Saturday, 28 July 2012

समाजवादी विचारांचा दीपस्तंभ- मृणाल गोरे.


सर्वसामान्यांच्या समस्यांवर रण उठवून सरकारची झोप उडविणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या, माजी खासदार व राज्याच्या माजी विरोधी पक्षनेत्या..८४ वर्षाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष  वृतीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या...तळपणारी झुंजार वृत्ती, निखळ चरित्र, त्यागमय जीवन आणि गोरगरिबांनाबद्दलची अपार करुणा  असणाऱ्या मृणाल गोरे...

मतदार आणि नेते यांच्या जगण्यात फार फरक नसण्याच्या..आणि राजकारणात साधेपणा ही फक्त मिरविण्याची गोष्ट नव्हती आणि साधे राहणार्याची अवहेलनाही केली जात नव्हती या काळात समाजाचे नेतेपण करणाऱ्या  मृणाल गोरे... महागाई विरोधात अविरतपणे लढणाऱ्या व्यक्तींची नावे कोणालाही विचारली तर मृणाल गोरे या नावापासूनच प्रारंभ होईल.. घरोघरी वापरल्या जाणाऱ्या लाताण्याला शस्त्र बनवून सत्ताधारी वर्ग, पोलीस व अखिल पुरुष वर्गावर लाटण्याची दहशत बसविणाऱ्या मृणाल गोरे...

मृणालताईंचे  वडील एका प्रख्यात शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. दोन भाऊ व एक बहिण डॉक्टर असल्यामुळे मृणालताईंनीही डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. पण एस.एम. जोशी, मधू लिमये, भाऊसाहेब रानडे यांच्या भाषणांनी प्रभावित झालेल्या मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण सुरु असतानाच एक दिवस अचानक शिक्षण सोडून सामाजिक कार्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २०व्या वर्षी  राष्ट्र सेवा दलाच्या कामात स्वतःला झोकून दिले. तिथे त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीला  कलाटणी मिळाली .बंडू गोरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर १९४८ मध्ये मुंबईच्या गोरेगाव उपनगरातील टोपीवाला  बंगल्यात राहायला आल्यावर स्त्रियांचे मंगळागौरी, हळदीकुंकू असे सन करण्याएवजी संतती नियमन प्रसारावर त्यांनी भर दिला. सामाजिक टीका होत असतांनाही त्यांनी सुमारे १५ वर्ष हे प्रसार केंद्र चालविले.

अत्यंत साधी रहाणी आणि समाजकार्य  करताना कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तयारी पत्करून सामाजिक काम सुरु केले. कधी अंगणवाडी सेविकांच्या  तर कधी कचारावेचून जगणाऱ्या उपेक्षितांच्या प्रश्नांकरिता सदैव झगडत राहिल्या. वैचारिक निष्ठा आणि सामान्यांच्या समस्यांवर आवाज उठविण्यात त्या सतत आघाडीवरच राहिल्या. अंतुले मुख्यमंत्री असतांना गाजलेल्या सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी रण माजविले.

मृणाल गोरे या सत्तास्थानी कधी नव्हत्या किंबहुना पंतप्रधान मोरजी  देसाई व पंतप्रधान चरणसिंग या दोघानीही मंत्रीपद स्वीकारण्याची केलेली विनंती त्यांनी अव्हेरली होती.  महिल्यांच्या वाट्याला सत्तास्थाने क्वचितच येतात. ती नाकारली जाणे अशक्यच. अशा अशक्य उदाहरणातील व्यक्ति म्हणजे मृणालताई गोरे... मंत्रीपद नसले तरी लोकप्रतिनिधी म्हणून अगदी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ते नगरसेवक, आमदार,विरोधी पक्षनेते आणि खासदार अशा पदांवरून त्यांनी सातत्याने जनसेवा केलेली असून सर्व पदांवरून त्यांनी केलेले प्रतिनिधित्त्व हे अत्यंत परिणामकारक ठरले होते. महानगरपालिकेत जाण्यापूर्वीच झोपडीवासीयांच्या पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे  संबंध देश त्यांना ‘पाणीवालीबाई’ म्हणून ओळखू लागला होता. म्हणूनच  गोरेगावकर नागरिकांनी त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिले होते. तीन डोंगरी झोपडपट्टीचे  मालवणी मध्ये घडविलेले पुनर्वसन तर “The saga of  Tin Dongri” म्हणून इंग्रजी वर्तमानपत्रांनी खूप नावाजले होते.

लोहियांच्या विचारशालेतील असलेल्या मृणालताई  १९७२ मध्ये इंदिरा लाटेवर मत करीत सहजपणे विधानसभेत निवडून आल्या. विधानसभेत दाखल होताच वडखळ नाका व दर्डा प्रकरण मृणालताईंनी गाजून सोडले. पण विशेष गाजला तो लाटणी मोर्चा तसेच महागाई प्रतिकार महिला सभेचे अन्य लढे. त्यामध्ये अहिल्याबाई रांगणेकर, कमलाताई  देसाई, तर रेड्डी अशा महिला नेत्यांनी त्यांना जबरदस्त साथ दिली.  १९७५ च्या आणीबाणीच्या काळात भूमिगत राहूनही त्यांनी  केलेले राजकीय कार्य असो वा महागाईच्या प्रश्नावर निघालेला त्यांचा प्रसिद्ध लाटणे मोर्चा असो मृणाल गोरे हे नाव घरोघरी पोहचले होते  आणि त्यांची स्वतंत्र अशी एक विधायक दहशत होती.  विधायक यासाठी की त्यांच्या कोणत्याही राजकारणात आक्रस्ताळेपणा नव्हता. पुढे शासनाने त्यांना पकडले आणि काही काळ महारोगी, वेड्या स्त्री कैद्यांच्या सहवासात ठेवले तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट आणीबाणीनंतर प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेल्या. मृणाल गोरे तुरुंग-मतपेटी व फावडा या डॉ. लोहियांच्या त्रिसूत्रीच्या साक्षात प्रतीक बनल्या होत्या .

मृणालताईंचे  वैशिष्ट्य असे की मंत्र्याला निरुत्तर करणारी आकडेवारी त्या सहजपणे मंत्र्यांच्या तोंडावर फेकीत असतं आणि लाटण्यापुढे हतबुद्ध होत असतं. त्या जशा विधानसभेतील वादविवादात पटाईत  होत्या त्याप्रमाणेच जनतेची भव्य ताकद उभी करून विधानसभेवर दबाव आणू शकत. त्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक शस्त्र वापरली, त्यात लाटणे, थाळीवादन , घेराव  तसेच न्यायालयातील याचिका हेही शस्त्र होते. गोंधळ घालून केवळ हवा निर्माण करावी आणि त्या हवेने निर्माण होणारी लोकप्रियतेची लाट कार्यपूर्ती मानून आनंद साजरा करावा हे गुण त्यांच्यात नव्हते.

“केवल हंगामा खडा करना मेरा मक्सद नाही,
मेरी कोशिश है की, ऐ सुरात बदलनी चाहिये...”
 या दुष्यंतकुमार  यांच्या कवितेप्रमाणेच मृणालताईंचे राजकारण होते. या राजकारणास समाजकारणाची समर्थ जोड होती. नागरी निवारा परिषद हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या कामाच्या स्वरूपातून प. बां. सामंत आदींच्या सहकार्याने त्यांनी मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. इंदिरागांधीनी आणलेल्या पण प्रत्यक्षात बिल्डर आणि सरकार यांना धार्जिणा अस कमाल जमीन धारणा कायदा योग्य प्रकारे राबविल्यास त्यातून किती भरीव काम करता येऊ शकते, याचे दृश्य उदाहरण निवारा परिषदेच्या निमित्ताने उभे राहिले. हा कायदा कालबाह्य ठरून हटविण्याच्या हालचाली सुरु झाल्या तेव्हा मृणालताईना कायदा वाईट नाही , त्याची निवडक अंबलबजावणी अयोग्य आहे, हे सांगण्याचा अधिकार या कामामुळे मिळाला.  
नागरी निवारा परिषद स्थापून अगदी थोड्या अवधीत सामान्य निराश्रित  जनतेकडून त्यांनी कोट्यावधी रुपये उभे केले आणि साडेतीनशे गृहसंस्थांची नोंदणी केली. इतकेच नव्हे तर फार मोठी जमीन शाश्नाकडून मिळवून ६ हजार घरे दिंडोशी येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी उभी केली. त्याशिवाय आपले पती केशव गोरे यांच्या स्मरणार्थ गोरेगाव येथे ‘केशव गोरे ट्रस्ट’ उभा केला . त्याबरोबरच स्त्रियांसाठी ‘स्वाधार ‘ ही संस्था स्थापन करून आपल्या विधायक कर्तुत्वाची ग्वाही समाजाला त्यांनी दिली. विधानसभा असो वां अन्य काही, एखादी प्रक्रिया बंद पाडून दाखवणे म्हणजे नेतृत्व सिद्ध करून दाखवणे, इतका संकुचीत  नेतृत्वावाद मृणालताईंमध्ये कधीच नव्हता.

मृणालताई जितक्या कर्तृत्ववान होत्या तितक्याच त्या सालस ,मनाने निष्कपट व आचाराने शालीन आपल्या कर्तृत्वाची चुकूनही प्रौढी न मिरविणाऱ्या निगर्वी व्यक्ति  होत्या. अनेक अडचणी, संकटे, मतभेद, फुटाफुटी, व्याधी यांना तोंड देत देत त्यांनी समाजवादाची लढाई अखंड चालूच ठेवली. जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता . मृणाल गोरे अखेरपर्यंत सध्या होत्या आणि त्यांचे साधेपण लोभस होते. याचे कारण त्यांचा  साधेपणा आतून आलेला होता  करता येईल आणि त्याची नाळ खऱ्या अर्थाने सामान्य माणसाशी जोडलेली होती.

वैयक्तिक पातळीवर, एरवी सामान्य स्त्रीला मोडून पाडणारे पतीवियोगाचे दुःख मृणालताईंनी सहज बाजूला केले आणि समाजकार्यात स्वतःला पूर्ण झोकून दिले.  त्या आपल्या मताशी ठाम होत्या पण कठोर नव्हत्या. आपल्या राजकीय भूमिकेशी नाही म्हणून समोरच्याशी संवादच साधला जाऊ नये, असं त्यांचा दृष्टीकोन कधीच नव्हता. त्याचमुळे भिन्न राजकीय विचारधारेतील नेत्यांशी  त्यांचे संबंध सौहार्दाचेच असायचे. सामान्यांचे जगणे किमान सुखकर करण्यासाठी काय करत येईल, याचा ध्यास त्यांना कायम होता आणि त्यांचे सारे राजकारण आणि समाजकारण त्या भोवतीच फिरत राहिले. आयुष्यातील प्रत्येक दिवस स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने केवळ समाजासाठी वेचणाऱ्या मृणाल गोरे  वयाच्या ८४व्या वर्षी १७ जुलै २०१२ ला पडद्याआड गेल्या.

मृणालपण  अबाधित राखीत रणनेतृत्त्व करणाऱ्या....सार्वजनिक जीवनातील दीपस्तंभ असलेल्या मृणाल गोरे या समाजवादी रणरागिणीस विनम्र श्रद्धांजली...!!!

संदर्भ:- लोकसत्ता...

Tuesday, 24 July 2012

सिंहासारखा शूरवीर,निष्ठावंत मराठी सरदार- तानाजी मालुसरे



तानाजी मालुसरे हे मराठ्यांचे शूर योद्धे...कोंढाणातील लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढाणा(सिंहगड) स्वराज्यात परत आणणारे...आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर...!

सातारा जिल्ह्यातील, जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच संगमेश्वर काबीज केल्यावर सुर्व्यांनी अचानकपणे रात्री केलेल्या हल्लाला अतिशय शौर्याने मोडून काढत मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले होते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच ते रायगड जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ) गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.

आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले. कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता, या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असतानांही, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता.

कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी) राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले. दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली. लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.

तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला, मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून निकराची लढाई करत हा किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता.
  
दुसऱ्या दिवशी राजे गडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले. त्यानंतर त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या तानाजींच्या गावी पाठवले.  ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. सिहंगडावर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी उभारला आहे. ते ज्या ठिकाणी राहत असत, त्या रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

आपल्या धन्याच्या वचनाला जागून कोंढाणा उर्फ सिंहगड हा अभेद्य मानलेला किल्ला उदयभान राठोड सारख्या किल्लेदारापासून मोठ्या मर्दुमकीनें एका रात्रीत हल्ला करून ताब्यात घेणारे तानाजी खरोखरच सिंह होते... 
अशा या सिंहाला आणि त्यांच्या बंधू सूर्याजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...!!!

-संग्रहीत.

Friday, 20 July 2012

अरण्य फुलावीणारा अवलीया- जादव पायेंग





जंगल म्हणजे परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं...अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जीवंत राहण्याचे तंत्रजीवन सुखी करण्यासाठीचे यंत्रआणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. आता मात्र हे उध्वस्त होत आहेत कुठे मानवाच्या स्वार्थापायी तर कुठे निर्सगाच्या कोपामुळे...पण यातही काही लोक निसर्गाशी एकनिष्ठ असतात, त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यचं वानप्रस्थ करून टाकतात,  त्याचं एक उदाहरण म्हणजे जादव पायेंग...!

हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करनारा... आपल्या अवघ्या आयुष्या दररोजच वसुंधरा दिवस आणि पर्यावरण दिवस साजरा करणारा..रेताडओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत 'मुलई कथोनी' नावाचं एक संपुर्ण अरण्य फुलावीणारा... जंगलाकडून सगळं घेत असतांना आपणही त्याच काहीतरी देणं लागतो हे जाणणारा...तुमच्या-आमच्यासारखाच  सामान्य पण कार्याने असामान्य असणारा जादव पायेंग...!!
आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या कोकिलामुख गावात जादव पायेंग याने ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार केलंय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघतीन गेंडेशंभरेक हरणंशेकडो माकडंससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो.

१९७९ साली ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे तर बी रूजायला माती देखील ठेवली नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. शेकडो प्राणी आणि होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. हे सगळ पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं कीया बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं.

१९८० मध्ये अरुना चापोरी भागात वन विभागाद्वारे २०० हेक्टर जमिनीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले हे कार्य पूर्ण झाल्यावर सर्व कामगार निघून गेले, पण जादव तिथेच थांबला त्याने हे कार्य इथेच न थांबवता पुढे न्यायचं आणि पुन्हा जंगल निर्मार करायचं ठरवलं. त्याकरिता तो रोपटी मागायला वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला पण सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलंअसा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. त्याला घरचे आणि गावचे लोक 'मुलईम्हणायचे. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनीम्हणजे मुलईचं जंगल. मुलईच्या अथक परिश्रमाने बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे.

आपल्याला एका मुंगीचा चावा सहन होत नाही, इथे मात्र मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ताकाही होडीत बसुन आणि नंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवासात आपल्या जवळ बाळगत, त्यांचे अगणित चावे सहन करत त्या मुंग्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोलअर्जुनइजरगुलमोहरकोरोईमोज आणि हिमोलूची रोपटी जमवत फिरणा-या..लावलेली रोपटी जगावीतम्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या, मुलईला सरकार,गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारली तरी तो थांबला नाही.

आज या जंगलाशी मुलईचं ईतकं दृढ नातं आहे की ईथले वाघएकशिंगी गेंडेही त्याला ओळखतातआजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा मग हत्तींवर गोळ्या चालवाअसं जाहिर आव्हान करणारा, एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे करणारा मुलई आहे. अधे-मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आलीकी झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच राहणारा मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. बायकोदोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिचं दूध विकून चालवतो.

२००८ नंतर जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. त्यानंतर वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांना  मुलईच्या मदतीने अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनीहे 'हॅपनींग डेस्टीनेशनबनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं.

बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टसलोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनीच्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतलीतर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही  अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतोअसा त्याला विश्वास आहे.

५३ वर्षीय पायेंगला त्याच्या या अथक प्रयत्नानंतर पर्यावरण आणि सरकार कडून वाह्वाही मिळाली. पर्यावरण संवर्धनाच्या ३२ वर्षाच्या संघर्षानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयने 'फॉरेस्ट मैन ऑफ असम' ही उपाधी देऊन सन्मानित केले. अगदी भावूक होऊन मुलई म्हणतो की, ‘मी सहा वर्षाचा असताना नष्ट होत असलेले कुरूवा पक्षी या भागात पहिले होते पण मागच्या ४५ वर्षात ते इथे दिसलेच नाहीत. आज मात्र तेच पक्षी माझ्या या जंगलात वास्तव्याला येतात या पेक्षा दुसरं आणखीन काय हवं’...

आपल्या कार्याने आदर्श घालून देणारा...पुरस्कार, प्रसिद्धी पासून लांब असून आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलेला जादव पायेंग आपल्या सारख्या सामान्य माणसाला पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश देऊन जातोय...

Thursday, 12 July 2012

साखर उद्योगाचे चित्र बदलविणारे- बी. बी. ठोंबरे

बी. बी. ठोंबरे हे नाव आपल्यासाठी काहीसे नवीन पण, मराठवाड्यातील लोकांना आणि साखर उद्योगातील संबंधित असणा-या कोणालाही परिचयाचे.... आपले मागासले पण घालवून लोकांची मानसिकता बदलवत, साखर उद्योगजगाला एक नवी दिशा देणारे बी.बी. ठोंबरे...!!
जेथे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत, तिथे स्वतंत्र असा खासगी साखर कारखाना उभारून स्वतःचा ठसा उमटविणारे एका सामान्य माणूस...जागतिकीकरण म्हणजे नॉलेज बेस इकॉनॉमी , बौद्धिक क्षमतेतून संपतीची निमिर्ती याचे मूतीर्मंत उदाहरण म्हणजे बी. बी. ठोंबरे...!!!

विविध सहकारी साखर कारखान्यात अधिकारी , कार्यकारी संचालक म्हणून नोकरी करणा-या ठोंबरे यांनी पंधरा  वर्षांपूर्वी मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रांजणीच्या अतिशय दुष्काळी ग्रामीण भागातील माळरानावर गावातलेच आवश्यक तेवढेच कामगार घेऊन पहिला खासगी साखर कारखाना सुरू केला. त्यांच्या या निर्णयातूनच शेतक-यांच्या आत्मविश्वासाची पहाट झाली. पण त्यांना हा खासगी करणं आहे हे समजून सांगणे कठीण होते. गावकऱ्यांच्या काही मागण्यांना तोंड देत ठोंबरे यांनी या कारखान्यात विविध प्रयोग सुरू केले. त्यांचा पहिला प्रयोग म्हणजे कारखान्यातील वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर करून पाणी आणि लाखो रुपये वाचविण्याचा. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांच्या सहली येऊ लागल्या. त्यानंतर सर्वांप्रमाणे त्यांनी सह-विद्युत प्रकल्प सुरू केला. त्या प्रकल्पाद्वारे विजेचे उत्पादन भरपूर होऊ लागले. अतिरिक्त वीज विद्युत मंडळातर्फे रांजणी परिसरातील शेतक-यांना अल्प दरात विकण्याची तयारी झाली. पण विद्युत मंडळाने अचानक नकार दिला.

आता या निर्माण केलेल्या विजेच करायचं काय, या विचारात असतानाच पोलाद निर्मितीला वीज हा महत्वाचा घटक आहे, हे त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी तिथे पोलाद निमिर्ती सुरू केली आणि हे पोलाद पाकिस्तानला निर्यातही होऊ लागले, आता विजेची गरज वाढली. कचरा, सालीचा भुसा, तुराट्या, पराट्या ज्याला शेतकरी काडी लावून जाळीत असतो त्यातून त्यांनी वीज निर्मिती करण्याचे ठरवले. त्यासाठी ५ लाख रुपयांची यंत्र सामुग्री वाढवून, 'अॅग्रो वेस्ट' चा वापर करून वीज निमिर्तीची गरज भागवली. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतक-यांचा कचरा गोळा करून स्वत:च विकण्याचा नवा व्यवसाय तर मिळालाच त्यात भर म्हणजे दरवर्षी दीड कोटी रुपये शेतक-यांना त्यांच्याच शेतीतील कच-यापासून मिळू लागले आहेत.

साखरेचे भाव कोसळल्यावर, शेतकऱ्यांना भाव मिळत नसताना साखर उद्योगात समस्या निर्माण झाल्या. पण ठोंबरे थकले नाहीत. गंधकमुक्त आणि कच्ची साखर निमिर्तीसाठी केंदाने परवानगी देताच आवश्यक तेवढी  पक्की साखर आणि बाकी सर्व कच्ची, गंधकमुक्त साखर तयार करून निर्यात सुरू केली. शेतक-यांना ११०० रुपये प्रतिटन भाव दिला. ठोंबरे यांनी एवढ्यावरच न थांबता काळाची पावले ओळखून साखरनिर्मितीसह वीज, आसवनी,  इथेनॉल, रिफायनरी, बायोकंपोस्ट, बायोपॉवर, बायोगॅस व डेअरी यांसारख्या विविध प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक क्रांती निर्माण केली. शेतकरी असलेल्या सभासदाला  ठोंबरे यांनी एकाच वेळी साखर , वीज , पोलाद , आणि इथेनॉलचा उत्पादक केला. हे सर्व करणारे ठोंबरे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत आणि ही सर्व किमया आपल्याच माणसांच्या सहकार्यांनी आपल्याच माळरानावर करून दाखवली आहे.

मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून ठोंबरे यांनी नॅचरल शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. या महाराष्ट्रातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची उभारणी करून साखर उद्योगात एक मोठा आदर्श निर्माण केला. रांजणी येथे कारखाना उभारण्यापूर्वी ठोंबरे यांनी लातूर येथील मांजरा कारखान्याच्या यशस्वितेत मोठे योगदान दिले आहे. अत्यंत काटकसर व नियोजनबध्द, पारदर्शक पद्धतीने कामकाज करून साखर उद्योगात नॅचरल शुगरने अल्पकालावधीत यशस्वी गरुडझेप घेतली आहे.

बी.बी. ठोंबरे यांनी प्रकारची औद्योगिक चळवळ उभारताना  मानव विकासाला अग्रभागी ठेवून प्रदूषणमुक्त उद्योगाची यशस्वीपणे उभारणी करून मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथे दैनिकदिव्य मराठीतर्फे इंडस्ट्री एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’.

दैनिकएकमतच्या वतीने  जीवनगौरवपुरस्कार.

छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार.

मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा 'मराठा समाजभूषण पुरस्कार'.
मराठवाड्यासारख्या मागास भागात खासगी साखर कारखानदारी निर्माण करून विविध विकास कामे उभी करणाऱ्या 'नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी आपल्या उद्योग कामगिरीचा यशस्वी झेंडा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही यशस्वीपणे फडकावित उद्योजगतात एका आदर्श प्रस्थापित केले आहे.

Tuesday, 10 July 2012

भारतीय उद्योगाला दिशा देणारे द्रष्टे शास्त्रज्ञ- डॉ. रघुनाथ माशेलकर


भारतीय संशोधक, बौद्धिकसंपदा हक्क व नवनिर्मितीची संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेले नेतृत्वभारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्...थपूर्ण नियोजन करणारेविज्ञानाला ग्लॅमर मिळवून देणारे आणि खऱ्या अर्थाने समाजाभिमुख असलेले भारतातील आघाडीचे जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर...!!!

केमिकल इंजिनीअरिंगमधील त्यांचे संशोधनकार्य मोठे आहेच, पण त्याहून मोलाचे कार्य म्हणजे त्यांनी भारतातील विज्ञानविश्वाला १९८० च्या दशकापासून दिलेले सक्षम नेतृत्व! भारतासाठी तो काळ होता संशोधनसुविधांच्या अभावाचा होता. संशोधकसुद्धा भारतापेक्षा परदेशातच काम करण्यासाठी उत्सुक असायचे. अशा वेळी ज्या मोजक्या लोकांनी भारताच्या वैज्ञानिक विकासाची धुरा सांभाळली, त्यात डॉ. माशेलकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा तर बालपण मुंबईत गेलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! लहानपणीच पित्याचे छत्र हरपल्याने त्यांना त्यांच्या आईने शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. ‘आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईनहा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. गिरगांव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले आणि त्यांनी अनेक शिष्यवृत्तीही मिळविल्या.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. शाळा तशी गरीब परिस्थितील असली तरी शिक्षक मात्र ज्ञानाने श्रीमंत होते. तेथील नरहर भावे सर, एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना माशेलकरांना म्हणाले ''या भिंगाप्रमाणे तू जर तुझ्यातली सर्व शक्ती एकवटलीस तर जगातली कुठलीही शक्ती जाळन्याचे सामर्थ्य तुलासुद्धा प्राप्त होइल”. या घटनेनंतर माशेलकरांनी भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचा निर्णय घेतला. जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत..!

१९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम. एम. शर्मा या संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. काही काळ युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं. पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे तर अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले.

15 नोव्हेंबर 1976 मध्ये ते पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी(एन.सी.एल.) मध्ये संशोधक म्हणून परत आले, NCL ही CSIR च्या 40 प्रयोगशाळांपैकी एक होती. डॉ. माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. पुढे ते सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे प्रमुख झाले. त्या वेळी CSIR मध्ये २८,००० लोक कार्यरत असून देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. म्हणून माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व..! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.

अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याची आणि हळदीचं पेटंट घेतल्याची बातमीतने डॉक्टरांचं लक्ष वेधलं. आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांढनी ही अमेरिकेविरुद्धची ती लढाई जिंकली आणि 1989 मध्ये हळदीचे पेटंट मिळवलं. भारतीय पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व, त्याची किंमत आपल्याला, अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला आणि सार्याञ जगाला कळवून दिली. हाच प्रकार बासमती तांदूळ आणि कडुलिंबाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले.

एवढंच नव्हे तर आपले हे पारंपरिक ज्ञान डिजिटल स्वरूपात आणण्याची कल्पना त्यांनी मांडली आणि आज भारताकडे पारंपरिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररी तयार झाली. ही 30 लाख पानांची डिजिटल लायब्ररी आज पेटंट देण्याच्या आधी अमेरिका आणि युरोपच्या पेटंट ऑफिसकडून तपासली जाणार आहे. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांची पारंपरिक ज्ञानावर आधारलेली अन्याय्य पेटंट मागे घ्यायला सुरवात केली आहे आणि पेटंटच्या बाबतीत भारतासारख्या देशांवर होणारा अन्याय दूर होतोय याचं श्रेय डॉ. माशेलकरांच्या त्या वेळच्या द्रष्टेपणाला, धाडसी नेतृत्वाला द्यायला हवं. कारण त्या वेळी भारतासारख्या विकसनशील राष्ट्रानं अमेरिकेला पेटंटसंदर्भात आव्हान देणं, ही सोपी गोष्ट नव्हती.

अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘व्यवसायाभिमुख संशोधनया तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. 2003 मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन पारंपरिक वैद्यकशास्त्र, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम घडवून आणला. ते "चित्रकूट डिक्लतरेशन' म्हणून प्रसिद्ध आहे. आज त्यामुळे भारताच्या औषध उद्योगात मोठं परिवर्तन घडून आलं आहे आणि आज गरिबांना परवडतील अशी स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात औषधं आपण उपलब्ध करून देऊ शकतो.

डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे. भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात,'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल.

2000साली पुण्यात झालेल्या सायन्स कॉंग्रेसचे ते अध्यक्ष असतांना म्हणाले होते, जर पन्नासच्या दशकात फुटपाथच्या दिव्याखाली अभ्यास करणारा, अनवाणी शाळेत जाणारा आणि ज्याला दोन वेळेला जेवायची भ्रांत आहे असा मुलगा दहावीत बोर्डात येऊनसुद्धा त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागेल की काय अशा परिस्थितीत असतो, त्याला त्याच समाजातली काही भली माणसं आणि संस्था मिळाली तर माझ्यासारखा प्रत्येक भारतीय मुलगा आपली चमक दाखवू शकतो. कारण आपल्या देशात बुद्धिमत्ताही आहे आणि बुद्धिमत्तेला संधी देणारे मनाचे श्रीमंत लोकही आहेत. गरज आहे ती फक्त त्या बुद्धिमत्तेला लवकर ओळखण्याची आणि त्या दृष्टीनं फुलवण्याची. म्हणून गरज आहे ती बौद्धिक स्वातंत्र्यावर स्वार होण्याची.

देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी विज्ञानक्षेत्राचे नेतृत्व केले. पूर्वी तंत्रज्ञान आयात करणारा आपला भारत आज तंत्रज्ञान निर्यात करतोय आणि "टाटा नॅनो'सारखी स्वस्त कार उत्पादित करून जगापुढे एक उदाहरण ठरतोय. इंडियामधला 'I' हा इनोव्हेशन (Innovation) साठी ओळखला जावा यासाठी असणारी त्यांची तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दातून दिसते. डॉ. माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध आणि सुमारे २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. माशेलकर यांना पद्मश्री-पद्मभूषण हे नागरी सन्मान, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड असे पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच लंडन येथील जगद्विख्यात रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली. CSIR, NCL अशा महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपद, लंडनच्यारॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्य, पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य, नऊ बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्यत्व अशा विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत यशस्वीपणे भूषविली आहेत.

आशिया-प्रशांत, युरोप व अमेरिकेतील संशोधन-विकास संस्थांनी उभ्या केलेल्या आणि तब्बल ६० हजार वैज्ञानिकांचा समावेश असलेल्याग्लोबल रीसर्च अलायन्सचे ते अध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांची अॅाकॅडमी ऑफ सायन्स अॅन्ड एनोव्हेशन रीसर्च या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याद्वारे त्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस...इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला.

'मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो' असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या देशातील तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरले आहेत...!!