पती नामकरणशास्त्रात एम. एस्सी. केली मग मानव वनस्पतीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. शिक्षण चालू असतानाचा काळ हा त्यांच्यासाठी जणू झपाटलेला कालखंड होता. मनापासून आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्याचा आनंद तर होताच, पण पश्चिम घाट बचाव चळवळीच्या संपर्कात आल्याने आवडत्या विषयात प्रत्यक्ष काम करण्याचे धडेही त्याच वेळी मिळत होते. चळवळीतील सहकारी असलेले आणि पर्यावरणासंबंधात मराठी पत्रकारिता करणारे जगदीश गोडबोलेने शंभर दिवसांच्या या मोहिमेत संपूर्ण पश्चिम घाट पालथा घालण्याचे ठरवले होते. पर्यावरण संरक्षणाच्या कामाची दिशा अर्चना यांना या मोहिमेतून मिळाली आणि स्वत:मधील सामथ्र्य, कौशल्य याची ओळखही स्पष्टपणे झाली. या मोहिमेनंतर त्यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण खात्यात नोकरीत केली, पण त्या कामाचे समाधान फारसे मिळाले नाही, पण जंगल संरक्षण आणि संवर्धन या कामासाठी आवश्यक असलेली अभ्यास व संशोधनाची पाश्र्वभूमी मात्र तयार झाली.

देवरायांचे संरक्षण-संवर्धन करणारी संस्था स्थापण्याच्या खटाटोपाऐवजी पर्यावरण विषयातील एखादे झुळझुळीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील पद, नोकरी मिळवणे हे त्यांच्यासाठी फारसे अवघड नव्हते. पण त्यांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली, खडतर पण शाश्वत विकासाचे आश्वासन देणारी. जैविक विविधतेच्या संदर्भात संशोधन, या विविधतेचे रक्षण आणि संवर्धन आणि त्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन हे सूत्र घेऊन(AERF) या त्यांच्या संस्थेने काम सुरू केले. पुढे पर्यावरणासाठी इतके मूलभूत काम करणाऱ्या संस्थेला आणि माणसांना कोकणच्या जंगलाने आमंत्रण दिले...!

कोकणात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या देवराया म्हणजे निव्वळ वृक्षसमूह आणि त्यावरील प्राणी-पक्षी जीवन नाही. ती एक संपूर्ण अशी पर्यावरण व्यवस्था आहे. परस्परांना जगवणारी आणि त्यामुळे परस्परांवर अवलंबून असणारी. त्याच्या आसपास जगणाऱ्या माणसांच्या जीवनाला सर्वार्थाने आधार देणारी ही व्यवस्था... या व्यवस्थेला मूठभर लोभी माणसांपासून वाचवायची गरज आहे तर त्यासाठी लोकांचा पाठिंबा हवा, मदत हवी, लोकजागृती आणि त्यातून स्वयंस्फूर्तीने लोकसहभाग आवश्यक असल्यामुळे त्यांचे सगळे कामच लोकसहभागाभोवती गुंफले आहे.

सध्या देवराई संरक्षणाबरोबर, खाणकाम उद्योग हे ही एक कडवं आव्हान बनतं आहे. पण त्याच्याशी लढण्यासाठीही मोर्चे काढण्यापेक्षा, नारेबाजी करण्यापेक्षा ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे धोरण अर्चनाने अनुसरले आहे कारण मोर्चे काढून, आंदोलन करून, सरकारवर जबाबदारी टाकून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते पूर्ण पणे थांबणार नाहीत. फार तर सरकारी आदेश निघतील हे त्यांना देवरई संरक्षणाच्या अनुभवातून कळून चुकले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील असनिये गावातील खाणकाम थांबवण्यासाठी या परिसरातील जैवविविधतेचा एक वर्ष सखोल अभ्यास करून तपशीलवार अहवाल तयार केला गेला आणि गावातील लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनवाईमध्ये या अहवालाच्या आधारे प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यात आला. समाजातील सत्ताधीश, पैशाची अमाप सत्ता बाळगत निर्णय आपल्या बाजूने वळवणाऱ्यांचा विरोध पत्कारत ज्या भूमीच्या पोटात तुम्ही खणत खोल उतरता तिचे आणि तिच्या आधारे जगणाऱ्या माणसांची काही बाजू आहे व ती त्या हिरिरीने मांडते आहेत.

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं निव्वळ वाचवणं हे अर्चना यांच्या पुढील आव्हान नाही तर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं हे त्यांच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे काम आहे आणि त्यासाठी My Forest नावाचा उपक्रम त्यांनी वं त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतला आहे. जैवविविधतेच्या प्रश्नी ज्यांना आस्था आहे त्यांनी एक एकर जमीन पाच वर्षांसाठी, पाच हजार रुपये देऊन दत्तक घ्यायची. हे पैसे जंगले तोडून पैसे कमवू इच्छिणाऱ्या जमीन मालकाला दिले जातात आणि जंगल वाचवले जाते. एक जंगल वाचते तेव्हा त्याच्या अंगा-खांद्यावर जगणारे प्राणी, पक्षी, कीटक तर वाचतातच, पण हवेचे प्रदूषण काही अंशाने कमी होते आणि पावसाचे चार काळे ढग त्या जंगलाच्या माथ्यावर येण्याच्या शक्यता वाढतात.

अर्चना यांच्या आयुष्याचा साथीदार जगदीश त्यांचा हात सोडून गेल्यावर आता निसर्ग हाच त्यांचा आप्त, मित्र सर्व काही आहे. भटकंती करीत निसर्गाची तऱ्हेतऱ्हेची रूपे बघायला आवडणाऱ्या अर्चना यांना या भटकंतीतच विविधरंगी, अद्भुत निसर्ग, त्याची अनंत रूपे बघायला मिळाली.

आत्तापर्यंत जागतिकीकरणाचे वारे येण्यापूर्वीपर्यंत सामान्य माणसांचे निसर्गाशी काहीतरी नाते होते. घरातील प्रत्येकाला किमान चार झाडांची नावे ठाऊक होती. अंगणा-परसातील झाडे ओळखता येत होती. निसर्गातील शांतता त्याला हवीशी वाटत होती. या ना त्या निमित्ताने तो निसर्गाशी जोडलेला होता. त्यामुळे ‘निसर्गाला सांभाळा’ हे सामान्य माणसाला सांगणे-पटवून देणे सोपे होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या रेटय़ाने माहिती, उपभोगाची साधने याचा जो एक महापूर आपल्याकडे आला आहे, त्यात हे नाते, मूल्यविवेक फार वाहून गेला आहे. आता निसर्गाचा आदर करणे माणसं विसरलीच आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये निसर्गाबद्दलची, त्यातील संसाधनांबद्दलची कमालीची वाढलेली बेफिकिरी आणि अलिप्तपणा त्यामुळे निसर्गाशी त्यांचे नाते आहे ते फक्त ओरबाडून घेण्यापुरतेच. अशा या आव्हानांशी आता पर्यावरणासाठी लढणाऱ्या अर्चनासारख्या कार्यकर्त्यांना लढावे लागते आहे. २०११ ला डॉ. अर्चना गोडबोले आणि कोल्हापूरच्या ‘निसर्ग मित्र'चे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटाचा भाग असणाऱ्या राज्यांच्या संस्थां, पर्यावरणाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरविले आहे.

हिरवाईच्या हाकेला ‘ओ’ देऊन, हिरव्या वाटेवरचा ह्या वेगळ्या प्रवासावर असणाऱ्या अर्चना सारख्या अनेकांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांकारिता आणि पर्यावरण संवार्धानाकरिता अनेक अनेक शुभेच्छा...!!!

साभार- लोकसत्ता...

Friday, 1 June 2012

विश्वनाथन आनंद...
जगज्जेता ‘विश्व’नाथ आनंद.....!!!


जन्म:- डिसेंबर ११, १९६९ – हयात...

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर व सध्याचा जगज्जेता असलेला बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद... चौसष्ट घरांचा अनभिषिक्त राजा भारताचा विश्वनाथन आनंद पाचव्यांदा जागतिक
... बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला आहे... बुद्धिबळात विश्वअनाथन आनंदची ओळख कायम वेगवान चालींसाठी प्रसिद्ध असलेला बुद्धिबळपटू अशीच आहे... जबरदस्त वेगाने आक्रमक चाली करीत आनंद बाजी मारत असल्यामुळे अनेक बुद्धिबळ तज्ज्ञ त्याचे चाहते आहेत...

भारतामधील बुद्धिबळाच्या शककर्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या विश्वनाथन आनंद याने बुद्धिबळाच्या माहेरघरी इस्त्रायलचा आव्हानवीर बोरिस गेलफंड याच्यावर मात करत पाचव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला आहे...मास्को हे शहर बुद्धिबळातील मक्का मानले जाते आणि याच शहरात विश्वविजेतेपद मिळवत विश्वनाथ आनंद याने भारताचा झेंडा फडकविला आहे..

अतिशय शांत, संयमी आणि हसतमुख व्यक्तीमत्वाच्या आनंदने मानसिक संतुलन राखत संयम व चिकाटी यांचा सुरेख समन्वय साधल्यास विजेतेपद मिळविता येते हे दाखवून दिले आहे.. आणि तो एक महान खिलाडू आहे हे परत एकदा सिद्ध केलय...

विश्वनाथन आनंदने १९९८ मध्ये भारताचे पहिले ग्रैंडमास्टर बनण्याचा मन मिळवला आणि २००० मध्ये स्पेनच्या अलेक्सी शिरोवला मात देवून फिडेचे (FIDE फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या) जगज्जेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बनले.... सप्टेंबर २००७ साली मेक्सिको शहरात झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत एकाही सामना न हरता, इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवून जगज्जेता पद मिळविले... २००८ मध्ये आनंदने रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला तर २०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या तोपालोवला बुल्गेरियामध्ये हरवुन जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले....

एप्रिल २००७ मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली... हे स्थान त्याने १५ महिने टिकवले... मात्र जुलै २००८ मध्ये त्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान राखण्यात अपयश आले... त्यानंतर २०१० मध्ये त्याने बिलाबाओ मास्टर्स स्पर्धेत जगातील अव्वल मानांकित खेळाडू कार्लसन याला पराभूत करून पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेतले.. २००८ च्या सामन्यानंतर आनंदने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या तीन वेगवेगळ्या प्रकारात म्हणजे आव्हानवीर सामना, जलदगती पद्धत व बाद फेरीची स्पर्धा अशा तिन्ही स्वरुपात पहिला जगज्जेता होण्याचा मान मिळविले आहे.... आतापर्यंत तब्बल ६ ऑस्कर जिंकलेला विश्वनाथन आनंद आज बुद्धिबळातील निर्विवाद बादशाह बनला आहे...

विश्वनाथन आनंदला आजवर मिळालेले पुरस्कार :-

भारत सरकारचा खेळ पुरस्कार - अर्जुन पुरस्कार (१९८५)

भारत सरकार 'पद्मश्री' (१९८७),

भारत सरकार 'पद्मभूषण' (२०००) व 'पद्मविभूषण' (२००७)

भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - 'राजीव गांधी खेळ रत्न' (१९९१-१९९२)
हा पुरस्कार मिळणारा विश्वनाथन आनंद हा पहिला खेळाडू आहे.

स्पेन सरकारचा सर्वोच्च पुरस्कार - Jameo de Oro (२५ एप्रिल २००१).

चेस ऑस्कर - सहा वेळा (१९९७, १९९८, २००३, २००४, २००७, २००८ आणि २००९).

आनंदने कास्पारॉव्ह, टोपालोव्ह, कार्लसन या वेगवेगळ्या पिढय़ांतील विजेत्यांवर विजय मिळवून खर्या८ अर्थाने अनभिषिक्त सम्राट झाला आहे... कारण त्याने 50 च्या सुमारास जन्मलेल्या पिढीपासून 60, 70, 80 पर्यंतच्या सर्वांवर मात केली आहे...तेव्हा आनंद तीन पिढय़ांचा चॅम्पियन आहे म्हटलं तरी चालेल.. कास्पारॉव्ह विश्वविजेता होता, परंतु तोही आपले साम्राज्य टिकवताना घाबरायचा.. विश्वविजेता असतानाही तो खेळला नाही... चाळिशीनंतर आनंदचाही खेळ खराब होईल असे त्याने भाकीत केले होते, परंतु चाळीशी ओलांडूनही आनंद चॅम्पियन होत आहे... या आधीही आनंद जगज्जेता होता पण एकदा मिळवलेले विजेतेपद टिकविण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात, तेच आनंदने केले... पाचव्यांदा बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकावून त्याने तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे...

खर्याे अर्थाने बुद्धिबळाचा सम्राट असणाऱ्या या जगज्जेत्याला सलाम आणि त्याच्या या अतुलनीय यशासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!!

Monday, 14 May 2012

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज...
सिंहाचा छावा.......

जन्म :- १४ मे इ.स.१६५७
मृत्यू :- ११ मार्च इ.स १६८९


मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते. आठ भाषांचे जाणकार असणारे ‘बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिणारे राजे. आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट करून , स्वराज्यातील एकही किल्ला न गमावता , मराठ्यांचे आरमार शक्तीशाली करणारे छत्रपती संभाजीराजे. औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविणारा मराठ्यांचा हा छावा....

छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ' राजेंच्या दुधाई बनल्या. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच, राजकारण लवकर आत्मसात केले. विद्याभ्यास, घोडस्वारी, शास्त्रविद्या, दंडनिती, राजधर्म , राजपुत्र धर्म, पितृसेवा, राजकारण अशा प्रकारे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण त्यांना दिले गेले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची जडणघडण अतिशय काटेकोर पद्धतीने राजमाता जिजाऊंच्या देखरेखी खाली होत गेली.

छत्रपती शिवरायांनी संभाजीराजें अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले. आग्रा भेटीवेळी संभाजी राजेंना मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती. त्यामुळे जेव्हा औरंगजेबने कपटाने छत्रपती शिवरायांना कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा,छत्रपतींना खुप उपयोग झाला. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.


१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी राजे दुसऱ्यांदा पोरके झाले. तर छत्रपती राजारामाचा जन्म झाल्यामुळे सोयराबाई संभाजी राजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या. संभाजीराजे अत्यंत देखणे व शूर होते, त्यांना भ्रष्टाचार खपत नसे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील अण्णाजी दत्तोंच्यासारख्या काही लोकांचा भ्रष्टाचार संभाजीराजेंनी उघडकीस आणल्यामुळे ते संभाजी राजेंविरूध्द गेले. शिवरायांनंतर जर संभाजी राजे गादीवर बसले तर आपले काही खरे नाही असे अष्टप्रधानातील भ्रष्ट लोकांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी महाराणी सोयराबाईंना फूस लावून शिवरायांनंतर छोट्या राजारामाला गादीवर बसविण्याचे मनोरथ आखले आणि संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले.

छत्रपती शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतातील मोहिम आखली, तेव्हा त्यांनी संभाजी राजेंना सोबत नेण्याचा विचार केलेला होता, जेणेकरून संभाजी राजेंना मोहिमेचा अनुभव येईल. पण छत्रपतीसोबत गेल्यावर संभाजी राजेंचे कर्तृत्व शिवरायांच्या नजरेत भरेल व राजे म्हणून ते संभाजीराजेंची निवड करतील असे वाटल्यामुळे, अष्टप्रधान मंडळीनी सोयराबाईंकरवी महाराजांना, संभाजीराजेंना सोबत नेण्यास विरोध दर्शविला. महाराज या सर्वापुढे हतबल झाले व त्यांनी संभाजी राजेंना शृंगारपूरचे सुभेदार म्हणून पाठविले.

शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी, लेखक जागा झाला. या कालावधीत त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. ‘बुधभूषणम्’ हा संस्कृत तर ‘नायिकाभेद’ , ‘नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत निपुण असणाऱ्या संभाजीचे संस्कृत व हिंदी या भाषांवरील प्रभुत्व या ग्रंथांवरून दिसून येते.
याच काळात शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला. पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला. संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत, असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला. तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.

आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले. अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला. मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला. येथे संभाजी राजेंचा निर्णय चुकला. दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला. शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली. संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली. पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला. मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले. तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट घडली. संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.

१५ मार्च १६८० राजारामच्या विवाहानंतर काही दिवसांनीच म्हणजे ३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले. ही बातमी सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळी यांनी संभाजी राज्यांना कळवलीच नाही उलट लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे ठरवून २१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले. मोरोपंत,प्रल्हाद निराजी आणि अण्णाजी दत्तो या मंडळीनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे पाठविण्यात आले. त्याप्रसंगी हंबीरराव मोहिते (सोयराबाईंचे सख्खे बंधू) यांनी संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत तसेच मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडे आहे. त्यातच मोघल सुभेदार बहादुरखान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता. अशा वेळी राजारामला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते. या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून ते संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिले.

सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक, किल्ले रायगडावर झाला. या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळीना माफ केले व परत सर्वांना अष्टप्रधानात स्थान दिले. पण काही महिन्याने या मंडळीनी परत बंडाळी केली, तेव्हा कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्याी परली गावात हत्तीच्या पायी दिले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. त्यानंतर बुर्हाबणपुरची मोहिम, मोघलांशी लढा, सिद्दीचा बंदोबस्त, रामसेजचा ऐतिहासिक लढा, म्हैसूरकर चिक्कदेवराजाचा बंदोबस्त, गमेश्वरला दगा अशा केवळ ९ वर्षांच्या काळात तब्बल १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.

याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्याम धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्यांामुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली.

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर संभाजी राजे यांना ३५५व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा..!!!

जय जिजाऊ !!
जय शंभूराजे !!
जय शिवराय !!

Saturday, 12 May 2012


ई. श्रीधरन…
कोकण रेल्वेचे शिल्पकार... मेट्रो मॅन...


जन्म-- ६ डिसेंबर इ.स. १९३२, पलक्कड, केरळ – हयात...


आपल्या देशाचा विकास हेच एकमेव स्वप्नं उराशी बाळगून, भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे तसेच सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेतून कर्तृत्ववान आणि निस्पृह माणूस काय चमत्कार घडवून अणु शकतो हे दाखवणारे, देशभक्तीने झपाटलेले अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे. पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत.

आपल्या अफाट बुद्धीमत्तेने मेट्रो रेल्वे बांधून कोलकता आणि दिल्लीतील लाखो लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर करणारे , आधुनिक भारताच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल असे कोकण रेल्वेचे शिल्पकार, खाजगी कंपनी कडून मिळणारे वार्षिक करोडो रुपयांचे पकेज ठोकरून देशाचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून गेली ५८ वर्षे वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत सरकारी नोकरीच करणारे आणि 'आशियातले हिरो' म्हणून टाईम म्यागझिनने ज्यांचा सन्मान केला असे इंजिनिअरिंग क्षेत्रातले भीष्म पितामह श्री ई. श्रीधरन...

डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.

१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्‌-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले.
१९७० मध्ये उपमुख्य अभियंता म्हणून कोलकाता मेट्रोच्या नियोजन, आरेखन व अंमलबजावणीच्या कामासाठी त्यांना पदभार सोपविण्यात आला. ही भारतातील प्रथम मेट्रो सेवा होती. ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते. जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. ते सदस्य म्हणून १९९० मध्ये भारतीय रेल्वेतून निवृत्त झाले.

ते निवृत्त झाल्यावरही त्यांची सेवा भारत सरकारला हवी होती. त्यांना १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेचे मुख्य प्रबंध संचालक म्हणून नियुक्त केल्या गेले. त्यांच्या आधिपत्याखाली हा प्रकल्प सात वर्षात पूर्ण किल्ल्या गेला. तो अनेक बाबतीत अद्वितीय आहे. त्यात अनेक खुब्या होत्या तो 'बांधा वापरा व हस्तांतरीत करा' या तत्त्वाचा प्रथम प्रकल्प होता. भारतीय रेल्वेच्या खास शैलीपेक्षा त्याची संस्थाकृत बांधणी अगदी वेगळी होती. या प्रकल्पात ८२ कि.मी मध्ये ९३ बोगदे होते जे मृदु मातीत बनविल्या गेले. ही रेल्वेलाईन ७६० किमी लांबीची आहे ज्यात सुमारे १५० पूल आहेत. हा अत्यल्प दरात पूर्ण झालेला प्रकल्प होता. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.

२००५च्या मध्यावधीत त्यांना दिली मेट्रोचे प्रबंध संचालक बनविल्या गेले. यातील विविध विभाग त्याच्या अंदाजपत्रकिय किमतीत व नियोजित वेळेत वा त्याआधी पूर्ण करावयाचे होते. त्यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे 'मेट्रो मॅन' ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना अनेक पुरस्कार आणि पदकांनी सन्मानित करण्यात आले.

२००१ मध्ये भारत सरकारने त्यांचा “पदमश्री” देऊन सन्मान केला.
२००२ साली टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना “मॅन ऑफ द ईयर” म्हणून निवडले.
२००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची “आशियातील एक पुढारी” म्हणून निवड केली.
२००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.
२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पदमविभूषण” देऊन गौरवले.

श्रीधरन यांनी रेल्वेला दिलेले हे योगदान सुवर्णाक्षरांनीच लिहावे लागेल. त्यांनी कोलकाता आणि दिल्लीतले 'मेट्रो' प्रकल्प यशस्वी करून दाखविलेच. पण आज ७६० किलोमीटर धावणारी कोकण रेल्वे हा श्रीधरन यांच्या कर्तबगारीचा अजोड नमुना आहे. ९३ बोगदे आणि दीडशे पूल असणारा हा मार्ग स्वप्नातून सत्यात आला तो श्रीधरन यांच्या अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापकीय कौशल्यांमुळे.
निष्कलंक चारित्र्य, अखंड परिश्रम, स्वत:ची प्रतिभा समाजासाठी वापरण्याची बुद्धी आणि समावेशक नेतृत्व यातून मोठी कामे कशी उभी करता येतात, याचे ई. श्रीधरन हे मूर्तिमंत रूप आहे.

आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्याु परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन ३१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त झाले.

कोकण रेल्वेचे शिल्पकार... निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करणाऱ्या "मेट्रो मॅन" ई. श्रीधरन यांना संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...!!!
ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि ह्या पुढेही त्यांच्या कडून अशीच देशाची सेवा घडो आणि आपल्या देशात असे शेकडो ई. श्रीधरन उदयाला येवोत हीच ईश्वरा कडे प्रार्थना..!!