Saturday 11 August 2012

जगज्जेती बॉक्सर आणि भारताची सुपरमॉम- मेरीकोम



ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगच्या पदार्पणातच  पदक मिळविण्याची किमया करणारी...जबरदस्त इच्छाशक्ती,कष्ट आणि दुर्दम्य आत्मविश्वास याच्या जोरावर आपली  क्रीडा कारकीर्द समृद्ध करणारी...  स्वःबळावर आपलं कारकीर्द घडविणारी....क्रीडाविश्वातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने गौरवली गेलेली एम.सी. मेरी कोम...!!!
काहीजणांचा जन्मच बहुदा काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी होतो...म्हणजे त्यांच्या डोळ्यांना बिकट वाटच खुणावत असते. मांगते चुंगनेजंग मेरीकोम ही त्याच पठडीतील व्यक्तिमत्त्व...! पाच फुटांच्या आत-बाहेरची उंची, लालसर गोरा वर्ण, बसकं नाक, बारीक मिचमिचे डोळे, अशी सर्वसाधारण मणिपुरी बांध्याची मेरी कोम आज बॉक्सिंग रिंगची राणी होऊन गेली आहे. २०-२५ फुटांच्या त्या चौकोनावर ती अधिराज्य गाजवत आहे.
मेरीकोमचा जन्म मणिपूरमधील कांगाथेइ सारख्या अगदी दुर्गम खेड्यात, गरीब कुटुंबात झाला. तिचे आई वडील शेतात काम करायचे. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. पण मेरी कोम लहानपणापासूनच खेळांमध्ये अव्वल असायची. ती एक उत्तम अॅथलिट होती.  तिच्याच राज्यातील बॉक्सर डिंगको सिंग याने १९९८मधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांच्या याच यशाने मेरीकोमला बॉक्सिंगची आवड निर्माण झाली आणि  मेरीने 17व्या वर्षीच बॉक्सिंमध्ये करियर करण्याचा ठाम निश्चय केला होता.
वर्ष २००० मध्ये १७ वर्षांच्या मेरी कोमनं बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि प्रचंड मेहनत करून तिनं त्याच वर्षी राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवलं. वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी सगळंच बिंग फुटलं. वडील निराश झाले. पण बॉक्सिंगबद्दल मुलीच्या मनात असणारी ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. मग तर, मेरी कोमला हिरवा कंदिलच मिळाला आणि तिची गाडी सुसाट वेगाने सुटली. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पधेर्त मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या मुष्टीप्रहारानं तिनं प्रतिर्स्पध्यांना नामोहरम केलं. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिनं विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग सुरू झाला जागतिक स्पधेर्मधील विजेतेपदांचा सिलसिला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पधेर्त तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुदा  त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते.
२००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पधेर्त तिनं अजिंक्यपद पटकावले. मेरी कोमची उंची कमी असली, तरी तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिर्स्पध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. यशस्वी बॉक्सर व्हायचे असेल तर हृदय कणखर असायला हवे, असे तिचे म्हणणे आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८मध्ये तिनं चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले. सुरुवातीला तिला पैसे मिळविण्यासाठी खूपच झगडावे लागले होते. काही वेळा प्रसंगी अपुरेच भोजन घेऊन तिने सरावाकरिता निधी साठविला आहे. आता मात्र खूप व्यक्ती व संस्था तिला मदत करीत आहेत. गीत सेठी यांनी स्थापन केलेली ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, केंद्र शासन व राष्ट्रीय संघटना यांचे साहाय्य तिला लाभले आहे. त्यामुळेच  आता परदेशी प्रशिक्षक अ‍ॅटकिन्सन, तसेच फिजिओ जान्हवी जठार यांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे.
मुष्टियुद्ध हा जरी रांगडा खेळ असला आणि त्यामध्ये सतत आक्रमक चाली कराव्या लागतात ही जरी वस्तुस्थिती असली तरी मेरी कोम ही मनाने खूपच हळवी आहे आणि तितकीच शांत आहे. मुष्टियुद्धात जरी सातत्याने ठोशांचे युद्धच खेळावे लागत असले तरी प्रत्यक्षात मुष्टियुद्धाच्या रिंगबाहेर आल्यानंतर मेरी ही खूपच शांत असते आणि अनेक प्रश्नांना सामोरे जाताना ती हसतमुख असते. रिंगमध्ये स्ट्राँग हार्ट ठेवणारी मेरी घरी एक हळवी आई आहे. तिनं आपला खेलरत्न पुरस्कार आपल्या जुळ्या मुलांना अर्पण केला आहे.
आपल्या देशात एकूणच महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. मुळातच मुष्टियुद्ध हा महिलांचा क्रीडा प्रकार नाही असा अनेक वेळा प्रचार करण्यात आला आहे आणि अजूनही होतो.  म्हणूनच जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सलग चार वर्षे विजेतेपद मिळविल्यानंतरही तिला राजीव गांधी  खेलरत्न पुरस्कारासाठी झगडावे लागले होते. पण आज मेरीकोमच्याच  यशामुळे भारतीय महिलाही या क्षेत्रात चमकू शकतात याची जाणीव सर्वाना झाली आहे. त्यातही चूल-मूल या पलीकडेही महिलांचे जग असते याची जाणीव अनेकांना झाली आहे.
मणिपूरमध्ये तिने मुलींसाठी मुष्टियुद्ध प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. सध्या वीस मुली तेथे शिकत आहेत आणि त्यामधील एका खेळाडूने नुकतीच राज्यस्तरावर विजेतेपद मिळवित अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या अकादमीसाठी तिला आर्थिक पाठबळ मिळत आहे, मात्र शेतातच सराव करावा लागतो. सरावासाठी एखादा छोटा हॉल द्यावा ही मागणी तिने गेली तीन-चार वर्षे मणिपूर शासनाकडे व संघटनेकडे करीत आहे, मात्र अद्याप या सुविधा तिला मिळालेल्या नाहीत. कदाचित त्यासाठीही तिला झगडावे लागणार आहे. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर जागतिक मुष्टियुद्ध सीरिजसारख्या स्पर्धामधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचेही तिचे ध्येय आहे. मुष्टियुद्धापासून तिला खूप काही शिकावयास मिळाले,मानसन्मान मिळाला, तिचे पतीही या खेळामुळेच मिळाले, या खेळाचे ऋण फेडण्यासाठी उर्वरित आयुष्य वाहून टाकण्याची तिची इच्छा आहे.
ऑलिम्पिकसाठी मेरी हिला तिच्या नेहमीच्या ४५ किलोऐवजी ४८ ते ५१ किलो या वजनी गटात खेळावे लागले. साहजिकच तिच्यासाठी हे आव्हान होते. ऑलिम्पिक पदक हे तिच्या नसानसात भिनले होते. त्याकरिता वाटेल तेवढे कष्ट घेण्याची तिची शारीरिक व मानसिक तयारी होती आणि त्याप्रमाणे तिचा सराव सुरू होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी  सेमीफायनलपर्य़ंत धडक मारून कास्य पदकावर नाव कोरत तिने एक नवा इतिहास तयार केला आहे. ती आज भारताची खरी सुपरमॉम ठरली आहे.
पाचवेळची जगज्जेती बॉक्सर असणाऱ्या....पहिली महिला मानद लेफ्टनंट कर्नल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या...मणिपूरसारख्या उपेक्षित राज्यात जेथे खेळासाठी फारसे पोषक वातावरण नसतानाही....केवळ आपल्या जिद्दीमुळे आणि घरच्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच एवढे यश मिळविणाऱ्या या भारताच्या सुपरमॉमला सुपर सलाम....!!!


Tuesday 7 August 2012

भारतीय सिनेमाला मिळालेला पहिला डान्सिंग स्टार- मास्टर भगवान पालव


सध्या भारतीय सिनेमाची शताब्दी सुरू आहे आणि याच सिनेजगतात तब्बल ६५  वर्षं घालवून रसिकांची मनमुराद करमणूक करणारे...गेली अनेक दशके चित्रपट रसिकांना बेधुंद करणारे..स्टंट चित्रपटांचे मर्दानी नायक व अभिजात नर्तक असे जगावेगळे मिश्रण असलेले...हास्य अभिनेते म्हणून नावाजलेले गेलेले कलाकार मास्टर भगवान यांची जन्मशताब्दीही 0१ ऑगस्टपासून सुरू झाली आहे...
१९१३ साली पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला. हेच १९१३ साल हिंदी चित्रपट जगतातील एका अवलिया मराठी कलावंताचे जन्मसाल आहे. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटांना मिळालेली अतीव लोकप्रियता ही कर्णमधुर-भावुक गीत-संगीताने मिळाली हे सर्व खरे, तेवढाच महत्त्वाचा यशाचा वाटा हा या चित्रपटातील नृत्यशैलीमुळे अधोरेखित झाला हेही तितकेच खरे...याच नर्तनकलेत आपली वेगळी छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेता म्हणजे मास्टर भगवान होय.
भगवान पालव या अस्सल कोकणी माणसाचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी मालवण भागात झाला. बालपण खुप हलाखीत काढणाऱ्या भाग्वानादादांचे शिक्षण कसंबसं चौथी पर्यंत झाले होते. त्यांना लहानपणापासूनच मास्टर विठ्ठल यांचे चित्रपट पहायला आवडायचे. त्यांच्यासारखे आपणही चित्रपटात काम करावं आणि सगळीकडे लोकप्रिय व्हावं असं भगवानदादांना नेहमी वाटायचं. पण गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं...
मास्टर विठ्ठल हे दादांचे दैवत...! त्यांच्यासारखे आपणही एक दिवस हीरो व्हावे हा एकच ध्यास त्यांनी विद्यर्थीदशेपासून घेतलेला. डोळस निरीक्षण, नियमित व्यायामाने कमविलेली शरीरयष्टी मर्दानी खेळांमुळे तिला आलेला लवचिकपणा, अफाट परिश्रम, मूळचा गमत्या स्वभाव, हाणामारी, शस्त्रविद्येतील कौशल्य, रोमारोमांत भिनलेला नैसर्गिक ऱ्हिदम, चित्रपटात काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व वडिलांचे आशीर्वाद या शिदोरीवर एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा मूकचित्रपटाच्या जमान्यापासून सुरुवातीला विनोदी नटपुढे फायटर म्हणून चित्रपटात काम करू लागला व म्हणता म्हणता १९३८ मध्ये पाश्र्वगायक खान मस्ताना, मीर साहेबांचे संगीत असलेल्या बहादूर किसानचित्रपटाचे दादा कथालेखक व दिग्दर्शकही झाले.
1930 मध्ये दादाला कॉमेडियन म्हणून 'बेवफा आशिक' हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र 'बेवफा आशिक' या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी दादाला आपल्या 'जनता जिगर' या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला. या चित्रपटानंतर त्यांच्या पाच मुकपटात भगवानदादांनी काम केलं. 'हिम्मते मर्दा' या पहिल्या बोलपटात भगवानदादांनी काम केले. इथुनच भगवानदादांना धडाधड चित्रपट मिळत गेले..
१९४६ ते १९६८ या दरम्यानचा काळ भगवानदादांसाठी जॉकपॉटचा काळ ठरला. भगवानदादा हा खरे तर दिवसभर काबाडकष्ट करून, घामाचे पैसे खर्च करून ग्रांट रोडच्या बकाल वस्तीतील थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या गरीब जनतेचा आणि शाळा-कॉलेजला दांडी मारून मॅटिनी शो पाहयला आलेल्या विद्यार्थ्यांचा आवडता नायक होता.. त्यांच्या  मुद्राभिनयाला, हाणामारी किंवा हास्यप्रसंगाला थिएटरमध्ये टाळ्या, हास्य व शिट्टयांचा जल्लोष असे. मात्र १९५० पर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू व सुशिक्षित सिनेदर्शकात दादांच्या चित्रपटांना स्थान नव्हते.
१९५१ ला रिलीज झालेल्या 'अलबेला’तील  एकाहून एक "सुपरडुपर हिट' गाणी आणि त्यावरील खास "भगवान-डान्स'ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'भोली सुरत दिल के खोटे' हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भगवान दादांचा हा रोंबासांबा डान्स अत्यंत सोपा परंतु आकर्षक नृत्यप्रकार असल्याने खूप लोकप्रिय झाला.. शाम ढले खिडकीतले तुम सीटी बजाना छोड दो' या गीतानं तर "छेडछाडवाल्या' गीतांचा आरंभ केला."ओ बेटाजी, किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम' या गीतात भांड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः भगवानदादांची होती."भोली सूरत दिल के खोटे। नाम बडे और दर्शन छोटे ' आणि "शोला जो भडके । दिल मेरा धडके। दर्द जवानी का सताए बढ बढ के' या गाण्यानं पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. या सिनेमातील अंगाईगीत सर्वांत लोकप्रिय ठरलं. 'धीरे से आजा री अखियन में निंदिया धीरे से आ जा' या लता मंगेशकर यांनी गायलेल्या अंगाईगीतानं आजही सर्वोत्कृष्ट अंगाईगीताचं स्थान कायम ठेवलं आहे.

भारतीय सिनेमात खऱ्या अर्थानं पाश्‍चात्य संगीत आणि डान्स रुजवण्याचे काम भगवानदादांच्या "अलबेला'नं केलं. भगवानदादा यांचं "अलबेला'चं हे यश मात्र "एकमेवाद्वितीय' ठरलं. त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले..."झमेला', "कर भला', "लाबेला', "शोला जो भडके', "रंगीला....” पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही. सिनेमानिर्मितीच्या उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवानदादांनी काळाची पावलं ओळखली आणि आपलं लक्ष पूर्णपणे 'डान्स'वर केंद्रित केलं. पुढं कित्येक हिंदी आणि मराठी सिनेमांत ते नाचू लागले. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा "प्लस पाइंट' होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. "चोरी चोरी', "झनक झनक पायल बाजे' या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या.
लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवानदादा यांनी १९४२ मध्ये "जागृती पिक्‍चर्स' या बॅनरची स्थापना केली; तसेच स्वतः चा चेंबूर इथं "जागृती स्टुडिओ'ही १९४७ मध्ये उभारला.  पुढं गोरेगावमधल्या भगवानदादा यांच्या गोडाऊनला आग लागली आणि त्यात त्यांचे हे सारे स्टंटपट भस्मसात झाले. १९५१ मध्ये अलबेलाप्रदर्शित झाल्यावर बरोबर पंचवीस वर्षांनी रणजीत बुधकरांनी अलबेलाचे हक्क विकत घेतले. काळाप्रमाणे आवड बदलते असे म्हणतात. पण अलबेलाकाळाच्या कसोटीलाही पुरेपूर उतरला. नव्या तरुण पिढीने त्याचे न भूतो न भविष्यतीअसे स्वागत केले अलबेलाने परत रजत जयंती साजरी केली. आज भगवानदादांच्या स्टंटपटांची आठवण इतिहासजमा झाली असली, तरी त्याच्या कारकीर्दीला "चार चॉंद' लावणारा "अलबेला' शाबूत राहिला. भगवानदादांच्या "अलबेला'नं इतिहास घडवला. नृत्य-संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला "पहिला डान्सिंग ऍक्‍टर' -अर्थात्‌ भगवानदादा या सिनेमानं मिळवून दिला.

दादरच्या ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते राहत होते, त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ भगवानदादा यांच्याशिवाय पुरा होत नसे. एकेकाळी एका स्टुडिओचे मालक असलेल्या भगवानदादांनी बंगला, गाडी असं सर्व काही ऐश्‍वर्य उपभोगलं. पुढं काळ बदलला. भगवानदादा "डेली पेड आर्टिस्ट' म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरू लागले. भगवानदादा हे अहंकाराची अजिबात बाधा नसलेले कलाकार होते.
ऐश्‍वर्य आणि गरिबी त्यांनी एकाच मापात मोजली. ज्या "लल्लूभाई मॅन्शन'मध्ये ते लहानपणापासून राहत असत, तिथंच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. ०४ फेब्रुवारी २००२ रोजी. जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता, तिथंच ते आयुष्याच्या अखेरीस येऊन विसावले.
मास्टर भगवान म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक गोड स्वप्नच होते. अशा या हरफनमौला, दिलखुलास मास्टर भगवानदादांच्या जन्मशताब्दी निमित्त  विनम्र अभिवादन...!!!