Monday 25 June 2012

विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व- आचार्य अत्रे



(१३ ऑगस्ट १८९८ -- १३ जून १९६९)
आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

आपल्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे करणारे, तर वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे करणारे प्र. के. अत्रे.
मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, पटकथा लेखक, राजकीय नेते आणि उत्कृष्ट वक्ते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते आणि  एक उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील होते. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेष! त्यांचे विनोदी आणि वैचारिक लेखन सारख्याच गुणवत्तेचे असे.

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ प्र. के. अत्रे. यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ साली सासवड येथे झाला. ते राम गणेश गडकरी (गोविंदाग्रजांना)यांना आपल्या गुरुस्थानी मानत. गोविंदाग्रजांचे धाकटे भाऊ अत्रेंच्या वर्गात होते. त्यांच्याकरवी अत्रेंनी गोविंदाग्रजांशी आपली ओळख करवून घेतली. उभयतांत चांगले दहा-बारा वर्षांचे अंतर होते. पण एक्कलकोंडे असे राहणारे गोविंदाग्रज आणि बाबूराव अत्रे यांची चांगलीच गट्टी जमली. गोविंदाग्रजांच्या विनोदी लेखनाचा, काव्यशैलीचा प्रभाव अत्रेंवर मोठ्या प्रमाणावर पडला. गोविंदाग्रजांच्या शैलीची नक्कल करणारे अनेक जण होऊन गेले. पण अत्रेंनी त्यांच्या शैलीला खर्या अर्थाने आदर्श मानून घेऊन गोविंदाग्रजांच्या तोडीचे लेखन त्यांनी केले. गोविंदाग्रज हे एक उत्कृष्ट विनोदी लेखक होते. आपल्या मृत्युसमयीदेखील त्यांना अनेक विनोद सुचत होते. गुरुची विनोदाला जागे ठेवण्याची प्रथा त्यांच्या शिष्याने म्हणजे अत्र्यांनी चालू ठेवली. त्यांच्या नाटकांवर गडकर्यांच्या नाटकांचा काहीसा प्रभाव आढळतो.

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शाळा शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून केली. मुंबईत पहिले सहा महिने सँडर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

अत्रे हे शिक्षण क्षेत्रात विशेष गाजले. त्यांनी सर्व स्तरांतील मुलांना एकाच शाळेत शिकवले. त्यांनी तत्कालीन पाठ्यपुस्तकांवर जबरदस्त ताशेरे ओढले व स्वतः काही शिक्षकांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी, म्हणून सोप्या भाषेतील अनेक धडे आणि कविता त्यांनी या वाचनमालेत निवडल्या. त्यांच्या वाचनमालेचे गुजरातीत भाषांतरही झाले. विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत, जिवंत वाङ्‌मयाचा व विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयोग राबवणे हे त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य ठरले. त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊनच सावरकरांनी त्यांना ‘आचार्य’ ही पदवी दिली.

अत्र्यांनी कोणत्याही व्यवसायक्षेत्रात शिरताना जास्त काळजी करत बसत वेळ दवडला नाही. ते बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे भरीव असे कार्य केले, लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी 'अध्यापन' , 'रत्नाकर', 'मनोरमा', 'नवे अध्यापन', 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली नवयुग साप्ताहिक, १९४७ रोजी जयहिंद हे सांजदैनिक आणि नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र (मराठा, नवयुग) ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख (श्रद्धांजलीपर लेख) व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे त्यांचे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते.

अत्र्यांनी लंडनला जाऊन दीड वर्षे अभ्यास केला, व परतले तेव्हा त्यांचा कायापालट झाला होता. पण त्यांच्या त्या बदलाकडे त्यावेळी कोणी लक्ष दिले नाही. कारण ते परत आल्यावर त्यांना कळले, की त्यांच्या पत्नीला क्षय झाला होता. त्या काहीच दिवसात निर्वतल्या. त्यानंतर उदास झालेल्या अत्र्यांना 'ट्रॅकवर' कोणी आणले असेल, तर त्यांच्या नाट्यलेखनाने. सांष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक भयंकर गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले. त्यावेळी सर्वांना त्यांच्या अष्टपैलूपणाची जाणीव झाली.
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने नवयुग पिक्चर्सअसे नाव बदलून घेतले. पण कालांतराने काही वादामुळे या कंपनीतून बाहेर पडणारे तेच पहिले ठरले.

अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या मराठादैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. २५ जुलै १९५९ या दिवशीच्या मराठादैनिकात शिवसेनायाच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी शिवसेनाया नावाने संघटना स्थापन करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे त्यांनी सुचविले होते. अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर शिवसेनाहेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले, आणि विचार पक्का होताच, संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली.

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. मी कसा झालो’ (१९५६) ह्या अत्रे यांच्या वाङ्‌मयीन आत्मशोधनातून व कर्‍हेचे पाणी - १ ते ५ खंडया विस्तृत आत्मचरित्रातून अत्रे उलगडत जातात.
लेखन, पत्रकारिता, वक्तृत्व, चित्रपट, शिक्षण व राजकारण या सर्वच क्षेत्रांत अद्वितीय प्रभुत्व गाजवून एका विशिष्ट कालावधीत महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य..! विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..
आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.
अशा या बहुयामी व्यक्तिमत्वाला त्रिवार प्रणाम...!

Saturday 23 June 2012

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम-- उदात्त स्वप्ने पाहणारा दृष्टा...



भारतातील मिसाइल कार्यक्रमाचे जनक, आपली सुरक्षा आपणच करावी या कार्यक्रमाचे प्रेरणास्तोत्र असणारे. अग्नीच्या यशानं आपल्या देशाला अत्युच्च अशा परमानंदाच्या अवस्थेत पोहोचवनारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.. भारतातील  सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त करणारे आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचणारे देशातील पहिले वैज्ञानिक... राजकारणापासून कोसो दूर असणारे व्यक्ती पण वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांची विस्मयकारक कामगिरी मुळे राष्ट्रपती पदाचे दरवाजे त्यांच्याकरिता खुले झाले होते. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या विशेष क्षेत्रात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो तेव्हा त्याच्याकरिता सगळ्या गोष्टी सहज शक्य होत जातात याच उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम…
विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार, डीआरडीओ चे संचालक या नात्याने सर्वसामान्यांना सुपरिचित असणारे तसेच एक मनस्वी, वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी.. जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडिलधारी... ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी... कार्यशक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा हाडांचा शिक्षक अशा अनेक पैलूंनी साकारलेले बहुमुखी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होत.
डॉ. अबुल फकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम हे त्यांचे पूर्ण नाव. बंगालच्या उपसागरातील एक बेट 'रामेश्वरम्' तिथे एका नावाड्याच्या घरी जन्मलेले, त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआनण्याचा व्यवसाय करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे म्हणूनच धर्माने मुसलमान असूनही त्यांच्या परिवाराला रामेश्वर येथील मंदिरात विशेष सम्मान मिळला आहे. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेज, तिरूची मधून बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संपर्कात आले.
 लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने त्यांनी बालपणातील बहुतांशी काळ आर्थिक समस्यांना तोंड देण्यात घालवला. अगदी लहान वयापासूनच त्यांनी कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी पूरक म्हणून गावात वर्तमानपत्रे विकणे तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६२ भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी, बंगलोरस्थित च्या कार्यक्रमात एरोडायनॅमिक्स डिझाइन, फायबर रिईन्फोर्सड प्लास्टिक या प्रकल्पात सहभागी. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही संशोधन मध्ये कार्य केले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करून दाखविले. नंतर 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९७९ ते ८० थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्ट केले.
एसएलव्ही कार्यक्रमानंतर कलामांनी एकात्म क्षेपणास्त्र प्रकल्पांतर्गत १९८५ साली त्रिशुल या अग्नीबाणाची निर्मिती आणि १९८८ मध्ये रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती आणि पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आणि कोणत्याही परकीय मदतीशिवाय आपण आपल्या देशात इतक्या प्रगत तंत्रज्ञानाचा विकास करून ते उपयोगात आणू शकतो हे सर्वांना दाखून दिले. १९८९ साली अग्नी आणि १९९० साली आकाश व नाग या अग्नीबाणाची निर्मिती करण्यात आली. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. १९९१ मध्ये वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी.आर.डी.ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. १९९० च्या प्रजासत्ताक दिनी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. प्रा. विक्रम साराभाई यांनी वीस वर्षांपूर्वी बीजारोपण केलेल्या वृक्षाचं फळ पिकलं होत.
विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, अतिशय नम्र, प्रेमळ, साधे व सरळ आहेत. त्यांना वीणा वाजण्याचा, कविता करण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. निर्भयपणे जगाला सामोरे जाणारे कलाम कुरान आणि गीता दोन्हीला समान मानणारे आहेत. म्हणूनच आज सर्व धर्म,जाती संप्रदयातील लोकांना आपलेसे वाटतात. धर्म केवळ साधन आहे, अंतिम सत्याकडे  जाण्याचा तो एक पूल आहे, अंतिम साध्य नव्हे. सत्य हे तर त्याहून खूप उंच आहे.  अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य या तत्त्वावर आधारलेले आहे. सर्वधर्मसमभावीया शब्दाचे खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम हकदार आहेत.
अब्दुल कलाम यांची काम करण्याची ताकद अफाट आहे. कामाबद्दलची निष्ठा आणि देशाप्रतीचा समर्पित भाव त्यांना थकू देत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वातून सकारात्मक उर्जेचा स्तोत्र सतत उसळत असतो. आपल्या देशातील तरुणाईने देशाची प्रगती साधण्यासाठी भव्य कार्ये डोळ्यांसमोर ठेवून ती पूर्ण करण्यासाठी झटावे आणि देशाचे चित्र बदलावे असे त्यांना वाटते. मुले देशाचे भवितव्य घडवू शकतात, त्यांची मने प्रेरित करूनच आपल्याला विकसित भारताचे स्वप्न साकार करता येईल,असे त्यांचे म्हणणे आहे.
२५ जुलै२००२ ला कलाम यांनी एका दिमाखदार वेगळ्या अशा सोहळ्यात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. संकुचित ध्येय बाळगु नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.असे त्यांचे मनापासून सांगणे आहे आणि युवकांना दिलेले हा महान संदेश आहे. २५ जुलै २००७ रोजी ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले. आजपर्यंत कलाम यांना असंख्य पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. विविध विद्यापीठांनी डी.लिटहि सन्माननीय पदवी बहाल केली आहे. आर्यभट्ट पुरस्कार, नेहरू पुरस्कार, जी.एम. मोदी पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार हे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी काही आहेत.
अब्दुल कलाम यांना भारत सरकारने १९८१ साली 'पद्मभुषण', १९९० साली 'पद्मविभुषणतर १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्यात आले. देशाला भरीव असे मार्गदर्शन  करताना या थोर सुपुत्राला भारतरत्नबहाल करणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच गौरव होय.
आयुष्यात भेटलेल्या मोठ्या व्यक्तींकडून शिकत ते स्वतः त्यांच्या पंगतीत जाऊन पोचले आणि देशाच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला. चमत्कारिक प्रतीभाचे धनी असलेले अब्दुल कलाम आजच्या आणि येणाऱ्या पिठीकारिता प्रेरणा देणारे एक  महान आदर्श आहेत.
दिपीका...

Monday 11 June 2012

साने गुरुजी...
“साधी राहणी उच्च विचारसरणी” या मूर्तीचे प्रतीक म्हणजे साने गुरुजी.

जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९ पालगड, रत्नागिरी
मृत्यू: जून ११, इ.स. १९५० के.इ.एम.रुग्णालय मुंबई



थोर साहित्यिक, स्वतंत्र समरातील आघाडीचे नेते आणि प्रेममूर्ती बालागोपालांचे लाडके दैवत मातृहृदय पू. साने गुरुजी...

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने...! त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये कोकणात पालगडसारख्या खेडेगावात झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जात पण हे त्यांच्या आजोबांच्या वेळी पण गुरुजींच्यावेळी घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली इतकी कि त्यांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले आणि गरिबीने त्यांच्या परिवाराला घेरले. शाळेतील फी भरण्याची सुद्धा सोय नसे; परंतु त्यांच्या आईला आपला मुलगा शिकला पाहिजे असेच वाटे. शिक्षणासाठी कष्ट उपसण्याची शक्ती गुरूजींजवळ होती, म्हणून ते गाव सोडून शिकण्यासाठी दूर गेले, जेणेकरून आपल्याला काम करून शिकता येईल आणि कुणी ओळखाणारही नाही. अशा परिस्थितीत गुरुजी एम.ए. पर्यंत शिकले. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर संस्कार घालणे महत्वाचे मानले. त्यासाठी त्यांनी कथा हे माध्यम निवडले व ते प्रभावी ठरले. स्वत:च्या उदाहरणातून त्यांनी मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ तर शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’ त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. स्वातंत्राची चळवळ जोर धरू लागल्यावर ते विनोबाजी, म. गांधी यांच्या संपर्कात आले आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्यांंची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.

समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्याु पांडुरंगाला खर्याे अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, अनेक भाषा, चालीरीती समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले.

त्यांच्या कथा, कादंबर्याध, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक तर मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये आपल्याला दिसतात. त्यांच्या लिखाणात मातृहृदयाची जाण होती. आजही त्यांच्या स्फुर्तिदायी कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली.

साने गुरूजींचे आपल्या आईवर नितांत प्रेम होते. ते म्हणत ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू’. त्या प्रेमातूनच ‘श्यामच्या आईचा’ जन्म झाला. ‘श्यामची आई’ या सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. गुरुजींनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले.

त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. फेब्रुवारी १९३३ मध्ये ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. आईच्या उच्च विचारसरणीतून, शिस्तीतून, प्रेमळ वागण्यातून गुरुजी घडले. माणसाने गरिबीत जीवन जगावे पण स्वाभिमान सोडू नये. प्रामाणिक असावे, लाचारी पत्करू , दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे, भूतदया, प्राणीमात्रांवर प्रेम करणे, गरिबांना मदत करावी जीवन समाजसेवेसाठी वेचावे असे त्यांना वाटे.

स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली, ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टह केले पण काही कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांचे निधन झाले. आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले आहे. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.

आसवांना शब्द देणाऱ्या, मातृहृदायाच्या महामानवास शतशः अभिवादन...!!!

संत नामदेव-- आद्य मराठी चरित्रकार व आत्मचरित्रकार...

संत नामदेव
आद्य मराठी चरित्रकार व आत्मचरित्रकार...

इ.स.१२७० ( शके ११९२ ) - इ.स. १३५० (शके १२७२)

नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत...सगुण, साक्षात्कारी संत, आद्य मराठी आख्यान कवी, कीर्तनकार, संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेलेले एकमेव समकालीन चरित्रकार, भक्तिमार्गाचे प्रचारक , आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारे अशा अनेक पैलूंनी दिसणारे भक्तशिरोमणी संत नामदेव..!!
.
वारकरी कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणून संत नामदेव प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत कीर्तनाद्वारे पंढरीच्या भागवत धर्माची पताका घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली. भविष्यकाळातही त्यांच्या भगवद्गभक्तीचा खोल ठसा अनेकानेक पिढ्यांवर मुद्रित होऊन राहील इतका तो समर्थ आहे.

संत नामदेवांचा जन्म सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी गावी प्रभव नाम संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. दामाशेटी हे संत नामदेवांच्या वडीलांचे तर गोणाई हे त्यांच्या आईचे नाव होते. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. नामदेवांचे आई-वडील दोघेही विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. असे म्हणतात की गर्भात असताना नामदेव विठ्ठलनामाचा जप करत असल्यामुळें त्याच्या मातेलाहि विठ्ठलनामाचेच डोहाळे होत होते. त्यांचे बालपण हे भूवैकुंठी, पंढरीमध्ये गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

लहान वयातच नामदेव कीर्तने करीत, पण त्यांनी गुरुपदेश घेतला नसल्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्याला सांगितले की नामदेवा, तू गुरुपदेश घेतल्याशिवाय तुला पूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही. संत गोरोबांकडे, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतमंडळी ब्रह्मज्ञान विषयक चर्चा करीत असताना ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबांनी उपस्थितांची आध्यात्मिक तयारीविषयी परीक्षा करविली असताना नामदेव एकटेच कच्चे ठरले, तेव्हा नामदेवाना गुरूचे खरे महत्व कळाले व त्यांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले.

संत ज्ञानेश्र्वरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. सर्व संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्गग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगीहे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

नामदेव महाराजांनां वारी आणि वारकऱ्यांचे विलक्षण प्रेम होते त्यासाठीच नामदेव म्हणतात कि वैकुंठापेक्षाही माझे पंढरपूर श्रेष्ठ आहे.

वैकुंठात काय आहे ? ती तर जुनाट झोपडी!
पंढरी आधी आणि मग वैकुंठ नगरी!

श्री नामदेवांची वाणी स्वभावतःच मृदू, प्रेमळ व अंतर्मुख वृत्तीची आहे. नामदेव वारीचे महात्म्य भावस्पर्शी शब्दात खालील अभंगात व्यक्त करतात...

पंढरीची वारी जयाचिये कुळी ।त्याची पायधुळी लागो मज ||||

तेणे त्रिभुवनी होईन सरता ।नलगे पुरुषार्था मुक्तीचारी॥२॥

नामाची आवडी प्र्माचा जिव्हाळा । क्षण जीवावेगळा न करी ॥३॥

नाम म्हणे माझा सोयरा जिवलगा । सदा पांडुरंग तया जवळी ॥४॥

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर संत नामदेवांच्या मनाला उदासीनता आली. त्यामुळे नाममहात्म्य आणि हरिभक्ती प्रसार व प्रचाराच्या कार्यासाठी नामदेव महाराष्ट्र बाहेर पडले. भेदाभेदीत मानवतावादी भूमिका घेऊन ते महाराष्ट्रातील पददलितांना भक्ती-छत्राखाली संघटीत केले तर गुजरात,राजस्थान,पंजाब, हरियाणा आदी परदेशांतही वारकरी पंथ आणि भगवद्भक्ती रुजविली. पंजाब, राजस्थान अशी जागोजागी आढळणारी त्यांची. ते शीख पंथीयांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर होतेच परंतु त्यांच्या अभंगाचा अंतर्भाव शिखांच्या उपासनेत असलेल्या गुरुग्रंथासाहीबात नामादेवबानीनावाने केला आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी तसेच राजस्थानातील शीख बांधवांनी त्यांचे उभारली मंदिरे याची साक्ष देतात. बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. त्यांच्या असामान्य कार्यामुळेच त्यांना `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

नामदेवांचे लिखाण प्रांजल आहेच, पण त्याला नम्र विनोदाची डूब आहे. स्वतःची खिल्ली उडवत आपली पहिली अज्ञ अवस्था ते चित्रित करतात नंतर गुरु विसोबांच्या यांच्यामुळे त्यांच्या अध्यात्मिक जीवनात घडून आलेले परिवर्तन, 'गुरु केला पाहिजे ' हे सांगणारी मुक्ताबाई आणि इतर भावंडान बद्दल वाटणारी अपार कृतज्ञता नामदेव व्यक्त करतात तसेच आपला जन्म प्रसवली माता मज माळमुत्रीअसे सांगून सामान्यांसारखाच झाला आहे, कुठलाही चमत्कार नाही हे ही सांगतात. बहुजन समाजातील शिंपी जातीत जन्मूनही त्याबद्दल खंतावत नाहीत. नामदेवांच्या विठ्ठलाच्या अनंत नामांमध्ये विशेष आवडीचे नाव म्हणजे केशव. त्यामुळे नामदेवांनी अनेक अभंगामध्ये आपली नाममुद्राही 'नाम म्हणे केशवा' अशी घेतली आहे.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे. नामदेवांच्या हिंदी अभंग रचनाही अतिशय मधुर आहेत. नामदेवांनी भागावत धर्माचा आवर वाढविण्यासाठी भाषाभेद सोडून अभंग रचना केली. त्यांचे मराठी वळणाचे हिंदी अभंगही फार सुंदर आहेत. खालील अभंग त्याचाच एक नमुना आहे.....

मन मेरे गज जिव्हा मेरी काती। माप माप काटो जमकी फासी१॥
कहा करू जाती कहा करू पाती। रामको नाम जपो दिन ओर राती ॥२॥
रागाबीन रागो सिवबीन सिवो। रामनाम बिन काही न जीवो ॥३॥
हम तो भागति करू हरीके गुण गाऊ। आठ प्रहर आपना खासमाकू त्यागु ॥४॥
सोनेकी सुई रुपेका धागा। नामक चित्त हरसू लागा ॥५॥

सुमारे ५० वर्षे त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रसार करणारे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम करणारे संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये ( शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी ) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नामादेवांचे, संतसज्जन वारकऱ्यांचे प्रेम, नामदेव पायरीच्या रुपाने विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर मूर्तिमंत विराजले आहे. संतचरण हिरे या नामदेव पायरीच्या चिरे स्पर्शतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनाला जातात.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥

सांग पंढरीराया काय करु यांसी
का रूप ध्यानासी न ये तुझे॥२॥

किर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे॥४॥

-संत नामदेव

Friday 8 June 2012


सुमन कल्याणपूर     
भाव संगीतातील हिरवा चाफा...


मेरी आवाज ही मेरी पहचान है' अशी स्वत:ची ओळख निर्माण करणं हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांची हयात निघून जाते, पण स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होत नाही. याउलट काही गायकांची ओळख ही मनावर कायम कोरल्या गेलेली असते, सुमन कल्याणपूर त्यातीलच एक..!
विश्वास, कृतज्ञता , प्रामाणिकपणा,आदर या आदर्श 'मूल्यांना' फारसा अर्थ नसणाऱ्या स्पर्धेच्या रानटी ईर्षा आणि स्वार्थने व्याप्त असलेल्या मायावी दुनियेतील गायिका सुमन कल्याणपूर यांची वाटचाल ही अनिश्चिततेच्या फे-यात अडकूनही कमालीची यशस्वी बनली म्हणूनच आज सुमनताईंनी पाश्र्वगायन सोडल्याला अनेक वर्षे उलटली तरी त्यांचे नाव गाणं रसिकांच्या मनात तसंच ताजं आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ साली भवानीपूर या ढाक्याजवळील (तत्कालीन बंगाल प्रांत) छोट्याशा गावातील हेमाडी कुटुंबात झाला. घरातील धार्मिक, कलासक्त आणि रसिक वातावरणाने त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार झाले. तिथेच वडील शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले. १९४३ मध्ये दु. महायुद्धाच्या काळात हेमाडी कुटुंबीय मुंबईत दाखल झाले आणि सहा वर्षांच्या सुमनताईंच्या रीतसर संगीत शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यांना केशवराव आणि ज्योत्स्नाबाई भोळे हे शेजारी तर यशवंत देव हे शाळेतील संगीत शिक्षक म्हणून लाभले. शाळेत असतांनाच त्याचं एक गाणंशुक्राची चांदणी’ नावाच्या मराठी सिनेमामध्ये रेकॉर्ड केलं गेल पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, हे गाणं आणि हा सिनेमाही कधी आलाच नाही. यामुळेच सुमनतार्इंची कारकीर्द मराठीतून सुरू होता हिंदी चित्रपटसृष्टीतून सुरू झाली.

दहा वर्षे वेगवेगळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतानाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही त्यांना मिळत गेली. अशाच एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनतार्इंचा आवाज ऐकला. ‘इस लडकी के आवाज मे जादू है' अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एचएमव्हीकडे स्वत:हून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली.

१९५४ साली सुमनताईंनी आपलं पहिलं गाणंमंगू’ चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं‘. संगीतकार मोहम्मद शफी आणि . पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी या चित्रपटात पाच गाणी गायली. ‘कोई पुकारे धीरे से तुझे' हे त्यांच पहिलंच गाणं तुफान लोकप्रिय झालं. मात्र लता दिदींच्या आवाजाशी साधर्म्य असल्याने सुरुवातीला तिला 'प्रतिलता' ही उपाधी मिळाली खरी पण याचा तिला त्रासच जास्त झाला. सुमन हेमाडी ही लता मंगेशकरांची नक्कल करते, असं वाटून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवलं. खरं तर सुमनताई यांचा आवाज लतादीदीच्या जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. मात्र हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येत. त्यातल्या त्यात तेव्हा लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिदी चित्रपटसृष्टीची टाळता येणारी अपरिहार्यता होती. त्यामुळे लतादिदींशी ज्यांचं पटत नव्हतं अशा काही संगीत दिग्दर्शकांनीच सुमनतार्इंकडून गाणी गाऊन घेतली. त्यामुळेच सुमनताईंना मोठ्या बॅनरचे, मोठ्या संगीतकारांचे , मोठ्या नायिकांचे सिनेमे तसे फार कमी मिळाले. विनाकारणच वाद वाढतोय हे पाहून त्यांनी राजमार्गाचा नाद तेव्हाच सोडून दिला. ‘स्वान्त सुखाय’ या तत्वाने त्या गायल्या. ज्या क्षणी त्यांची कोंडी होताना दिसली त्या क्षणी त्यांनी वाट बदलली. संघर्ष, त्वेष, इर्षा या पासून कोसो दूर राहिल्या. मोजकं आणि मनाला भावेल इतकंच काम करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवलं.

सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांना आपल्या ताकतीची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव होती. अत्यंत्‍ गोड गळा आणि शब्दातील भावार्थ समजून समरसून गाणारी गायिका त्यामुळेच त्या वेगळ्या' ठरलल्या. या तत्त्वज्ञानामुळेच आज सुमन कल्याणपूर या नावाभोवती जे आदराचे आणि कौतुकाचे वलय निर्माण होते.

१९५८ मध्ये उद्योजक श्री रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची कारकीर्द खरया अर्थाने बहरली. आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांनी मोजकी परंतु आवडणारी गाणी निवडली. ठरावीकच गायचं परंतु तेखास आपलं' असलं पाहिजे हा नियम त्यांनी जपला. त्यामुळे लतादिदींचा ऑप्शन हा टॅग मिटवून एक वेगळी ओळख त्या निर्माण करू शकल्या. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरीही त्यापैकी सुपरहिट झालेल्या गाण्यांचं प्रमाण अधिक असल्याने पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात त्यांना खरा न्याय मिळाला असच म्हणावं लागेल. नंतरच्या काळात मग अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते सुमनतार्इंकडूनच ते गाणे गाऊन घेत. ‘आजकल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर' हेब्रह्मचारी' चित्रपटातलं गाणं अनेकांना लतादिदींनीच गायलंय् असं वाटतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे.

मध्यंतरीच्या काळात लता मंगेशकर आणि महंमद रफी यांच्यात काहीतरी अनबन झाली, तेव्हा युगुलगीतं गाण्यासाठी संगीतकारांनी सुमनतार्इंचा आवाज वापरला. ही युगलगीतं इतकी लोकप्रिय
झाली की, नंतर रफी आणि सुमन कल्याणपूर ही जोडीच जमली. मराठीत आणि भाव गीतांच्या क्षेत्रात मात्र सुमन ताईला अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याचा मान मिळाला. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यांसमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. तसेच सुधीर फडके, श्रीनिवास खळे ,वसंत देसाई, स्नेहल भटकर या जाणत्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा), देवा दया तुझी ही (बोलकी बाहुली), जाग रे यादवा (प्रेम आंधळ असतं), तुझ्या कांतीसम रक्त पताका (अन्नपूर्णा) अशी असंख्य गाणीही लोकप्रिय झाली.
मराठी भावगीताच्या माध्यमातून त्यांनी अप्रतिम स्वरांगणाची निर्मिती केली. नंदाघरी नंदनवन फुलले , पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय,आकाश पांघरोनी जग शांत ,झिम झिम झरते श्रावण धारा ,घाल घाल पिंगा वाऱ्या, केतकीच्या बनी तिथे, नाविकारे वारा वही रे, तर भक्ती गीताच्या द्वारे (गणाधीश हो उठ लवकरी , ओमकार प्रधान रूप गणेशाचे,देह शुद्ध करूनी,चंदनाचे हात पाय ही चंदन, नाम आहे आदी अंती ,देव माझा विठू सावळा,चाल उठ रे मुकुंदा,श्रीरामाचे चरण धरावे) त्यांच्या स्वरातून रसिकांच्या मनावर अमृत शिंपणच होते. त्यांनी मराठी, हिंदी व्यतिरिक्त १३ भाषांमध्ये पाश्र्वगायन केलंय.

१९८० च्या दशकात कुटुंबांच्या जबाबदारया सांभाळत त्यांनी आपली करीअरची वाटचालही सुरू ठेवली. त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत त्यांचे पिता आणि नंतर त्यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. विशेषतः त्यांच्या पतीने प्रसंगी स्वतः चे व्यवसाय मागे ठेवून पत्नीचे करीयर घडविण्यात सिंहाचा वाट उचलला! सुमनताईं बरोबर प्रत्येक ठिकाणी जाताना ते त्यांना नैतिक आणि मानसिक बळच देत होते. याच काळात चित्रसृष्टीत झपाट्याने होत जाणारे बदल, त्यांच्या पतीची प्रकृती, इत्यादींमुळे त्यांनी खूप मोजकी गाणी गायली. मराठीमध्ये संगीतकारांनी केलेल्या नॉन फिल्मी अल्बम्ससाठीही त्यांनी गायन केलं. मात्र, नव्वदच्या दशकात त्यांनी व्यावसायिक संगीतक्षेत्रातून काम करणं बंद केलं.

देश विदेशात त्यांनी अनेक संगीताचे कार्यक्रम केले.बी बी सी टी.व्ही.वर मुलाखत देणारी ती पहिली कलावंत ठरली. सुमनताईंना २०१० मध्ये महंमद रफी पुरस्कार तर २०११ मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आणि झी गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. लता मंगेशकर पुरस्काराप्रती त्यांनी हाएका सुमधुर आवाजाने दुसऱ्या सुमधुर आवाजाचा केलेला हा सन्मान आहे’ असे भाव व्यक्त केलेत तरपती जिवंत असताना हा गौरव मला मिळाला असता तर आम्हा दोघांनाही भरपूर आनंद झाला असता’ या वाक्यात त्यांना जाणवत असलेली खंतही व्यक्त केली.

मायावी नगरीत आयुष्य घालवून सुमन कल्याणपूर तिथल्या गढूळ वातावरणापासून अलिप्त राहीलेल्या आपली कारकीर्द आपल्या निकषांवर सुरू ठेवणाऱ्या तर 'जो मिल गया उसिको मुकद्दर समज लिया, जो खो गया मै उसको भूलता चला गया'या साहिरच्या तत्वाशी देव सारखीच अभेद्य राहिलेल्या सुमन कल्याणपूर.
संगीत हा जीवनाचा भाग आहे आणि पाश्र्वगायन हा त्या संगीत साधनेतील एक छोटासा भाग असणाऱ्या सुमनताई आज पंच्याहातरव्या वर्षी सुखाने आयुष्य जगात आहेत.