Monday, 7 May 2012

कवी ग्रेस... 
अरुपाचे रुप दावणारा कवी...
जन्म:- १०मे १९३७
मृत्यू:-  २६मार्च २०१२ 

कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी नागपूर येथे झाला. माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं मूळ नावं. पण "कवी ग्रेस" या नावाने त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९६७ साली प्रकाशित झालेल्या "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत, अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. त्यांच्या काही कविता आपल्या शालेय अभ्यासक्रमातही आहेत.
                                                      
"समजण्यास अत्यंत अवघड" इथपासून ते "केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही" इथपर्यंतच्या टीका कवी ग्रेस यांच्या काव्यावरती झाल्या आहेत. यावर "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही" असे त्यांचे म्हणणे होते.
ग्रेसची दुःखला सामोरे जाण्याची पद्धत विलक्षण होती. दुःख आणि कविहृदय याचा संबंध अन्योन्य स्वरूपाचा आहे. दुःख जणू शहाणपण देण्याकरिताच निर्माण होत असावे. म्हणूनचदेठास तोडतानाही रडले फुलांचे अंग’ ही पुष्पवस्था त्यांना आदर्शवत वाटत असावी.. ग्रेसच्या कवितेचे दर्शनी स्वरूप अत्यंत मोहक आहे. संगमरवरावर नाजूक हाताने नक्षी काढून, तिला रंग दिल्यावर तिचे सौंदर्य खुलावे, तशी शब्दांची नक्षी कोरण्याचा ग्रेसला हव्यास होता. त्यांच्यासंध्याकाळच्या कविता’ प्रकाशित होऊन इतकी वर्षे लोटल्यावरही तिच्यातील ताजेपणा लोपले नाही.

ग्रेस यांना अगदी सुरवातीपासूनच शब्दशक्तीची विलक्षण समज होती. त्यांना ती नक्षीकामाकरिता अतिशय उपयोगी पडली. शब्दाच्या अर्थाची आणि नादाची इतकी खोल समाज असणारा कवी निराळाच. आवश्यक शब्दांच्या अचूक निवडीत त्याच्या प्रतिभेचे मर्म आहे. अपरिचित, आडवळणी, कृत्रिम, मुद्दाम निर्माण केलेले, इंग्रजीने संस्कारित केलेले असे कोणतेही शब्द त्याच्या कवितेत नाहीत. याचे कारण त्यांचे भावविश्व संपूर्णपणे भारतीय जीवन जाणीवांनी आणि वैचारिक विश्वाने संस्कारित केलेले होते. ग्रेसच्या अनवट अनुभूतीविश्वाने ग्रेसच्या शैलीला विवक्षित परिणाम दिले. शैलीतील प्रासादिकतेचे सौंदर्य तिला मान्य नव्हते, किंबहुना कविता आलंकारिक आणि भरजरी असली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. ग्रेसच्या शैलीत सुभाषितवजा चरणांना फार महत्व आहे. आपल्या प्रतिभेच्या घाटातूनच मराठी काव्य परंपरेतील आवश्यक घटकांचा स्वीकार त्यांनी केला होता.समकालीन भावकाव्यात कवी ग्रेसच्या कविता संपूर्णपणे वेगळ्या आहेत.. मर्ठेकारी काव्याप्रवाहत लिहिणाऱ्या अलीकडच्या कवींच्या संस्कृतिसंचीताला दिलेला नकार आणि बोजड गद्मयता यामुळे निर्माण झालेले मराठी कवितेतील आवर्त ग्रेसच्या कवितेने निवारले.. मराठी कवितेतील संस्कारभान तिने जगविले. परंपरागत मराठी संस्कृतीतील तपशिलाचा साहचर्यसंगीतयुक्त उपयोग करून तिला समृद्ध केले. पण त्यातच गुंतून पडता नेनिवेप्रधान भावावस्थेतील तरल गुढ अनुभूतिनी साकार करून एक अभिजात सोंदर्यशिल्पाचे रूप आपल्या कवितेला दिले. मराठी भावकवीतेला आपल्या अंतस्थ गेयतेचे परिमाण देऊन समृद्ध केले.

स्वतःच्या जगण्यातून इतरांना सदैव अस्वस्थ करणाऱ्या कविवर्य ग्रेस यांच्या जगण्याची धाटणी "मै ओर मेरी तनहाई" अशी होती.. वर्तमानातील प्रत्येक क्षणाची चाचपणी करून तो मनसोक्त जगण्याची आणि त्यासाठी पाहिजे ती किंमत मोजण्याच्या ग्रेस यांच्या जगण्याचे कुतूहल शेवट पर्यंत कायम राहिले. अनेकदा स्वतःच्या एकटेपणाच्या प्रेमात असलेल्या ग्रेस यांना या एकटेपणानेच जगण्याची मजा बहाल केली होती. कधी रडवणारे, कधी हसविणारे, कधी अंतर्मुख करणारे, तर कधी जगण्याचे आणि जगाचे अद्वितीय सत्य उमगायला लावणारे, स्वतःच्या जगण्यावर निस्सिम प्रेम करणारे, कवी ग्रेस म्हणजे कलंदर माणूस... म्हणूनच...

I am free But not Available.
Flat For Sale But not For Gentlemen.

असे अफलातून ओळी लिहून ठेवायचे.

इतरांना जगण्याचे भान आणून देतानाच त्यांना काहीतरी वेगळे तत्वज्ञान सांगणारे ग्रेस अतिशय दिलदार. त्यांच्या घरात आलेला कोणीही माणूस कधी रिकाम्या हाताने गेलाच नसावा. तो विचार, आनंदी जगणे, एकटे जगण्यातील ताकद, असे बरेच काही घेऊन गेलेला असावा.
संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काही गाजलेले कविता संग्रह तर चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, कावळे उडाले स्वामी हे त्यांचे गाजलेले ललित संग्रह होते.

कवी गेस हे नागपूरच्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालयात (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. यांनी काही काळ पत्रकारितासुध्दा केली होती. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या दुस-या -साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
पुरस्कार :-

संध्याकाळच्या कविता’ या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८,
चर्चबेल’ ललितबंधाला राज्य पुरस्कार,
राजपुत्र आणि डार्लिंग’ राज्य पुरस्कार,
चंद्रमाधवीचे प्रदेश’ या कवितासंग्रहाला प्रादेशिक भाषेत बंगलोरमध्ये राज्य पुरस्कार,
मितवा’ या ललितबंधाला मारवाडी संमेलनात सम्मान, कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार-२०११, नागपूर भूषण २०११, नागपूर - विदर्भ फाउंडेशनचा "विदर्भभूषण' पुरस्कार -२०११,
"
वा-याने हलते रान" या ललित लेखसंग्रहाला २०१२ सालच्या "साहित्य अकादमी पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले होते. आजारी असूनही साहित्यविश्वातील सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी ग्रेस व्हिलचेअरवर या समारंभासाठी आले होते. पण बसल्या जागेवरून हलणे शक्य नसल्यामुळे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी, ग्रेस बसले होते तेथे जाऊन त्यांचा सन्मान केला.


कवी ग्रेस गेले काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होते.तीन वर्षांपुर्वी त्याना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून ते पुण्य़ाच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र आठवड्याभरापूर्वी त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अखेर २६ मार्च २०१२ रोजी ७५ वर्षीय ग्रेस यांची प्राणज्योत मालवली.

समकालीन कवींपेक्षा वेगळा विचार करून शब्दांच्या जगात लिलया वावरणारा हा जादूगार आज गेल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. घर थकलेले संन्यासी, ती गेली तेव्हा, निष्पर्ण तरूंची राई, मरण या त्यांच्या गाजलेल्या कविता रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो....!!! 

Thursday, 3 May 2012

दादासाहेब फाळके...
भारतीय चित्रपटनिर्मितीचे जनक...


जन्म :- एप्रिल ३०, १८७० त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र
मृत्यू :- फेब्रुवारी १६, १९४४ नाशिक, महाराष्ट्र


३ मे १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र" या पहिल्या मूकपटाद्वारे भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला या वर्षात १०० वर्षे होत आहेत. आज चित्रपट माध्यमाने समस्त भारतीयांना कवेत घेतले आहे. किंबहुना या न त्या रुपात तो जगण्याचाच भाग झालंय. सिनेमाने सिद्ध केलय कि तुमची वागणूक, नातं, देश, वेश,जात,भाषा,धर्म काहीही असो मनुष्य इथून तिथून एकच आहे...!!!

भारतीय माणसाला, त्याच्या मनाला आकार देणारा हा सिनेमा या वर्षी शाताब्दीकडे वाटचाल करीत आहे. या शंभर वर्षात मनुष्य घडविण्याच्या प्रक्रियेत हजारो कलावंतानी, लाखो तंत्रज्ञानीं आणि कोटी प्रेक्षकांनी भाग घेतला. त्यातून एक चित्रपट संस्कृती निर्माण झाली. आजच्या या चित्रपट संस्कृतीचे आणि भारतीय चित्रपटाच्या इतिहासात "गोष्ट सांगण्याची कला" प्रकारात गौरवशाली स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय चित्रपटाचे जनक म्हणजे दिवंगत दादासाहेब फाळके आहेत.

दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके ह्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. वडिल प्रसिद्ध संस्कृत पंडित असूनही दादासाहेबांना आकर्षण होतं ते रंगांचं, रेषांचं.... म्हणूनच त्यांनी १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे प्रवेश घेतला. वर्षभरातच फर्स्ट ग्रेडची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात ड्रॉईंग, पेंटिग, मॉडेलिग आणि फोटोग्राफीचे शिक्षण त्यांनी घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. तसेच त्या काळात छायाचित्रकार व नेपथ्यकार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांनी फोटोग्राफीसाठी स्टील कॅमेरा खरेदी केला. गज्जरांचा कलाभवन स्टुडिओ काही काळ चालवल्यानंतर गोध्रा इथे छायाचित्रणाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९०२ पासून भारत सरकारच्या पुरातत्व विभागात तीन वर्ष त्यांनी नोकरी केली. प्राचीन भूमिगत शहरांची रेखाटनं करण्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यानंतर वंगभंगाच्या चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. लोणावळ्याला ‘फाळकेज् आर्ट अॅन्ड प्रिटींग वर्क्स’ या नावाने छापखान्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु छपाई व्यवसायात त्यांच्या सहकार्यांुशी त्यांचे वादविवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. एका फोटोग्राफिक स्टुडिओमध्येही त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि नंतर पोर्ट्रेट फोटोग्राफर, तसंच चक्क जादूगार म्हणूनही त्यांनी किमया दाखवली. पुढच्या आयुष्यात त्यांनी कॅमे-यानं दाखवलेल्या जादुला तर सगळेच भुलले , ती जादू म्हणजे चित्रपट.....!!!

चित्रकला, छपाई , फोटोग्राफी ,वास्तुकला , संगीत , जादुगरी आणि हौशी अभिनेता अशी बहुविध प्रतिभा विकसित करणाऱ्या फाळक्यांनी १९११ मध्ये "लाईफ ऑफ ख्राइस्ट "(Life of Christ) हा अमेरिकन मुकपट बघितला आणि फाळकेंच धार्मिक मन चांगलच प्रभावित झालं. त्यातून त्यांनी स्फूर्ती घेतली. परिणामी या प्रतिभाशाली माणसाचा जीवनक्रमचं बदलला. 'त्या' सिनेमातील येशू ख्रिस्ता ऐवजी फाळकेंनी भगवान कृष्ण व इतर देवदेवतांना पाहिलं. आणि याच प्रेरणेनं त्यांनी छायालेखनाच्या नव्या परंपरेची मुहूर्तमेढ केली. मित्रमंडळींच्या मदतीने कर्ज उभारून १९१२ साली ते इंग्लंडला चित्रपटतंत्र शिकण्यासाठी गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मितीच्या सर्व अंगाचा त्यांनी अभ्यास केला. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री मिळवली. आणि भारतात परतल्यावर राहत्या घरातच त्यांनी स्टुडिओ उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट तंत्र आत्मसात करून १९१२ मध्येच दादासाहेब फाळके यांनी ‘रोपट्यांची वाढ’ हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले. द. दा. दाबके व भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन दादासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वदेशी चित्रपटाची निर्मिती केली.

३ मे १९१३ रोजी "राजा हरिश्चंद्र" भारतातील पहिला चित्रपट (मूकपट) मुंबईत कोरोनेशन सिनेमा ( Coronation Cinema) येथे प्रदर्शित केला. हा चित्रपट सुमारे ४० मिनिटांचा होता. या पहिल्या भारतीय चित्रपटाचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळेच भारतीय चित्रपटाच्या जनकत्वाचा मान त्यांच्याकडे जातो. दादासाहेबांनी पटकथा लिहिली, निगेटीव धुतली, वेशभूषा तयार केली, कलाकारांना दिग्दर्शन केलं, छायालेखन केलं, तयार फिल्मवर प्रक्रिया केली. संकलन केलं. एवढंच नव्हे तर चित्रपटाचे प्रदर्शन, प्रसार व प्रचारही केला. त्या काळात ते स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन बैलगाडीतून गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. खरोखर दादासाहेब फाळके म्हणजे "वन मॅन इंडस्ट्री"च होती. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली, भारतातच राहणे पसंत केले. त्यांनी खरा खुरा भारतीय सिनेमा जन्माला घातला आणि भारतीय सिनेमाच्या विकासाला दिशा दिली.

दादासाहेबांच्या कामगिरीचा काळ हा हिंदू समाज व संस्कृतीच्या जागृतीचा काळ होता. ते स्वतःही त्या इतिहासाच्या कालप्रवाहात जागृतपणे कार्य करीत होते. बाल्यावस्थेत असलेल्या या माध्यमाचा त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागृतीसाठी वापर केला. सिनेमामध्ये लोकांचा आत्मा पाहु शकणाऱ्या या द्रष्ट्या माणसाची नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिला अमेरिकन रुपक चित्रपट "ग्रेट ट्रेन रॉबर्स" ही गॅगस्टर फिल्म होती, तर पहिला भारतीय रुपक चित्रपट "राजा हरिश्चंद्र" हा धार्मिक कथेवरचा होता... राजा हरिश्चंद्र नंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३), सावित्री सत्यवान (इ.स. १९१४), श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८), कालिया मर्दन (इ.स. १९१९), सेतुबंधन (इ.स. १९३२), गंगावतरण (इ.स. १९३७) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी पाच भागीदारांसह ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला ‘बॉक्स ऑफिस हिट’ चित्रपट मानला जातो. ‘गंगावतरण’ हा त्यांनी निर्मिलेला पहिला बोलपट. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले.
दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील जवळजवळ ३० लघुपटही काढले.

पैसा, मनुष्यबळ सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृक्‌श्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, कलात्मक दृष्टीकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.

खर्याि अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असणार्या दादासाहेबांचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे निधन झाले. या चित्रमहर्षीला जनता कधीच विसरू शकत नाही चित्रपट क्षेत्रातील दादासाहेबांच्या मुलभूत कार्यांची दाखल घेऊन केंद्र शासनाने सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणार्याा कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला.

चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पायाभूत कार्य करणारे, तसेच महाराष्ट्रात भारतातील पहिला चित्रपट बनवणारे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील अभिमानाचा बिंदू आहेत हे निश्र्चित..!

चित्रपट सृष्टीतील पाहिलं दशक हे दादासाहेबंच होत... आज ही चित्रपट सृष्टोई शंभर वर्षाची होत असताना रंगीबेरंगी दुनिया पडद्यावर साकारणा-या चित्रपटसृष्टीच्या जनकाला या चित्रमहर्षीला सलाम...!!!