Tuesday 10 July 2012

भारतीय उद्योगाला दिशा देणारे द्रष्टे शास्त्रज्ञ- डॉ. रघुनाथ माशेलकर


भारतीय संशोधक, बौद्धिकसंपदा हक्क व नवनिर्मितीची संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेले नेतृत्वभारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्...थपूर्ण नियोजन करणारेविज्ञानाला ग्लॅमर मिळवून देणारे आणि खऱ्या अर्थाने समाजाभिमुख असलेले भारतातील आघाडीचे जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर...!!!

केमिकल इंजिनीअरिंगमधील त्यांचे संशोधनकार्य मोठे आहेच, पण त्याहून मोलाचे कार्य म्हणजे त्यांनी भारतातील विज्ञानविश्वाला १९८० च्या दशकापासून दिलेले सक्षम नेतृत्व! भारतासाठी तो काळ होता संशोधनसुविधांच्या अभावाचा होता. संशोधकसुद्धा भारतापेक्षा परदेशातच काम करण्यासाठी उत्सुक असायचे. अशा वेळी ज्या मोजक्या लोकांनी भारताच्या वैज्ञानिक विकासाची धुरा सांभाळली, त्यात डॉ. माशेलकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा तर बालपण मुंबईत गेलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! लहानपणीच पित्याचे छत्र हरपल्याने त्यांना त्यांच्या आईने शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. ‘आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईनहा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. गिरगांव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले आणि त्यांनी अनेक शिष्यवृत्तीही मिळविल्या.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. शाळा तशी गरीब परिस्थितील असली तरी शिक्षक मात्र ज्ञानाने श्रीमंत होते. तेथील नरहर भावे सर, एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना माशेलकरांना म्हणाले ''या भिंगाप्रमाणे तू जर तुझ्यातली सर्व शक्ती एकवटलीस तर जगातली कुठलीही शक्ती जाळन्याचे सामर्थ्य तुलासुद्धा प्राप्त होइल”. या घटनेनंतर माशेलकरांनी भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचा निर्णय घेतला. जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत..!

१९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम. एम. शर्मा या संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. काही काळ युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं. पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे तर अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले.

15 नोव्हेंबर 1976 मध्ये ते पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी(एन.सी.एल.) मध्ये संशोधक म्हणून परत आले, NCL ही CSIR च्या 40 प्रयोगशाळांपैकी एक होती. डॉ. माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. पुढे ते सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे प्रमुख झाले. त्या वेळी CSIR मध्ये २८,००० लोक कार्यरत असून देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. म्हणून माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व..! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.

अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याची आणि हळदीचं पेटंट घेतल्याची बातमीतने डॉक्टरांचं लक्ष वेधलं. आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांढनी ही अमेरिकेविरुद्धची ती लढाई जिंकली आणि 1989 मध्ये हळदीचे पेटंट मिळवलं. भारतीय पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व, त्याची किंमत आपल्याला, अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला आणि सार्याञ जगाला कळवून दिली. हाच प्रकार बासमती तांदूळ आणि कडुलिंबाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले.

एवढंच नव्हे तर आपले हे पारंपरिक ज्ञान डिजिटल स्वरूपात आणण्याची कल्पना त्यांनी मांडली आणि आज भारताकडे पारंपरिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररी तयार झाली. ही 30 लाख पानांची डिजिटल लायब्ररी आज पेटंट देण्याच्या आधी अमेरिका आणि युरोपच्या पेटंट ऑफिसकडून तपासली जाणार आहे. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांची पारंपरिक ज्ञानावर आधारलेली अन्याय्य पेटंट मागे घ्यायला सुरवात केली आहे आणि पेटंटच्या बाबतीत भारतासारख्या देशांवर होणारा अन्याय दूर होतोय याचं श्रेय डॉ. माशेलकरांच्या त्या वेळच्या द्रष्टेपणाला, धाडसी नेतृत्वाला द्यायला हवं. कारण त्या वेळी भारतासारख्या विकसनशील राष्ट्रानं अमेरिकेला पेटंटसंदर्भात आव्हान देणं, ही सोपी गोष्ट नव्हती.

अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘व्यवसायाभिमुख संशोधनया तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. 2003 मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन पारंपरिक वैद्यकशास्त्र, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम घडवून आणला. ते "चित्रकूट डिक्लतरेशन' म्हणून प्रसिद्ध आहे. आज त्यामुळे भारताच्या औषध उद्योगात मोठं परिवर्तन घडून आलं आहे आणि आज गरिबांना परवडतील अशी स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात औषधं आपण उपलब्ध करून देऊ शकतो.

डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे. भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात,'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल.

2000साली पुण्यात झालेल्या सायन्स कॉंग्रेसचे ते अध्यक्ष असतांना म्हणाले होते, जर पन्नासच्या दशकात फुटपाथच्या दिव्याखाली अभ्यास करणारा, अनवाणी शाळेत जाणारा आणि ज्याला दोन वेळेला जेवायची भ्रांत आहे असा मुलगा दहावीत बोर्डात येऊनसुद्धा त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागेल की काय अशा परिस्थितीत असतो, त्याला त्याच समाजातली काही भली माणसं आणि संस्था मिळाली तर माझ्यासारखा प्रत्येक भारतीय मुलगा आपली चमक दाखवू शकतो. कारण आपल्या देशात बुद्धिमत्ताही आहे आणि बुद्धिमत्तेला संधी देणारे मनाचे श्रीमंत लोकही आहेत. गरज आहे ती फक्त त्या बुद्धिमत्तेला लवकर ओळखण्याची आणि त्या दृष्टीनं फुलवण्याची. म्हणून गरज आहे ती बौद्धिक स्वातंत्र्यावर स्वार होण्याची.

देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी विज्ञानक्षेत्राचे नेतृत्व केले. पूर्वी तंत्रज्ञान आयात करणारा आपला भारत आज तंत्रज्ञान निर्यात करतोय आणि "टाटा नॅनो'सारखी स्वस्त कार उत्पादित करून जगापुढे एक उदाहरण ठरतोय. इंडियामधला 'I' हा इनोव्हेशन (Innovation) साठी ओळखला जावा यासाठी असणारी त्यांची तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दातून दिसते. डॉ. माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध आणि सुमारे २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. माशेलकर यांना पद्मश्री-पद्मभूषण हे नागरी सन्मान, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड असे पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच लंडन येथील जगद्विख्यात रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली. CSIR, NCL अशा महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपद, लंडनच्यारॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्य, पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य, नऊ बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्यत्व अशा विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत यशस्वीपणे भूषविली आहेत.

आशिया-प्रशांत, युरोप व अमेरिकेतील संशोधन-विकास संस्थांनी उभ्या केलेल्या आणि तब्बल ६० हजार वैज्ञानिकांचा समावेश असलेल्याग्लोबल रीसर्च अलायन्सचे ते अध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांची अॅाकॅडमी ऑफ सायन्स अॅन्ड एनोव्हेशन रीसर्च या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याद्वारे त्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस...इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला.

'मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो' असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या देशातील तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरले आहेत...!!

No comments:

Post a Comment