Monday 7 May 2012

निर्मलाताई  पुरंदरे... 

आत्मविश्वासाच्या विश्वाचा आधार...

आजही आपला जवळजवळ सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहतो आणि त्यापैकी अनेकजण; विशेषतः महिला अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ संस्थेने ग्रामीण भागातील. महिला मुले यांना शिक्षणाचे, पर्यायाने विकासाचे दार खुले करून दिले.

ताई आता आम्हाला आमच्या घरात मान मिळतो.
ताई त्यादिवशी गावच्या शाळेत मला शिकवायला बोलावलं होतं.
ताई त्या दिवशी गावच्या सरपंचानी माझा सल्ला विचारला.
ताई आता गावात सगळेजणबालवाडीताई’ म्हणून आदराने वागवतात.”
ताई, ताई आणि फक्त ताई... जणूताई’ हाच त्यांचा श्वास नि ध्यासही. जणूताई’ हाच त्यांचा अंतिम शब्द निताई’ म्हणतील, तीच त्यांच्यासाठी पूर्वदिशाही..!
..
याताई’ म्हणजे निर्मला पुरंदरे..!

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या संचालिका. तना-मनाचं शुभ्रपण कसं असावं, ते निर्मलाताईंना पाहिल्यावर कळतं. आतबाहेर वेगवेगळं काही नाही. जे काही आहे, ते सारं स्वच्छ, निर्मळ आणि पारदर्शक. कुणी नावालाही हिणकस शोधू शकणार नाही इतकं. कामाप्रती नि ध्येयाप्रती असलेल्या असीम निष्ठेमुळेच त्यांचं शीलवान नेतृत्व उजळून निघालंय आणि त्यामुळेच 78 व्या वर्षीही निर्मलाताईंची समाजसेवेची आस कायम आहे.

खरं तर वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी एक स्वप्न पाहिलं. केवळ पाहिलंच नाही, ते प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्दही त्यांनी उराशी बाळगली. हे स्वप्न होतं ग्रामीण भागातील मुलांना पूर्वप्राथमिक बालशिक्षण मिळण्याचं. त्यासाठी १९८१ मध्ये त्यांनीवनस्थळी’ या संस्थेची स्थापना केली आणि संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील मुलांना पूर्वप्राथमिक बालशिक्षण द्यायला सुरुवात केली. गेल्या ३० वर्षात त्यांचं म्हणजे निर्मलाताईंचं स्वप्न साकार झालं आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, लातूर, नाशिक आणि सांगली अशा सात जिल्ह्यांतवनस्थळी’च्या पूर्वप्राथमिक बालशिक्षण देणाऱ्या सुमारे सव्वाशे बालवाडय़ा सुरू आहेत. पाचेक वर्षापूर्वीपर्यंत वनस्थळीच्या या बालवाडय़ांची संख्या खरं तर अडीचशेच्या आसपास होती. पण महाराष्ट्र सरकारला पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची गरज पटली आणि शिक्षण खात्याने राज्यस्तरावर पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची सोय केली. त्यामुळे संख्येच्या पातळीवर वनस्थळीच्या बालवाडय़ांचा आकडा कमी झाला. अर्थात निर्मलाताई असा विचार कधीही करत नाहीत. त्या फक्त आपलं काम करत राहतात. अधिकाधिक मुलांपर्यंत कसं पोचता येईल; याचा विचार करत राहतात.

डॉ. अच्युत शंकर आपटे यांनी १९५५ मध्ये या स्थापना केलेल्याविद्यार्थी साहाय्यक समिती”चे काम करत असताना अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांशी निर्मलाताईंचा परिचय झाला. त्यातील अनेकांच्या घरीही त्यांचे जाणे झाले. त्यावेळी या मुलांची कौटुंबिक परिस्थिती, ग्रामीण भागातील प्रश्नर, एकूणच स्थिती त्यांच्या लक्षात आली. आजही आपला सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहत असून शिक्षणापासून वंचित आहे. शिक्षण नाही म्हणून पुढे उभे राहणारे कितीतरी प्रश्नग आहेत, या विचाराने त्यांना ग्रासले. हीच स्थिती ग्रामीण महिलांचीही आहे. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित म्हणून विकासाचा विचार नाही, कुटुंबात दुय्यम स्थान, योग्य आहार, निरोगी वातावरण, वैद्यकीय मदत, दळणवळणाच्या साधनांचा अभाव यांमुळे या महिलांच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य ताईंच्या लक्षात आले. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर स्थानिक पातळीवरच काम सुरू करावे लागेल या विचारातून 21 डिसेंबर 1981 पासून "वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा'चे काम सुरू झाले.

अनेक कारणांमुळे खेड्यातील मुलींचे अर्धवट राहिलेले शिक्षण आणि त्यातून त्यांचा थांबलेला पुढचा प्रवास विचारात घेऊन "वनस्थळी'ने त्यांना संधी देण्याचा उपक्रम सुरू केला. या मुली आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला, तर गावाची प्रगती वेगाने होईल, या भूमिकेतून प्रयोगाला सुरवात झाली. ग्रामीण भागातील पालकांमध्ये वयाच्या सहा वर्षांपर्यंत मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकताच नव्हती. अडीच-तीन वर्षांपासून मुलाला विविध साधनांची, व्यवहारातील गोष्टींची माहिती व्हायला हवी, त्यांच्यामधील कलांची जाणीव व्हावी म्हणून बालशिक्षण महत्त्वाचे असल्याने ते देण्यासाठी शिक्षक प्रशिक्षित सक्षम हवेत म्हणून ग्रामीण महिलांसाठी बालवाडीताई प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठीहिंगणे स्त्री- शिक्षण संस्था” नूतन बाल शिक्षण संघ” यांचे सहकार्य घेण्यात आले. या वर्गांतून पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी आवश्यईक बालशिक्षण कार्यपद्धती, मानसशास्त्र, आरोग्य आणि आहार, बालकल्याण इत्यादींविषयी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. अर्धवट शिक्षण झालेल्या, गावातीलच विविध जाती-धर्मातील अल्पशिक्षित महिलांनी याद्वारे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण झाल्यावर या महिलांनी आपल्याच परिसरातील वीस-पंचवीस मुले जमा करून बालवाडी सुरू करण्यासाठीही "वनस्थळी'ने त्यांना प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले. तसेच, मेळावे, निवासी शिबिरे, चर्चासत्रे घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचाही प्रयत्न केला.

वनस्थळी’चा पूर्वप्राथमिक बालशिक्षणाचा उपक्रम मुलांना लहान वयातच अभ्यासाची गोडी लावणारा होताच. पण तो बालवाडीताईंच्याही व्यक्तिमत्त्व विकासाचा उपक्रम होता. कारण मुलांना शिकवता शिकवता बालवाडीताई स्वत:ही शिकत होत्या. महत्त्वाचं म्हणजे आधी सातवी-आठवी किंवा बारावीपर्यंत शिकूनही गावातल्या एखाद्या मुलीला घरात-गावात-समाजात मान मिळायचा नाही. पण बालवाडीताईचं प्रशिक्षण घेऊन गावागावात बालवाडय़ा सुरू केल्यावर मात्र याच मुलींना गावात आदराची वागणूक मिळू लागली. कुठलाही निर्णय आणि कृती त्या जबाबदारीने पार पाडू लागल्या. निर्मलाताईंनी गावेगावी जे आहे, त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी लागणारं साहित्य बनवायला मुलींना शिकवलं. त्यामुळे मुलंही शिक्षणसाहित्याला बुजली नाहीत...निर्मलाताईंना ग्रामीण भागातल्या महिलांचा-मुलांचा-समाजाचा विकासच महत्त्वाचा वाटतो. मग तो आपण केला काय किंवा शासनाने केला काय. म्हणून तर त्या पूर्वप्राथमिक बालशिक्षणाची कास धरून त्या थांबल्या नाहीत. त्यापुढे जाऊन त्यांनी वनस्थळीतर्फे शाळाशाळांत जाऊन किशोर छंदवर्ग घेणे, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण शिबीर असे अनेक उपक्रम राबवायला सुरुवात केली. आता तर बालवाडीताई प्रमाणेच वनस्थळीने बारावी झालेल्या मुलींनाआरोग्य सेविका प्रशिक्षण’ द्यायला सुरुवात केलीय. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून इथे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयांत आरोग्य सेविकेचं काम आदराने दिलं जात आहे.

ग्रामीण भागातील गरजा ओळखून "वनस्थळी'च्या माध्यमातून निर्मलाताईंनी आजवर असंख्य मुलांना घडवले. स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांना स्वत:च्या पायावर उभे केले. "विद्यार्थी सहायक समिती'च्या माध्यमातूनही त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना नवी दिशा दिली. त्यांची "फ्रान्स मित्रमंडळ' ही संस्था भारत-फ्रान्सची संस्कृती समजून घेत एकमेकांमधील नाते दृढ करत आहे. डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे.

ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना बद्दल पुणेकरांनीपुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे. सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरत असलेल्या शिवछत्रपतींची प्रतिमा असलेले गौरवचिन्ह आणि रोख एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांना आणि यांच्या पुढील कार्याला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप खूप शुभेच्छा...

संपर्क-वनस्थळी,
318/ 19
बी, कॅनॉल रोड, मॉडेल कॉलनी, पुणे- 411 016 फोन .- (020 - 25651550)




No comments:

Post a Comment