Saturday, 11 August 2012

जगज्जेती बॉक्सर आणि भारताची सुपरमॉम- मेरीकोम



ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगच्या पदार्पणातच  पदक मिळविण्याची किमया करणारी...जबरदस्त इच्छाशक्ती,कष्ट आणि दुर्दम्य आत्मविश्वास याच्या जोरावर आपली  क्रीडा कारकीर्द समृद्ध करणारी...  स्वःबळावर आपलं कारकीर्द घडविणारी....क्रीडाविश्वातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने गौरवली गेलेली एम.सी. मेरी कोम...!!!
काहीजणांचा जन्मच बहुदा काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी होतो...म्हणजे त्यांच्या डोळ्यांना बिकट वाटच खुणावत असते. मांगते चुंगनेजंग मेरीकोम ही त्याच पठडीतील व्यक्तिमत्त्व...! पाच फुटांच्या आत-बाहेरची उंची, लालसर गोरा वर्ण, बसकं नाक, बारीक मिचमिचे डोळे, अशी सर्वसाधारण मणिपुरी बांध्याची मेरी कोम आज बॉक्सिंग रिंगची राणी होऊन गेली आहे. २०-२५ फुटांच्या त्या चौकोनावर ती अधिराज्य गाजवत आहे.
मेरीकोमचा जन्म मणिपूरमधील कांगाथेइ सारख्या अगदी दुर्गम खेड्यात, गरीब कुटुंबात झाला. तिचे आई वडील शेतात काम करायचे. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. पण मेरी कोम लहानपणापासूनच खेळांमध्ये अव्वल असायची. ती एक उत्तम अॅथलिट होती.  तिच्याच राज्यातील बॉक्सर डिंगको सिंग याने १९९८मधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांच्या याच यशाने मेरीकोमला बॉक्सिंगची आवड निर्माण झाली आणि  मेरीने 17व्या वर्षीच बॉक्सिंमध्ये करियर करण्याचा ठाम निश्चय केला होता.
वर्ष २००० मध्ये १७ वर्षांच्या मेरी कोमनं बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि प्रचंड मेहनत करून तिनं त्याच वर्षी राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवलं. वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी सगळंच बिंग फुटलं. वडील निराश झाले. पण बॉक्सिंगबद्दल मुलीच्या मनात असणारी ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. मग तर, मेरी कोमला हिरवा कंदिलच मिळाला आणि तिची गाडी सुसाट वेगाने सुटली. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पधेर्त मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या मुष्टीप्रहारानं तिनं प्रतिर्स्पध्यांना नामोहरम केलं. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिनं विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग सुरू झाला जागतिक स्पधेर्मधील विजेतेपदांचा सिलसिला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पधेर्त तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुदा  त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते.
२००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पधेर्त तिनं अजिंक्यपद पटकावले. मेरी कोमची उंची कमी असली, तरी तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिर्स्पध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. यशस्वी बॉक्सर व्हायचे असेल तर हृदय कणखर असायला हवे, असे तिचे म्हणणे आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८मध्ये तिनं चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले. सुरुवातीला तिला पैसे मिळविण्यासाठी खूपच झगडावे लागले होते. काही वेळा प्रसंगी अपुरेच भोजन घेऊन तिने सरावाकरिता निधी साठविला आहे. आता मात्र खूप व्यक्ती व संस्था तिला मदत करीत आहेत. गीत सेठी यांनी स्थापन केलेली ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, केंद्र शासन व राष्ट्रीय संघटना यांचे साहाय्य तिला लाभले आहे. त्यामुळेच  आता परदेशी प्रशिक्षक अ‍ॅटकिन्सन, तसेच फिजिओ जान्हवी जठार यांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे.
मुष्टियुद्ध हा जरी रांगडा खेळ असला आणि त्यामध्ये सतत आक्रमक चाली कराव्या लागतात ही जरी वस्तुस्थिती असली तरी मेरी कोम ही मनाने खूपच हळवी आहे आणि तितकीच शांत आहे. मुष्टियुद्धात जरी सातत्याने ठोशांचे युद्धच खेळावे लागत असले तरी प्रत्यक्षात मुष्टियुद्धाच्या रिंगबाहेर आल्यानंतर मेरी ही खूपच शांत असते आणि अनेक प्रश्नांना सामोरे जाताना ती हसतमुख असते. रिंगमध्ये स्ट्राँग हार्ट ठेवणारी मेरी घरी एक हळवी आई आहे. तिनं आपला खेलरत्न पुरस्कार आपल्या जुळ्या मुलांना अर्पण केला आहे.
आपल्या देशात एकूणच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. मुळातच मुष्टियुद्ध हा महिलांचा क्रीडा प्रकार नाही असा अनेक वेळा प्रचार करण्यात आला आहे आणि अजूनही होतो.  म्हणूनच जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग चार वर्षे विजेतेपद मिळविल्यानंतरही तिला राजीव गांधी  खेलरत्न पुरस्कारासाठी झगडावे लागले होते. पण आज मेरीकोमच्याच  यशामुळे भारतीय महिलाही या क्षेत्रात चमकू शकतात याची जाणीव सर्वाना झाली आहे. त्यातही चूल-मूल या पलीकडेही महिलांचे जग असते याची जाणीव अनेकांना झाली आहे.
मणिपूरमध्ये तिने मुलींसाठी मुष्टियुद्ध प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. सध्या वीस मुली तेथे शिकत आहेत आणि त्यामधील एका खेळाडूने नुकतीच राज्यस्तरावर विजेतेपद मिळवित अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या अकादमीसाठी तिला आर्थिक पाठबळ मिळत आहे, मात्र शेतातच सराव करावा लागतो. सरावासाठी एखादा छोटा हॉल द्यावा ही मागणी तिने गेली तीन-चार वर्षे मणिपूर शासनाकडे व संघटनेकडे करीत आहे, मात्र अद्याप या सुविधा तिला मिळालेल्या नाहीत. कदाचित त्यासाठीही तिला झगडावे लागणार आहे. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर जागतिक मुष्टियुद्ध सीरिजसारख्या स्पर्धामधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचेही तिचे ध्येय आहे. मुष्टियुद्धापासून तिला खूप काही शिकावयास मिळाले,मानसन्मान मिळाला, तिचे पतीही या खेळामुळेच मिळाले, या खेळाचे ऋण फेडण्यासाठी उर्वरित आयुष्य वाहून टाकण्याची तिची इच्छा आहे.
ऑलिम्पिकसाठी मेरी हिला तिच्या नेहमीच्या ४५ किलोऐवजी ४८ ते ५१ किलो या वजनी गटात खेळावे लागले. साहजिकच तिच्यासाठी हे आव्हान होते. ऑलिम्पिक पदक हे तिच्या नसानसात भिनले होते. त्याकरिता वाटेल तेवढे कष्ट घेण्याची तिची शारीरिक व मानसिक तयारी होती आणि त्याप्रमाणे तिचा सराव सुरू होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी  सेमीफायनलपर्य़ंत धडक मारून कास्य पदकावर नाव कोरत तिने एक नवा इतिहास तयार केला आहे. ती आज भारताची खरी सुपरमॉम ठरली आहे.
पाचवेळची जगज्जेती बॉक्सर असणाऱ्या....पहिली महिला मानद लेफ्टनंट कर्नल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या...मणिपूरसारख्या उपेक्षित राज्यात जेथे खेळासाठी फारसे पोषक वातावरण नसतानाही....केवळ आपल्या जिद्दीमुळे आणि घरच्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच एवढे यश मिळविणाऱ्या या भारताच्या सुपरमॉमला सुपर सलाम....!!!


Tuesday, 7 August 2012

भारतीय सिनेमाला मिळालेला पहिला डान्सिंग स्टार- मास्टर भगवान पालव


सध्या भारतीय सिनेमाची शताब्दी सुरू आहे आणि याच सिनेजगतात तब्बल ६५  वर्षं घालवून रसिकांची मनमुराद करमणूक करणारे...गेली अनेक दशके चित्रपट रसिकांना बेधुंद करणारे..स्टंट चित्रपटांचे मर्दानी नायक व अभिजात नर्तक असे जगावेगळे मिश्रण असलेले...हास्य अभिनेते म्हणून नावाजलेले गेलेले कलाकार मास्टर भगवान यांची जन्मशताब्दीही 0१ ऑगस्टपासून सुरू झाली आहे...
१९१३ साली पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला. हेच १९१३ साल हिंदी चित्रपट जगतातील एका अवलिया मराठी कलावंताचे जन्मसाल आहे. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटांना मिळालेली अतीव लोकप्रियता ही कर्णमधुर-भावुक गीत-संगीताने मिळाली हे सर्व खरे, तेवढाच महत्त्वाचा यशाचा वाटा हा या चित्रपटातील नृत्यशैलीमुळे अधोरेखित झाला हेही तितकेच खरे...याच नर्तनकलेत आपली वेगळी छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेता म्हणजे मास्टर भगवान होय.
भगवान पालव या अस्सल कोकणी माणसाचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी मालवण भागात झाला. बालपण खुप हलाखीत काढणाऱ्या भाग्वानादादांचे शिक्षण कसंबसं चौथी पर्यंत झाले होते. त्यांना लहानपणापासूनच मास्टर विठ्ठल यांचे चित्रपट पहायला आवडायचे. त्यांच्यासारखे आपणही चित्रपटात काम करावं आणि सगळीकडे लोकप्रिय व्हावं असं भगवानदादांना नेहमी वाटायचं. पण गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं...
मास्टर विठ्ठल हे दादांचे दैवत...! त्यांच्यासारखे आपणही एक दिवस हीरो व्हावे हा एकच ध्यास त्यांनी विद्यर्थीदशेपासून घेतलेला. डोळस निरीक्षण, नियमित व्यायामाने कमविलेली शरीरयष्टी मर्दानी खेळांमुळे तिला आलेला लवचिकपणा, अफाट परिश्रम, मूळचा गमत्या स्वभाव, हाणामारी, शस्त्रविद्येतील कौशल्य, रोमारोमांत भिनलेला नैसर्गिक ऱ्हिदम, चित्रपटात काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व वडिलांचे आशीर्वाद या शिदोरीवर एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा मूकचित्रपटाच्या जमान्यापासून सुरुवातीला विनोदी नटपुढे फायटर म्हणून चित्रपटात काम करू लागला व म्हणता म्हणता १९३८ मध्ये पाश्र्वगायक खान मस्ताना, मीर साहेबांचे संगीत असलेल्या बहादूर किसानचित्रपटाचे दादा कथालेखक व दिग्दर्शकही झाले.
1930 मध्ये दादाला कॉमेडियन म्हणून 'बेवफा आशिक' हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र 'बेवफा आशिक' या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी दादाला आपल्या 'जनता जिगर' या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला. या चित्रपटानंतर त्यांच्या पाच मुकपटात भगवानदादांनी काम केलं. 'हिम्मते मर्दा' या पहिल्या बोलपटात भगवानदादांनी काम केले. इथुनच भगवानदादांना धडाधड चित्रपट मिळत गेले..
१९४६ ते १९६८ या दरम्यानचा काळ भगवानदादांसाठी जॉकपॉटचा काळ ठरला. भगवानदादा हा खरे तर दिवसभर काबाडकष्ट करून, घामाचे पैसे खर्च करून ग्रांट रोडच्या बकाल वस्तीतील थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या गरीब जनतेचा आणि शाळा-कॉलेजला दांडी मारून मॅटिनी शो पाहयला आलेल्या विद्यार्थ्यांचा आवडता नायक होता.. त्यांच्या  मुद्राभिनयाला, हाणामारी किंवा हास्यप्रसंगाला थिएटरमध्ये टाळ्या, हास्य व शिट्टयांचा जल्लोष असे. मात्र १९५० पर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू व सुशिक्षित सिनेदर्शकात दादांच्या चित्रपटांना स्थान नव्हते.
१९५१ ला रिलीज झालेल्या 'अलबेला’तील  एकाहून एक "सुपरडुपर हिट' गाणी आणि त्यावरील खास "भगवान-डान्स'ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'भोली सुरत दिल के खोटे' हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भगवान दादांचा हा रोंबासांबा डान्स अत्यंत सोपा परंतु आकर्षक नृत्यप्रकार असल्याने खूप लोकप्रिय झाला.. शाम ढले खिडकीतले तुम सीटी बजाना छोड दो' या गीतानं तर "छेडछाडवाल्या' गीतांचा आरंभ केला."ओ बेटाजी, किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम' या गीतात भांड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः भगवानदादांची होती."भोली सूरत दिल के खोटे। नाम बडे और दर्शन छोटे ' आणि "शोला जो भडके । दिल मेरा धडके। दर्द जवानी का सताए बढ बढ के' या गाण्यानं पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. या सिनेमातील अंगाईगीत सर्वांत लोकप्रिय ठरलं. 'धीरे से आजा री अखियन में निंदिया धीरे से आ जा' या लता मंगेशकर यांनी गायलेल्या अंगाईगीतानं आजही सर्वोत्कृष्ट अंगाईगीताचं स्थान कायम ठेवलं आहे.

भारतीय सिनेमात खऱ्या अर्थानं पाश्‍चात्य संगीत आणि डान्स रुजवण्याचे काम भगवानदादांच्या "अलबेला'नं केलं. भगवानदादा यांचं "अलबेला'चं हे यश मात्र "एकमेवाद्वितीय' ठरलं. त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले..."झमेला', "कर भला', "लाबेला', "शोला जो भडके', "रंगीला....” पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही. सिनेमानिर्मितीच्या उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवानदादांनी काळाची पावलं ओळखली आणि आपलं लक्ष पूर्णपणे 'डान्स'वर केंद्रित केलं. पुढं कित्येक हिंदी आणि मराठी सिनेमांत ते नाचू लागले. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा "प्लस पाइंट' होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. "चोरी चोरी', "झनक झनक पायल बाजे' या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या.
लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवानदादा यांनी १९४२ मध्ये "जागृती पिक्‍चर्स' या बॅनरची स्थापना केली; तसेच स्वतः चा चेंबूर इथं "जागृती स्टुडिओ'ही १९४७ मध्ये उभारला.  पुढं गोरेगावमधल्या भगवानदादा यांच्या गोडाऊनला आग लागली आणि त्यात त्यांचे हे सारे स्टंटपट भस्मसात झाले. १९५१ मध्ये अलबेलाप्रदर्शित झाल्यावर बरोबर पंचवीस वर्षांनी रणजीत बुधकरांनी अलबेलाचे हक्क विकत घेतले. काळाप्रमाणे आवड बदलते असे म्हणतात. पण अलबेलाकाळाच्या कसोटीलाही पुरेपूर उतरला. नव्या तरुण पिढीने त्याचे न भूतो न भविष्यतीअसे स्वागत केले अलबेलाने परत रजत जयंती साजरी केली. आज भगवानदादांच्या स्टंटपटांची आठवण इतिहासजमा झाली असली, तरी त्याच्या कारकीर्दीला "चार चॉंद' लावणारा "अलबेला' शाबूत राहिला. भगवानदादांच्या "अलबेला'नं इतिहास घडवला. नृत्य-संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला "पहिला डान्सिंग ऍक्‍टर' -अर्थात्‌ भगवानदादा या सिनेमानं मिळवून दिला.

दादरच्या ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते राहत होते, त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ भगवानदादा यांच्याशिवाय पुरा होत नसे. एकेकाळी एका स्टुडिओचे मालक असलेल्या भगवानदादांनी बंगला, गाडी असं सर्व काही ऐश्‍वर्य उपभोगलं. पुढं काळ बदलला. भगवानदादा "डेली पेड आर्टिस्ट' म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरू लागले. भगवानदादा हे अहंकाराची अजिबात बाधा नसलेले कलाकार होते.
ऐश्‍वर्य आणि गरिबी त्यांनी एकाच मापात मोजली. ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते लहानपणापासून राहत असत, तिथंच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. ०४ फेब्रुवारी २००२ रोजी. जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता, तिथंच ते आयुष्याच्या अखेरीस येऊन विसावले.
मास्टर भगवान म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक गोड स्वप्नच होते. अशा या हरफनमौला, दिलखुलास मास्टर भगवानदादांच्या जन्मशताब्दी निमित्त  विनम्र अभिवादन...!!!

Saturday, 28 July 2012

समाजवादी विचारांचा दीपस्तंभ- मृणाल गोरे.


सर्वसामान्यांच्या समस्यांवर रण उठवून सरकारची झोप उडविणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या, माजी खासदार व राज्याच्या माजी विरोधी पक्षनेत्या..८४ वर्षाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष  वृतीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या...तळपणारी झुंजार वृत्ती, निखळ चरित्र, त्यागमय जीवन आणि गोरगरिबांनाबद्दलची अपार करुणा  असणाऱ्या मृणाल गोरे...

मतदार आणि नेते यांच्या जगण्यात फार फरक नसण्याच्या..आणि राजकारणात साधेपणा ही फक्त मिरविण्याची गोष्ट नव्हती आणि साधे राहणार्याची अवहेलनाही केली जात नव्हती या काळात समाजाचे नेतेपण करणाऱ्या  मृणाल गोरे... महागाई विरोधात अविरतपणे लढणाऱ्या व्यक्तींची नावे कोणालाही विचारली तर मृणाल गोरे या नावापासूनच प्रारंभ होईल.. घरोघरी वापरल्या जाणाऱ्या लाताण्याला शस्त्र बनवून सत्ताधारी वर्ग, पोलीस व अखिल पुरुष वर्गावर लाटण्याची दहशत बसविणाऱ्या मृणाल गोरे...

मृणालताईंचे  वडील एका प्रख्यात शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. दोन भाऊ व एक बहिण डॉक्टर असल्यामुळे मृणालताईंनीही डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. पण एस.एम. जोशी, मधू लिमये, भाऊसाहेब रानडे यांच्या भाषणांनी प्रभावित झालेल्या मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण सुरु असतानाच एक दिवस अचानक शिक्षण सोडून सामाजिक कार्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २०व्या वर्षी  राष्ट्र सेवा दलाच्या कामात स्वतःला झोकून दिले. तिथे त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीला  कलाटणी मिळाली .बंडू गोरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर १९४८ मध्ये मुंबईच्या गोरेगाव उपनगरातील टोपीवाला  बंगल्यात राहायला आल्यावर स्त्रियांचे मंगळागौरी, हळदीकुंकू असे सन करण्याएवजी संतती नियमन प्रसारावर त्यांनी भर दिला. सामाजिक टीका होत असतांनाही त्यांनी सुमारे १५ वर्ष हे प्रसार केंद्र चालविले.

अत्यंत साधी रहाणी आणि समाजकार्य  करताना कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तयारी पत्करून सामाजिक काम सुरु केले. कधी अंगणवाडी सेविकांच्या  तर कधी कचारावेचून जगणाऱ्या उपेक्षितांच्या प्रश्नांकरिता सदैव झगडत राहिल्या. वैचारिक निष्ठा आणि सामान्यांच्या समस्यांवर आवाज उठविण्यात त्या सतत आघाडीवरच राहिल्या. अंतुले मुख्यमंत्री असतांना गाजलेल्या सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी रण माजविले.

मृणाल गोरे या सत्तास्थानी कधी नव्हत्या किंबहुना पंतप्रधान मोरजी  देसाई व पंतप्रधान चरणसिंग या दोघानीही मंत्रीपद स्वीकारण्याची केलेली विनंती त्यांनी अव्हेरली होती.  महिल्यांच्या वाट्याला सत्तास्थाने क्वचितच येतात. ती नाकारली जाणे अशक्यच. अशा अशक्य उदाहरणातील व्यक्ति म्हणजे मृणालताई गोरे... मंत्रीपद नसले तरी लोकप्रतिनिधी म्हणून अगदी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ते नगरसेवक, आमदार,विरोधी पक्षनेते आणि खासदार अशा पदांवरून त्यांनी सातत्याने जनसेवा केलेली असून सर्व पदांवरून त्यांनी केलेले प्रतिनिधित्त्व हे अत्यंत परिणामकारक ठरले होते. महानगरपालिकेत जाण्यापूर्वीच झोपडीवासीयांच्या पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे  संबंध देश त्यांना ‘पाणीवालीबाई’ म्हणून ओळखू लागला होता. म्हणूनच  गोरेगावकर नागरिकांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिले होते. तीन डोंगरी झोपडपट्टीचे  मालवणी मध्ये घडविलेले पुनर्वसन तर “The saga of  Tin Dongri” म्हणून इंग्रजी वर्तमानपत्रांनी खूप नावाजले होते.

लोहियांच्या विचारशालेतील असलेल्या मृणालताई  १९७२ मध्ये इंदिरा लाटेवर मत करीत सहजपणे विधानसभेत निवडून आल्या. विधानसभेत दाखल होताच वडखळ नाका व दर्डा प्रकरण मृणालताईंनी गाजून सोडले. पण विशेष गाजला तो लाटणी मोर्चा तसेच महागाई प्रतिकार महिला सभेचे अन्य लढे. त्यामध्ये अहिल्याबाई रांगणेकर, कमलाताई  देसाई, तर रेड्डी अशा महिला नेत्यांनी त्यांना जबरदस्त साथ दिली.  १९७५ च्या आणीबाणीच्या काळात भूमिगत राहूनही त्यांनी  केलेले राजकीय कार्य असो वा महागाईच्या प्रश्नावर निघालेला त्यांचा प्रसिद्ध लाटणे मोर्चा असो मृणाल गोरे हे नाव घरोघरी पोहचले होते  आणि त्यांची स्वतंत्र अशी एक विधायक दहशत होती.  विधायक यासाठी की त्यांच्या कोणत्याही राजकारणात आक्रस्ताळेपणा नव्हता. पुढे शासनाने त्यांना पकडले आणि काही काळ महारोगी, वेड्या स्त्री कैद्यांच्या सहवासात ठेवले तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट आणीबाणीनंतर प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेल्या. मृणाल गोरे तुरुंग-मतपेटी व फावडा या डॉ. लोहियांच्या त्रिसूत्रीच्या साक्षात प्रतीक बनल्या होत्या .

मृणालताईंचे  वैशिष्ट्य असे की मंत्र्याला निरुत्तर करणारी आकडेवारी त्या सहजपणे मंत्र्यांच्या तोंडावर फेकीत असतं आणि लाटण्यापुढे हतबुद्ध होत असतं. त्या जशा विधानसभेतील वादविवादात पटाईत  होत्या त्याप्रमाणेच जनतेची भव्य ताकद उभी करून विधानसभेवर दबाव आणू शकत. त्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक शस्त्र वापरली, त्यात लाटणे, थाळीवादन , घेराव  तसेच न्यायालयातील याचिका हेही शस्त्र होते. गोंधळ घालून केवळ हवा निर्माण करावी आणि त्या हवेने निर्माण होणारी लोकप्रियतेची लाट कार्यपूर्ती मानून आनंद साजरा करावा हे गुण त्यांच्यात नव्हते.

“केवल हंगामा खडा करना मेरा मक्सद नाही,
मेरी कोशिश है की, ऐ सुरात बदलनी चाहिये...”
 या दुष्यंतकुमार  यांच्या कवितेप्रमाणेच मृणालताईंचे राजकारण होते. या राजकारणास समाजकारणाची समर्थ जोड होती. नागरी निवारा परिषद हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या कामाच्या स्वरूपातून प. बां. सामंत आदींच्या सहकार्याने त्यांनी मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. इंदिरागांधीनी आणलेल्या पण प्रत्यक्षात बिल्डर आणि सरकार यांना धार्जिणा अस कमाल जमीन धारणा कायदा योग्य प्रकारे राबविल्यास त्यातून किती भरीव काम करता येऊ शकते, याचे दृश्य उदाहरण निवारा परिषदेच्या निमित्ताने उभे राहिले. हा कायदा कालबाह्य ठरून हटविण्याच्या हालचाली सुरु झाल्या तेव्हा मृणालताईना कायदा वाईट नाही , त्याची निवडक अंबलबजावणी अयोग्य आहे, हे सांगण्याचा अधिकार या कामामुळे मिळाला.  
नागरी निवारा परिषद स्थापून अगदी थोड्या अवधीत सामान्य निराश्रित  जनतेकडून त्यांनी कोट्यावधी रुपये उभे केले आणि साडेतीनशे गृहसंस्थांची नोंदणी केली. इतकेच नव्हे तर फार मोठी जमीन शाश्नाकडून मिळवून ६ हजार घरे दिंडोशी येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी उभी केली. त्याशिवाय आपले पती केशव गोरे यांच्या स्मरणार्थ गोरेगाव येथे ‘केशव गोरे ट्रस्ट’ उभा केला . त्याबरोबरच स्त्रियांसाठी ‘स्वाधार ‘ ही संस्था स्थापन करून आपल्या विधायक कर्तुत्वाची ग्वाही समाजाला त्यांनी दिली. विधानसभा असो वां अन्य काही, एखादी प्रक्रिया बंद पाडून दाखवणे म्हणजे नेतृत्व सिद्ध करून दाखवणे, इतका संकुचीत  नेतृत्वावाद मृणालताईंमध्ये कधीच नव्हता.

मृणालताई जितक्या कर्तृत्ववान होत्या तितक्याच त्या सालस ,मनाने निष्कपट व आचाराने शालीन आपल्या कर्तृत्वाची चुकूनही प्रौढी न मिरविणाऱ्या निगर्वी व्यक्ति  होत्या. अनेक अडचणी, संकटे, मतभेद, फुटाफुटी, व्याधी यांना तोंड देत देत त्यांनी समाजवादाची लढाई अखंड चालूच ठेवली. जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता . मृणाल गोरे अखेरपर्यंत सध्या होत्या आणि त्यांचे साधेपण लोभस होते. याचे कारण त्यांचा  साधेपणा आतून आलेला होता  करता येईल आणि त्याची नाळ खऱ्या अर्थाने सामान्य माणसाशी जोडलेली होती.

वैयक्तिक पातळीवर, एरवी सामान्य स्त्रीला मोडून पाडणारे पतीवियोगाचे दुःख मृणालताईंनी सहज बाजूला केले आणि समाजकार्यात स्वतःला पूर्ण झोकून दिले.  त्या आपल्या मताशी ठाम होत्या पण कठोर नव्हत्या. आपल्या राजकीय भूमिकेशी नाही म्हणून समोरच्याशी संवादच साधला जाऊ नये, असं त्यांचा दृष्टीकोन कधीच नव्हता. त्याचमुळे भिन्न राजकीय विचारधारेतील नेत्यांशी  त्यांचे संबंध सौहार्दाचेच असायचे. सामान्यांचे जगणे किमान सुखकर करण्यासाठी काय करत येईल, याचा ध्यास त्यांना कायम होता आणि त्यांचे सारे राजकारण आणि समाजकारण त्या भोवतीच फिरत राहिले. आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या मृणाल गोरे  वयाच्या ८४व्या वर्षी १७ जुलै २०१२ ला पडद्याआड गेल्या.

मृणालपण  अबाधित राखीत रणनेतृत्त्व करणाऱ्या....सार्वजनिक जीवनातील दीपस्तंभ असलेल्या मृणाल गोरे या समाजवादी रणरागिणीस विनम्र श्रद्धांजली...!!!

संदर्भ:- लोकसत्ता...

Tuesday, 24 July 2012

सिंहासारखा शूरवीर,निष्ठावंत मराठी सरदार- तानाजी मालुसरे



तानाजी मालुसरे हे मराठ्यांचे शूर योद्धे...कोंढाणातील लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढाणा(सिंहगड) स्वराज्यात परत आणणारे...आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर...!

सातारा जिल्ह्यातील, जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच संगमेश्वर काबीज केल्यावर सुर्व्यांनी अचानकपणे रात्री केलेल्या हल्लाला अतिशय शौर्याने मोडून काढत मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले होते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच ते रायगड जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ) गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.

आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले. कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता, या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असतानांही, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता.

कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी) राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले. दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली. लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.

तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला, मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून निकराची लढाई करत हा किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता.
  
दुसऱ्या दिवशी राजे गडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले. त्यानंतर त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या तानाजींच्या गावी पाठवले.  ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. सिहंगडावर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी उभारला आहे. ते ज्या ठिकाणी राहत असत, त्या रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

आपल्या धन्याच्या वचनाला जागून कोंढाणा उर्फ सिंहगड हा अभेद्य मानलेला किल्ला उदयभान राठोड सारख्या किल्लेदारापासून मोठ्या मर्दुमकीनें एका रात्रीत हल्ला करून ताब्यात घेणारे तानाजी खरोखरच सिंह होते... 
अशा या सिंहाला आणि त्यांच्या बंधू सूर्याजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...!!!

-संग्रहीत.

Friday, 20 July 2012

अरण्य फुलावीणारा अवलीया- जादव पायेंग





जंगल म्हणजे परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं...अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जीवंत राहण्याचे तंत्रजीवन सुखी करण्यासाठीचे यंत्रआणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. आता मात्र हे उध्वस्त होत आहेत कुठे मानवाच्या स्वार्थापायी तर कुठे निर्सगाच्या कोपामुळे...पण यातही काही लोक निसर्गाशी एकनिष्ठ असतात, त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यचं वानप्रस्थ करून टाकतात,  त्याचं एक उदाहरण म्हणजे जादव पायेंग...!

हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करनारा... आपल्या अवघ्या आयुष्या दररोजच वसुंधरा दिवस आणि पर्यावरण दिवस साजरा करणारा..रेताडओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत 'मुलई कथोनी' नावाचं एक संपुर्ण अरण्य फुलावीणारा... जंगलाकडून सगळं घेत असतांना आपणही त्याच काहीतरी देणं लागतो हे जाणणारा...तुमच्या-आमच्यासारखाच  सामान्य पण कार्याने असामान्य असणारा जादव पायेंग...!!
आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या कोकिलामुख गावात जादव पायेंग याने ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार केलंय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघतीन गेंडेशंभरेक हरणंशेकडो माकडंससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो.

१९७९ साली ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे तर बी रूजायला माती देखील ठेवली नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. शेकडो प्राणी आणि होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. हे सगळ पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं कीया बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं.

१९८० मध्ये अरुना चापोरी भागात वन विभागाद्वारे २०० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले हे कार्य पूर्ण झाल्यावर सर्व कामगार निघून गेले, पण जादव तिथेच थांबला त्याने हे कार्य इथेच न थांबवता पुढे न्यायचं आणि पुन्हा जंगल निर्मार करायचं ठरवलं. त्याकरिता तो रोपटी मागायला वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला पण सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलंअसा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. त्याला घरचे आणि गावचे लोक 'मुलईम्हणायचे. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनीम्हणजे मुलईचं जंगल. मुलईच्या अथक परिश्रमाने बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे.

आपल्याला एका मुंगीचा चावा सहन होत नाही, इथे मात्र मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ताकाही होडीत बसुन आणि नंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवासात आपल्या जवळ बाळगत, त्यांचे अगणित चावे सहन करत त्या मुंग्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोलअर्जुनइजरगुलमोहरकोरोईमोज आणि हिमोलूची रोपटी जमवत फिरणा-या..लावलेली रोपटी जगावीतम्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या, मुलईला सरकार,गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारली तरी तो थांबला नाही.

आज या जंगलाशी मुलईचं ईतकं दृढ नातं आहे की ईथले वाघएकशिंगी गेंडेही त्याला ओळखतातआजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा मग हत्तींवर गोळ्या चालवाअसं जाहिर आव्हान करणारा, एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे करणारा मुलई आहे. अधे-मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आलीकी झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच राहणारा मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. बायकोदोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिचं दूध विकून चालवतो.

२००८ नंतर जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. त्यानंतर वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांना  मुलईच्या मदतीने अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनीहे 'हॅपनींग डेस्टीनेशनबनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं.

बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टसलोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनीच्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतलीतर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही  अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतोअसा त्याला विश्वास आहे.

५३ वर्षीय पायेंगला त्याच्या या अथक प्रयत्नानंतर पर्यावरण आणि सरकार कडून वाह्वाही मिळाली. पर्यावरण संवर्धनाच्या ३२ वर्षाच्या संघर्षानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयने 'फॉरेस्ट मैन ऑफ असम' ही उपाधी देऊन सन्मानित केले. अगदी भावूक होऊन मुलई म्हणतो की, ‘मी सहा वर्षाचा असताना नष्ट होत असलेले कुरूवा पक्षी या भागात पहिले होते पण मागच्या ४५ वर्षात ते इथे दिसलेच नाहीत. आज मात्र तेच पक्षी माझ्या या जंगलात वास्तव्याला येतात या पेक्षा दुसरं आणखीन काय हवं’...

आपल्या कार्याने आदर्श घालून देणारा...पुरस्कार, प्रसिद्धी पासून लांब असून आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलेला जादव पायेंग आपल्या सारख्या सामान्य माणसाला पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश देऊन जातोय...