Friday 8 June 2012


सुमन कल्याणपूर     
भाव संगीतातील हिरवा चाफा...


मेरी आवाज ही मेरी पहचान है' अशी स्वत:ची ओळख निर्माण करणं हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांची हयात निघून जाते, पण स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होत नाही. याउलट काही गायकांची ओळख ही मनावर कायम कोरल्या गेलेली असते, सुमन कल्याणपूर त्यातीलच एक..!
विश्वास, कृतज्ञता , प्रामाणिकपणा,आदर या आदर्श 'मूल्यांना' फारसा अर्थ नसणाऱ्या स्पर्धेच्या रानटी ईर्षा आणि स्वार्थने व्याप्त असलेल्या मायावी दुनियेतील गायिका सुमन कल्याणपूर यांची वाटचाल ही अनिश्चिततेच्या फे-यात अडकूनही कमालीची यशस्वी बनली म्हणूनच आज सुमनताईंनी पाश्र्वगायन सोडल्याला अनेक वर्षे उलटली तरी त्यांचे नाव गाणं रसिकांच्या मनात तसंच ताजं आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ साली भवानीपूर या ढाक्याजवळील (तत्कालीन बंगाल प्रांत) छोट्याशा गावातील हेमाडी कुटुंबात झाला. घरातील धार्मिक, कलासक्त आणि रसिक वातावरणाने त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार झाले. तिथेच वडील शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले. १९४३ मध्ये दु. महायुद्धाच्या काळात हेमाडी कुटुंबीय मुंबईत दाखल झाले आणि सहा वर्षांच्या सुमनताईंच्या रीतसर संगीत शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यांना केशवराव आणि ज्योत्स्नाबाई भोळे हे शेजारी तर यशवंत देव हे शाळेतील संगीत शिक्षक म्हणून लाभले. शाळेत असतांनाच त्याचं एक गाणंशुक्राची चांदणी’ नावाच्या मराठी सिनेमामध्ये रेकॉर्ड केलं गेल पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, हे गाणं आणि हा सिनेमाही कधी आलाच नाही. यामुळेच सुमनतार्इंची कारकीर्द मराठीतून सुरू होता हिंदी चित्रपटसृष्टीतून सुरू झाली.

दहा वर्षे वेगवेगळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतानाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही त्यांना मिळत गेली. अशाच एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनतार्इंचा आवाज ऐकला. ‘इस लडकी के आवाज मे जादू है' अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एचएमव्हीकडे स्वत:हून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली.

१९५४ साली सुमनताईंनी आपलं पहिलं गाणंमंगू’ चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं‘. संगीतकार मोहम्मद शफी आणि . पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी या चित्रपटात पाच गाणी गायली. ‘कोई पुकारे धीरे से तुझे' हे त्यांच पहिलंच गाणं तुफान लोकप्रिय झालं. मात्र लता दिदींच्या आवाजाशी साधर्म्य असल्याने सुरुवातीला तिला 'प्रतिलता' ही उपाधी मिळाली खरी पण याचा तिला त्रासच जास्त झाला. सुमन हेमाडी ही लता मंगेशकरांची नक्कल करते, असं वाटून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवलं. खरं तर सुमनताई यांचा आवाज लतादीदीच्या जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. मात्र हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येत. त्यातल्या त्यात तेव्हा लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिदी चित्रपटसृष्टीची टाळता येणारी अपरिहार्यता होती. त्यामुळे लतादिदींशी ज्यांचं पटत नव्हतं अशा काही संगीत दिग्दर्शकांनीच सुमनतार्इंकडून गाणी गाऊन घेतली. त्यामुळेच सुमनताईंना मोठ्या बॅनरचे, मोठ्या संगीतकारांचे , मोठ्या नायिकांचे सिनेमे तसे फार कमी मिळाले. विनाकारणच वाद वाढतोय हे पाहून त्यांनी राजमार्गाचा नाद तेव्हाच सोडून दिला. ‘स्वान्त सुखाय’ या तत्वाने त्या गायल्या. ज्या क्षणी त्यांची कोंडी होताना दिसली त्या क्षणी त्यांनी वाट बदलली. संघर्ष, त्वेष, इर्षा या पासून कोसो दूर राहिल्या. मोजकं आणि मनाला भावेल इतकंच काम करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवलं.

सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांना आपल्या ताकतीची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव होती. अत्यंत्‍ गोड गळा आणि शब्दातील भावार्थ समजून समरसून गाणारी गायिका त्यामुळेच त्या वेगळ्या' ठरलल्या. या तत्त्वज्ञानामुळेच आज सुमन कल्याणपूर या नावाभोवती जे आदराचे आणि कौतुकाचे वलय निर्माण होते.

१९५८ मध्ये उद्योजक श्री रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची कारकीर्द खरया अर्थाने बहरली. आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांनी मोजकी परंतु आवडणारी गाणी निवडली. ठरावीकच गायचं परंतु तेखास आपलं' असलं पाहिजे हा नियम त्यांनी जपला. त्यामुळे लतादिदींचा ऑप्शन हा टॅग मिटवून एक वेगळी ओळख त्या निर्माण करू शकल्या. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरीही त्यापैकी सुपरहिट झालेल्या गाण्यांचं प्रमाण अधिक असल्याने पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात त्यांना खरा न्याय मिळाला असच म्हणावं लागेल. नंतरच्या काळात मग अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते सुमनतार्इंकडूनच ते गाणे गाऊन घेत. ‘आजकल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर' हेब्रह्मचारी' चित्रपटातलं गाणं अनेकांना लतादिदींनीच गायलंय् असं वाटतं, पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे.

मध्यंतरीच्या काळात लता मंगेशकर आणि महंमद रफी यांच्यात काहीतरी अनबन झाली, तेव्हा युगुलगीतं गाण्यासाठी संगीतकारांनी सुमनतार्इंचा आवाज वापरला. ही युगलगीतं इतकी लोकप्रिय
झाली की, नंतर रफी आणि सुमन कल्याणपूर ही जोडीच जमली. मराठीत आणि भाव गीतांच्या क्षेत्रात मात्र सुमन ताईला अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याचा मान मिळाला. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यांसमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. तसेच सुधीर फडके, श्रीनिवास खळे ,वसंत देसाई, स्नेहल भटकर या जाणत्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा), देवा दया तुझी ही (बोलकी बाहुली), जाग रे यादवा (प्रेम आंधळ असतं), तुझ्या कांतीसम रक्त पताका (अन्नपूर्णा) अशी असंख्य गाणीही लोकप्रिय झाली.
मराठी भावगीताच्या माध्यमातून त्यांनी अप्रतिम स्वरांगणाची निर्मिती केली. नंदाघरी नंदनवन फुलले , पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय,आकाश पांघरोनी जग शांत ,झिम झिम झरते श्रावण धारा ,घाल घाल पिंगा वाऱ्या, केतकीच्या बनी तिथे, नाविकारे वारा वही रे, तर भक्ती गीताच्या द्वारे (गणाधीश हो उठ लवकरी , ओमकार प्रधान रूप गणेशाचे,देह शुद्ध करूनी,चंदनाचे हात पाय ही चंदन, नाम आहे आदी अंती ,देव माझा विठू सावळा,चाल उठ रे मुकुंदा,श्रीरामाचे चरण धरावे) त्यांच्या स्वरातून रसिकांच्या मनावर अमृत शिंपणच होते. त्यांनी मराठी, हिंदी व्यतिरिक्त १३ भाषांमध्ये पाश्र्वगायन केलंय.

१९८० च्या दशकात कुटुंबांच्या जबाबदारया सांभाळत त्यांनी आपली करीअरची वाटचालही सुरू ठेवली. त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत त्यांचे पिता आणि नंतर त्यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. विशेषतः त्यांच्या पतीने प्रसंगी स्वतः चे व्यवसाय मागे ठेवून पत्नीचे करीयर घडविण्यात सिंहाचा वाट उचलला! सुमनताईं बरोबर प्रत्येक ठिकाणी जाताना ते त्यांना नैतिक आणि मानसिक बळच देत होते. याच काळात चित्रसृष्टीत झपाट्याने होत जाणारे बदल, त्यांच्या पतीची प्रकृती, इत्यादींमुळे त्यांनी खूप मोजकी गाणी गायली. मराठीमध्ये संगीतकारांनी केलेल्या नॉन फिल्मी अल्बम्ससाठीही त्यांनी गायन केलं. मात्र, नव्वदच्या दशकात त्यांनी व्यावसायिक संगीतक्षेत्रातून काम करणं बंद केलं.

देश विदेशात त्यांनी अनेक संगीताचे कार्यक्रम केले.बी बी सी टी.व्ही.वर मुलाखत देणारी ती पहिली कलावंत ठरली. सुमनताईंना २०१० मध्ये महंमद रफी पुरस्कार तर २०११ मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आणि झी गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. लता मंगेशकर पुरस्काराप्रती त्यांनी हाएका सुमधुर आवाजाने दुसऱ्या सुमधुर आवाजाचा केलेला हा सन्मान आहे’ असे भाव व्यक्त केलेत तरपती जिवंत असताना हा गौरव मला मिळाला असता तर आम्हा दोघांनाही भरपूर आनंद झाला असता’ या वाक्यात त्यांना जाणवत असलेली खंतही व्यक्त केली.

मायावी नगरीत आयुष्य घालवून सुमन कल्याणपूर तिथल्या गढूळ वातावरणापासून अलिप्त राहीलेल्या आपली कारकीर्द आपल्या निकषांवर सुरू ठेवणाऱ्या तर 'जो मिल गया उसिको मुकद्दर समज लिया, जो खो गया मै उसको भूलता चला गया'या साहिरच्या तत्वाशी देव सारखीच अभेद्य राहिलेल्या सुमन कल्याणपूर.
संगीत हा जीवनाचा भाग आहे आणि पाश्र्वगायन हा त्या संगीत साधनेतील एक छोटासा भाग असणाऱ्या सुमनताई आज पंच्याहातरव्या वर्षी सुखाने आयुष्य जगात आहेत.

No comments:

Post a Comment