एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताची तर्जनी
हवेत उंचावत, तर कधी दोन्ही हात, बाहू पसरावेत तसे विस्तारलेले....लाखो सैनिकांचे
आधारस्तंभ, महाराष्ट्राच्या राजकरणात सतत निर्णायक आणि रोख ठोक भूमिका घेणारे
तळपते राजकीय नेते....अफाट प्रतिभा असलेला
व्यंगचित्रकार.... असमान्य असलेला, पण सदैव सामान्य राहिलेला माणूस
म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...... मराठी
माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या
कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट....!!
सत्ता हातात असूनसुद्धा लोकप्रियता मिळविणे
सोप्पे नसते. कारण एकाला खुश करणे म्हणजे इतर अनेकांना दुखावणे असे विचित्र समीकरण
असते. आपली माणसेच पुढे आणायची झाली तर इतर गुणवान लोक दुखावले जाऊन दुरावतात.
त्यांना न्याय द्यायचा तर आपली वाटणारी माणसे तोडली जातात. मात्र गेली पाच दशके या
माणसाने संपूर्ण देशावर अक्षरशः गरुड केले. हा माणूस जितका सामान्यांना कळला तितका
तर बुद्धीवाद्यांनाही कधी कळला नसेल....एखाच्या लोकनेत्याने असे अफाट प्रेम मिळवणे
म्हणजेही फार मोठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रात आणि बाहेरच्याही असंख्यांना
बाबासाहेबांची अफाट लोकप्रियता म्हणजे एक न उलगडणारे कोडेच वाटते.
आपल्या
लेखनातून,
वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळणाऱ्या
प्रबोधनकार उर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा
जन्म झाला. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर
कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही
महत्त्वपूर्ण होते. घरातील प्रबोधनाची परंपरा पुरोगामी विचारांचा व आक्रमक
वृत्तीचा आणि अस्सल मराठी बाण्याचा वडील प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे
उतरला.
सर्वप्रथम
एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य
करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार
म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण
यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच
बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी
चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत. पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे
साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी
ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’
हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच
सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. महाराष्ट्राच्या
उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची
सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता,
पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या
प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली.
प्रत्येक
मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा यासाठी बाळासाहेबांनी १९
जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची
समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी
माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, उद्योग
आहेत,पैसा आहे पण तरीही मराठी माणूस
गरीब-बेरोजगार आहे. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली.
महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत)
अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून
महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा
पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर
संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास
सुरुवात झाली.
महाराष्ट्राविषयीचा
प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही
बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये
घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत
मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्या राष्ट्रवादी
मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी
शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. सुरवातीला
शिवसेना आणि हिंदुत्त्वाची बाळासाहेबांची भूमिका या दोन्ही गोष्टी व्यवहारात उतरणे
अशक्य असेच वाटले होते. पण या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना
प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.
जातीपातींचे
राजकारण, सहकारी संस्था-साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे
यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी
ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक
संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे - अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी
अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै.
प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन
भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे,
दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते
बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही
सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची
पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांचे
सर्वात मोठे योगदान म्हणजे अत्यंत गरीब
कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी
त्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठाच दिली नाही तर राज्याच्या सर्वोच्च
सत्तेच्या खुर्चीत नेऊन बसवले.
बाळासाहेबांचा केंद्रबिंदू नेहमी
मुंबई आणि महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस
होता. कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत चारीत्र्यापेक्षाही संघटात्मक गुणवत्तेला
त्यांनी विशेष महत्व दिले आणि समाजकारणातूनच शिवसेनेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.
बाळासाहेब केवळ व्यंगचित्रकार नव्हते किंवा
केवळ राजकीय नेतेसुद्धा नव्हते. ते एक सजग आणि एक चोखंदळ वाचक होते, रसिक श्रोते
देण्याची दिलदारी त्यांच्यात होती. असे
विविध पैलू असणारा, रसिकत्वाची वरची यत्ता असणारा राजकीय नेता आता होणे
कठीणचं आहे. अनेकदा एखादे कलावंत व्यक्ति राजकारणाकडे वळली, त्यात यशस्वी झाली की
ती आपले कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या फळताळात ढकलून मोकळी होते.
परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातला व्यंगचित्रकार कधीच अव्हेरला नाही. उलट मनातील
व्यंगचित्रांच्या कल्पनांना त्यांनी शाब्दिक स्वरूप देत आपल्या भाषणाची तिरकस शैली
विकसित केली. बाळासाहेब खरे तर हाडाचे रसिक आणि
कलाकारही. पण त्यांच्यामध्ये अन्यायाची आणि मराठी माणसाबद्दल लोभ ही दोन्ही प्रचंड
प्रमाणात होती. लेखणी आणि कुंचला प्रभावीपणे चालवण्याचे सामर्थ्य होते.
वक्तृत्वाची पकड तर सर्वानी पहिलीच आहे. अत्यंत फटकळ जीभ असूनही माणसे जोडण्याची
कला त्यांना अवगत होती.
प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यात
ज्वलजहाल वाणीचे साम्य होते. दोघेही स्पष्टवक्ते आणि बंडखोर वृत्तीचे.
प्रबोधनकारांच्या बौद्धिक पातळीवर किंवा त्यांच्यासारखे ते चिकित्सक नव्हते. पण
लोकांच्या मनात काय चाललं आहे , याची नेमकी नस बाळासाहेबांना कळली होती. त्याच्या
भाषणात व्यंगचित्र नव्हते , तर पंचलाईन होती. ती सामान्यांना भिडायाची. त्याचे
उत्तम उदाहरण म्हणजे बाबरी मशीद पडली तेव्हा भाजप नेत्यांनी काखा वर केल्या. देशात
हिंदुत्त्ववाद्यांमध्ये एकमेव बाळासाहेब असे होते जे काम जर माझ्या शिवसैनिकांनी
केले असेल तर मला त्याचा गर्व आहे म्हणत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
राहिले.
एवढी मोठी संघटना बांधणे, सत्तेचा मोह
बाजूला ठेऊन ती चालवणे, मतांचा राजकारणात महाग पडली तरी सडेतोड भाषा वापरणे आणि
धडाकून निर्णय घेऊन तो अमलात आणणे असे गुण अलीकडच्याच नेतृत्वात सापडणे अवघडच आहे.
सर्वस्व पणाला लावण्याचा जुगार खेळण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. सत्ता नव्हती तेव्हाही आणि सत्ता आली आणि
गेली तरीही ज्यांच्या सामाजिक, राजकीय
भूमिकेत तसूभरही फरक पडणार नाही, असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व देशाच्या राजकारणात
आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे . बेरीज वजाबाकी , फायद्या-तोट्याचा विचार न करता बेधडक राजकारण करणारा हा उमदा आणि दिलदार नेता , एकदा शब्द दिला की तो
पाळायचाचं , त्यासाठी वाटेल तेवढी टीका झाली तरी चालेल, पण माघारचा घ्यायची नाही हा त्यांचा रघुकुल बाणा.
त्यासाठीच्या राजकीय परिणामांची तमा न बाळगता, आपल्या मार्गाने जाणारा हा मनस्वी
नेता.
अशा या हिंदुहृदयसम्राटाला त्रिवार वंदन...!!!
आले किती,गेले किती, संपले भरारा,
तुझ्या परी नामाचा रे, अजुनी दरारा.....
अजुनी दरारा….
जय महाराष्ट्र !!