Tuesday 24 July 2012

सिंहासारखा शूरवीर,निष्ठावंत मराठी सरदार- तानाजी मालुसरे



तानाजी मालुसरे हे मराठ्यांचे शूर योद्धे...कोंढाणातील लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढाणा(सिंहगड) स्वराज्यात परत आणणारे...आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर...!

सातारा जिल्ह्यातील, जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच संगमेश्वर काबीज केल्यावर सुर्व्यांनी अचानकपणे रात्री केलेल्या हल्लाला अतिशय शौर्याने मोडून काढत मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले होते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच ते रायगड जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ) गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.

आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले. कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता, या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असतानांही, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता.

कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी) राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले. दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली. लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.

तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला, मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून निकराची लढाई करत हा किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता.
  
दुसऱ्या दिवशी राजे गडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले. त्यानंतर त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या तानाजींच्या गावी पाठवले.  ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. सिहंगडावर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी उभारला आहे. ते ज्या ठिकाणी राहत असत, त्या रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

आपल्या धन्याच्या वचनाला जागून कोंढाणा उर्फ सिंहगड हा अभेद्य मानलेला किल्ला उदयभान राठोड सारख्या किल्लेदारापासून मोठ्या मर्दुमकीनें एका रात्रीत हल्ला करून ताब्यात घेणारे तानाजी खरोखरच सिंह होते... 
अशा या सिंहाला आणि त्यांच्या बंधू सूर्याजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...!!!

-संग्रहीत.

No comments:

Post a Comment